नवीन लेखन...

खगोल शास्त्र – राहू आणि केतूचे

लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती.

या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात. मात्र राहू नावाच्या राक्षसाला ही गोष्ट लक्षात येते आणि तो देवाचे रूप धारण करतो. भगवान विष्णू त्या राक्षसाला खरे अमृत देत असताना सूर्य आणि चंद्र देवाला त्याचे मायावी रूप लक्षात येते. ही गोष्ट जेव्हा ते भगवान विष्णूच्या लक्षात आणून देतात तोपर्यंत राहूच्या गळ्यापर्यंत अमृताचे काही थेंब गेलेले असतात. भगवान विष्णू त्याच क्षणी स्वतःच्या सुदर्शन चक्राचा वापर करत त्या राक्षसाचे डोके आणि शरीर वेगळे करतात. मात्र अमृतपान केले असल्याने राहू राक्षस डोके आणि शरीराच्या रूपाने जिवंत राहतो. पुढे त्याचे डोके राहू नावाने तर शरीर केतू नावाने ओळखले जाऊ लागते. राक्षसाचा खोटेपणा सुर्य आणि चंद्र देवाने लक्षात आणून दिल्यामुळे राहू आणि केतू राक्षस ग्रहणाच्या रूपाने दोघांनाही त्रास देण्यास सुरुवात करतात. पौराणिक कथेनुसार असे म्हणतात की जेव्हा सूर्य आणि चंद्र ग्रहण होते तेव्हा राहू आणि केतू त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असतात.

हा झाला सर्व पौराणिक कथेचा भाग. मात्र राहू आणि केतूला पौराणिक कथेत आणि ज्योतिष शास्त्रामध्ये जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व खगोल शास्त्रामध्ये देखील आहे.

खगोल शास्त्रात राहू आणि केतूचा सूर्य आणि चंद्र ग्रहणाशी कसा संबंध आहे ते आपण समजून घेऊ.

पृथ्वी सुर्या भोवती अंडाकृती आकारात फिरत असते आणि ३६५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वी स्वतः भोवतीही एक प्रदक्षिणा २३ तास ५६ मिनिटात पूर्ण करते. या दोन्हीही प्रदक्षिणा पूर्ण होताना पृथ्वी स्वतःच्या अक्षा भोवती २३ अंशात कललेली आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पृथ्वी जशी सुर्या भोवती फिरते तसेच चंद्र देखील पृथ्वी भोवती अंडाकृती आकारात फिरत असतो. चंद्र पृथ्वी भोवती फिरताना ५ अंशाचा कोन तयार करतो. चंद्र पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा २७.३ दिवसात पूर्ण करतो, तर चंद्र स्वतः भोवती एक प्रदक्षिणा २९.५ दिवसात पूर्ण करतो. पृथ्वी आणि चंद्राचे परिवलन आणि परिभ्रमण होत असताना २ वेळेस चंद्र पृथ्वीची कक्षा काटतो.

चंद्र ज्या ठिकाणी पृथ्वीची कक्षा काटतो त्या बिंदूस खगोल शास्त्रीय भाषेत राहू आणि केतू म्हणतात. हे दोन्हीही बिंदू परस्परांच्या विरुद्ध दिशेने असतात आणि १८० अंशाचा कोन तयार करतात.

याच राहू आणि केतू बिंदूची स्थिती सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण काळात देखील निर्माण होते. या दोन्ही ग्रहण काळात चंद्र पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो आणि १८० अंशाचा कोन तयार करतो.

राहू आणि केतू स्थिती समजून घेण्यासाठी सूर्य आणि चंद्र ग्रहण कसे होतात हे समजणे देखील महत्त्वाचे आहे.

सूर्य ग्रहण हे अमावस्याला होते तर चंद्र ग्रहण पौर्णिमेला. मात्र प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण होतेच असे नाही. ग्रहण होण्यासाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेत असणे गरजेचे असते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये एका सरळ रेषेत चंद्र येतो तेव्हा सूर्य ग्रहण होते.

सूर्य ग्रहणाचे देखील तीन प्रकार आहेत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. खग्रास सूर्य ग्रहणामध्ये सूर्य पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्राची छाया पृथ्वीवर साधारणतः ३०० किलोमीटरच्या परिसरात पडते. म्हणजेच या भागात अंधार होतो. खग्रास सूर्य ग्रहणाचा कालावधी फार तर ८ मिनिटांचा असतो. या सूर्य ग्रहण स्थितीला राहू स्थिती किंवा खगोलीय भाषेत सोलार मोड असे देखील म्हणतात. सूर्याच्या अति नील किरणामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नये. सूर्य ग्रहण बघण्यासाठी कोटिंग असणारा विशिष्ट प्रकारचा चष्मा मिळतो.

केतू स्थिती सूर्य ग्रहणाच्या उलट असते. चंद्र ग्रहणाला केतू स्थिती किंवा लुनार मोड म्हणतात. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये एका सरळ रेषेत पृथ्वी येते तेव्हा चंद्र ग्रहण होते. या वेळेस चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. चंद्र ग्रहण कालावधी साधारणतः ३ तासां पर्यंत असू शकतो. ग्रहण काळात सूर्याची किरणे पृथ्वी पासुन परावर्तित झाल्याने चंद्र लाल रंगाचा जाणवतो. पृथ्वीच्या विविध भागांचा विचार केला तर सूर्य ग्रहण एक वर्षात साधारणतः ५ वेळेस येऊ शकते तर चंद्रग्रहण ३ वेळेस. सूर्य आणि चंद्र ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ आहे. या कारणामुळे राहू आणि केतूला खगोलीय भाषेत छाया ग्रह संबोधले जाते. हे भौतिक ग्रह नसले तरीही सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सारख्या खगोलीय घटकांवर स्वतःचा प्रभाव पाडतात.

सूर्य हा आपल्या सौर मालेतील एकमेव ऊर्जा स्त्रोत आहे. तर चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्राला भरती आणि ओहोटी येते. या दोन्हीही खगोलीय घटकांचा पृथ्वीवरील जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे सूर्य आणि चंद्र ग्रहण होण्यास राहू आणि केतू स्थिती जिम्मेदार असल्याने पौराणिक कथेत त्यांना राक्षस मानणे स्वाभाविक आहे.

मात्र पौराणिक कथा मानवाला चांगला संदेश आणि उपदेश देण्यासाठी असतात न की अंधश्रद्धा पसरवण्यासाठी. सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण, राहू स्थिती, केतू स्थिती या खुप नैसर्गिक आणि खगोलीय घटना आहेत. मुळात ग्रहणा सारख्या खगोलीय घटनांचा आनंद आपल्याला रोज मिळू शकत नाही. या घटना ठराविक कालांतराने कधीतरी घडत असतात. त्यामुळे या घटनांबद्दल भीती निर्माण करण्यापेक्षा या घटनांचे खगोलीय आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण लोकांना समजावून सांगणे जास्त महत्त्वाचे आहे.

इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पृथ्वी आणि चंद्रा मधील अंतर फक्त ३.८४ लाख किमी असल्याने आपल्याला प्रत्यक्षात ग्रहण जाणवते. चंद्र जर पृथ्वीपासून खूप जास्त दूर असता तर ग्रहणाचा प्रभाव जाणवलाच नसता. जसे की बुध आणि शुक्र ग्रह आकाराने चंद्रा पेक्षाही मोठे आहेत. आणि काही ठराविक कालावधीनंतर हे ग्रह देखील पृथ्वी सोबत एका सरळ रेषेत येतात. मात्र हे ग्रह पृथ्वीपासून खूपच दूर असल्याने या ग्रहांच्या बाबतीत ग्रहणाचा प्रभाव जाणवत नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर हा नैसर्गिक खगोलीय खेळ सावल्यांचा आहे. मग तुम्ही या सावल्यांना सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण, राहू किंवा केतू असे काहीही नाव द्या. चंद्रा सारखे उपग्रह तुमच्या ग्रहाच्या जवळ असतील तर सावल्यांचा खेळ दाखवत राहणार आणि दूर असतील तर त्यांचा काहीच प्रभाव जाणवणार नाही.

लेखक : राहुल बोर्डे, पुणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..