नवीन लेखन...

खैय्याम

काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. “पहाडी” सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू – हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.

“शामे गम की कसम’ सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, “डबल बेस” आणि “स्पॅनिश गिटार” सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.

काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे – शामे गम की कसम”, “कहीं एक मासूम लडकी” किंवा ” आज बिछडे है” ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ “जीत लेंगे बाझी हम तुम” या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील “बहारो मेरा जीवन भी संवारो” या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.

एक आश्चर्याची बाब – समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. “कभी कभी मेरे दिल में” आणि ” सिमटी हुई ये घडिया” किंवा “परबतो के पेडो पर” आणि “बहारो मेरा जीवन भी संवारो” तसेच “फार छिढी रात” आणि “आयी झंजीर” ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.

खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती “उमराव जान” चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. “दिल चीझ क्या” या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. “इन आँखो की मस्ती” या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी “जिंदगी जब भी” या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.

मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.

– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..