माझ्या खडूचे अभंग या पुस्तकातील एक अभंग आपल्यासमोर सादर करतो , तो वाचा आणि मला कळवा …
शिक्षकाचे दुसरे नाव गांडूळ . हे मी खेदाने म्हणत आहे . आज दिवसभर आपण सर्वांनी शिक्षकांचे भले चिंतिले आहे . पण वस्तुस्थिती काय आहे ?
येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो …
आता हेच बघाना—
चिल्लर मुंग्यांचा । सर्वत्र संचार ।
गांडूळ लाचार । सैरभैर ।।
येथे गांडूळांना । नाव कधीमधी ।
गांडूळ उपाधी । सर्वथैव ।।
मुंग्या चावताती । वरून खालून ।
करिती शोषण । अमानुष ।।
पडती तुकडे । देह छिन्न भिन्न ।
मूक हे रुदन । कोणा कळे ?
धुगधुगी देही । वळवळे जीव ।
ज्ञानी तया नाव । खडू म्हणे ।।
——————-
हे काहीच नाही , प्रामाणिक , गुणवान शिक्षकाने , शिक्षण क्षेत्रात येऊच नये , अशी परिस्थिती निर्माण केली ,की शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या नावाने गळे काढायला तयार असणाऱ्यांची कमतरता नाही …
उद्दाम उद्धट । यांच्या हाती सत्ता ।
शिक्षकांना लाथा । बसताती ।।
कार्यभार किती । पत्ता ना कोणासी ।
दोष नशिबासी । लावावा गा ।।
प्रयोग क्षमता । कोणास ना रुचे ।
कोणा काय याचे । पडलेजि ।।
सालस नेकीचे । राहिले ना जग ।
उगा तगमग । होत असे ।।
भ्रूण हत्या होते । नव्या शिक्षकांची।
कोणा खंत याची । खडू म्हणे ।।
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
दि. ५ सप्टेंबर २०१९
मित्रानो शिक्षकांबद्दल कणव असेल तर नावासह शेअर करायला हरकत नाही .
Leave a Reply