नवीन लेखन...

खळगी

“ए माये,मला बिडी दे ” .
पंधरा सोळा वर्षांचा मुलगा आपल्या आईकडे विडी मागत आहे. आईसुद्धा आपल्याबरोबर गर्दी करून असलेल्या इतर बायकांशी बोलता बोलता कडोसरीचा बटवा काढून सहजपणे त्यातील एक विडी मुलाकडे फेकते. मुलगा त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाकडून काडेपेटी घेऊन विडी शिलगावत धूर सोडतोय आणि हे सगळं पोलिस ठाण्याच्या व्हरांड्यात चाललं आहे.
१९७८ साली कुर्ला पोलिस स्टेशन ला मी सब-इन्स्पेक्टर म्हणून नेमणुकीस होतो. त्या पोलिस स्टेशन हद्दीत सी एस टी रोड वरील बुद्ध कॉलनी आणि त्या मागचा हलाव पूल यांच्या मधील मोकळ्या मैदानवजा जागेत , एका ठराविक समाजाची स्थलांतरीत वस्ती होती. सगळ्या झोपड्या . दोन झोपड्यांच्या मधून एक माणूस जेमतेम चालत जाऊ शकेल , अशा एकमेकीला चिकटून असलेल्या त्या झोपड्या. स्वच्छतेशी काडीचा संबंध नसलेल्या त्या वस्तीत जवळ जवळ रोज भांडणं ठरलेली. तीही बायकांची . कपड्यांचे भान न ठेवता , एकमेकींच्या झिंज्या धरून , खाली पाडून , त्वेषाने गुद्दे मारत, तेलगू मिश्रित भाषेत किंचाळत सुरु असलेल्या झोंबी . त्यात आवेश असा की भाषा समजत नसली तरी सगळे शब्द शिव्यांमध्येच ओवलेले आहेत हे कोणालाही सहज कळावं . अशी दृष्ये तिथे नेहमीचीच.
या वस्तीत जायची वेळ आली की अगदी नको वाटत असे. वस्ती जवळ येऊ लागली की आसमंतात पसरलेला एक कुबट दुर्गंध नाकाचा ताबा घ्यायचा. वस्तीत दिवसा कोणीही पुरुष मंडळी आढळत नसत. त्यांच्यापैकी मोजके काही पुरुष दुसऱ्यांच्या टॅक्सीज चालवत असत. काही पुरुष त्यांनी पाळलेली माकडे घेऊन त्यांचे खेळ करायला सकाळीच घराबाहेर बाहेर गेलेले असायचे . जे काही वस्तीत असायचे ते एकतर दारू पिऊन तर्र झोपलेले असत किंवा शुद्धीवर असले तर वस्तीतीलच एखाद्या सिमेंटच्या ओट्यावर गोल बसून पत्यांचा जुगार खेळत दंग आढळायचे. लहान अर्धनग्न मुलांची पिलावळ रस्त्यावर आरडाओरडा करत गोट्या,लगोरी खेळत त्यांच्यात्यांच्यात रमलेली असे. विस्मय वाटावा अशी गोष्ट म्हणजे पत्ते खेळणारे पुरुष किंवा खेळणारी मुले, त्यांच्यापासून काही फुटांवरच चाललेल्या स्त्रियांच्या त्या न संपणाऱ्या झोंबाझोंबी मुळे अजिबात विचलित होत व्हायचे नाहीत .
त्या भटक्या जमातीची ही वस्ती वर्षानुवर्ष एकाच जागी पालं पडल्यासारखी असायची. फक्त झोपडीचा आकार तुलनेने थोडा मोठा. आतून बांबूंचा आधार आणि सिमेंट काँक्रिटचा कोबा केलेला. आतमध्ये तिन दगडांची एखादी चूल , अँल्युमीनीयमची चार भांडी , थाळ्या, एखादा माठ , काचेच्या छोट्या बाटलीला वात लाऊन केलेला एखादा रॉकेलचा दिवा आणि मळक्या गोधड्यांच्या दोन तीन घड्या इतकाच संसार . जिथे अंग धुवायलाही पाणी उपलब्ध नाही तिथे परिसर कसा काय स्वच्छ ठेवणार !
वयस्क बायका वस्तीपासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या कुर्ला डेपोजवळच्या सिग्नलपाशी भीक मागायला दिवसभर बाहेर गेलेल्या असत. दारिद्र्य पाचवीला पुजलेले. त्यातही वस्तीतील काही पुरुषमंडळी बाहेर मोलमजुरी करणारी आणि थोडेफार पैसे कनवटीला बांधून असणारी . मात्र त्यांचा मुख्य उद्योग वस्तीतच भरमसाठ व्याजाने पैसे देऊन , त्यांच्याकडून उसने पैसे घेणाऱ्या गरिबाला आणखी गरीब करण्याचा.
कुर्ला डेपोपासून साधारण दीड पावणेदोन किलोमीटरवर असलेल्या कालिना परिसरात त्यावेळच्या ‘ मेट्रो कार्ड कंपनीच्या ‘ आजुबाजूस मोकळ्या जमिनीचा फार मोठा पट्टा होता. मिठी नदी बाजूनेच जात असल्यामुळे तिथे बाराही महिने उंच गवत वाढलेले असे. हमरस्त्यापासून खूप आत , त्या गवताआड कठीण जमीन हेरून , त्यावर आवश्यक तेवढी मोकळी जागा करून तिथे गावठी दारूच्या भट्ट्या लागत असत. गेली पन्नास वर्षे कुर्ला सांताक्रुझ मार्गावर धावणाऱ्या ३११ आणि ३१३ क्रमांकाच्या बसेस तेव्हाही पहाटे पासूनच सुरू होत.
वस्तीतील धडधाकट बायका पहाटेच उठून या बसेस पकडून कालिना परिसरातील या दारू भट्यांवर जात . या भट्ट्यांवरील गावठी दारू रबरी फुग्यात भरून ते फुगे ताडपत्रीच्या पिशव्यांमध्ये ठेऊन दोन खांद्यावर दोन पिशव्या घेऊन त्यातून घाटकोपर , कुर्ला भागातील दारुच्या फुटकळ धंदेवाल्यांकडे ते फुगे पोहोचवायचे , हे त्याचं काम. त्या बदल्यात त्यांना एका फुग्यामागे दोन रुपये मेहेनताना मिळत असे. या बायकांचा अवतार असा असायचा की गर्दीत सुद्धा , एकवेळ बस चुकली तरी चालेल , पण त्यांच्यापासून दूर होऊन त्या बायकांना कोणीही प्रथम वाट करून देत असत. कधीकधी एखादे अगदी लहान मूलही अशा बाईच्या कडेवर असे.
त्या मार्गावरून अगदी सकाळच्या वेळी बंदोबस्तासाठी वगैरे कुर्ला पोलिस ठाण्याकडे येणारे पोलिस अंमलदार अशा दारू वाहक बायकांना कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ बस पोहोचताच , फुग्यांसकट रेल्वे स्टेशन जावळील ‘संसार हॉटेल ‘ जवळ थांबवून ठेवत असत. तिथून त्यांनी फोन केला की मग जीप पाठवून त्या बायकांना पोलिस ठाण्यात आणले जाई. त्यांच्या अटकेची बातमी वस्तीवर जायला वेळ लागत नसे. आणि सकाळी सकाळीच , एरवी सतत भांडणाऱ्या त्या बायका तासाभरात मुलाबाळांसकट जणू मोर्चाने पोलिस ठाण्यात येऊन एकच कोलाहल करत ड्युटी ऑफिसरला जेरीस आणत असत. पाठोपाठ त्या वस्तीवरची तरुण मंडळी आयाना शोधत येत. कोलाहलात भर पडे. कोणी एखादा हवालदार काठी जमिनीवर आपटत ” ए गप्प बसा . नाहीतर सगळ्यांना आत करतो ” असा जोरात ओरडून दम देत असे. त्याचा परिणाम फार तर पाच ते दहा सेकंद होत असे. लगेच पुन्हा तोच प्रकार चालू .
पकडलेल्या बाईच्या कडेवर मूल असले तर ती लॉक अपमधे असेपर्यंत त्याची मावशी किंवा कोणीतरी त्याला जवळ ठेवत असे. प्रत्यक्षात त्या लहान मुलाच्या सावत्र आयाही त्या गर्दीत असत. कारण त्या वस्तीत एकेका दादल्याला दोन दोन , तिन तिन बायका. पण अशावेळी ते मूल घ्यायला त्यातील कोणीही पुढे येत नसे.
अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती. त्यांना घाटकोपर येथे असलेल्या स्त्रियांसाठीच्या लॉकअप मधे न्यायला लागायचे. तिची तिकडे रवानगी झाली की मग हा घोळका पोलिस स्टेशनमधून हलायचा.
यातील काही ठराविक बायका वस्तीमध्येच आपल्या झोपडीतून छोट्या प्रमाणात दारूचा गुत्ता चालवीत. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एखाद्या दारुड्या इसमाला त्या भागातून आणून अटक केली की त्याला , “कुठे प्यायलास?” याचं उत्तर द्यावच लागे. अशा प्रकारे दारुच्या धंद्याच्या जागेचा शोध लागला की तिथे संध्याकाळी छापा ठरलेला असायचा. त्या वस्तीची पूर्वपीठीका माहीत असल्याने महिला पोलिस कर्मचारी आणि एकाच्या जागी दोन हवालदार घेऊन ऑफिसर छाप्यासाठी निघत असे.
तिथे पोचल्यावर खरे दिव्य सुरू होई. वस्तीत पोलिस साध्या कपड्यात जरी गेले तरी त्या वस्तीच्या आतपर्यंत पोलीसांशिवाय कोणीही जाण्याच्या भानगडीत पडणार नाही हे उघड असल्याने पोलिस आल्याचे पाहणाऱ्यांना लगेच समजून येई आणि झोपड्यांच्या बाहेर एकमेकींच्या उवा काढत बसलेल्या बायकांच्या अनेक जोड्या एकदम उभ्या राहून मोठया मोठ्याने ओरडायला सुरुवात करत . त्यातून अख्ख्या वस्तीला पोलिस आल्याची वर्दी जात असे. त्यातच तिथल्या कुत्र्यांचं सामुदायिक भुंकणे चालू होई. पोलिसांच्या हातात लाठ्या असल्याने ते जवळ येत नसत.तो पर्यंत दारू विकणारी बाई दारूचे डबे घेऊन पळू नये म्हणून महिला पोलिस आणि एक हवालदार तिच्या ठिकाणाकडे धावत गेलेले असायचे . दरम्यान ती बाई बाहेरून दारू पिण्यासाठी येऊन बसलेल्या एकदोन गिऱ्हाईकांकडून दारूचे पैसे घेऊन , उरलेल्या दारूचा कॅन उचलून घाईघाईने वस्तीच्या मागच्या बाजूकडून पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नात असताना पकडली जायची. पोलिस आलेत हे ऐकल्यावर गिऱ्हाईकं तिने दाखवलेल्या रस्त्याने आधीच पळत सुटलेली आणि त्यांच्या मागे भुंकणारे कुत्रे लागल्याने आणखीनच वेगाने वस्तीबाहेर पोहोचलेली असायची .
दरम्यान वस्तीतील जवळ जवळ सगळ्या बायकांच्या गर्दीने पोलिसांना वेढलेले असायचे. ” सोडा वो सोडा तिला ! लेकरं लहान हायती ” असं म्हणत कितीही लांब होण्याचा प्रयत्न केला तरी ऑफिसरच्या हाताला धरून, पायाला हाताचा विळखा घालून त्यांच्या विनंत्या चालू राहायच्या. एखादी समोर येऊन तावातावाने तेलगू मिश्रित भाषेत शिव्या दिल्यासारखे ओरडत हातवारे करत असे तर एखादी मागच्या बाजूने ऑफिसरचा खांदा गदागदा हलवत त्याला कर्कश आवाजात , त्या दारू विकणाऱ्या बाईला सोडून देण्यास सांगायची. एव्हाना आरोपी बाईला घेऊन , महिला पोलीस आणि एक हवालदार जीपमधे जाऊन बसलेले असत. मागे राहिलेले ऑफिसर आणि हवालदार या आरडाओरडा करणाऱ्या बायकांच्या भयंकर घेरावातून सुटका करून घेत जवळ जवळ धावत येऊन जीप पर्यंत पोहोचल्यावर सुस्कारा सोडत असत.
पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर अर्ध्या पाऊण तासाने तोच घोळका पोलिस ठाण्यात येऊन ठेपलेला असे. आणि मग त्याच कोलाहलाची पुनरावृत्ती सुरू व्हायची .
अशा प्रसंगात त्यांची चीड येत असे, प्रचलित समाजमूल्यांशी काडीमोड घेतलेल्या त्या समूहाच्या राहणीमानाबद्दल सुरवातीला घृणा वाटत असायची.
मात्र दुसऱ्या अंगाने त्यांच्याच दृष्टिकोनातून शांतपणे विचार केल्यावर त्या समूहाची दया येत असे. जिवंत राहण्यासाठी पहिली मूलभूत गरज जी अन्न , तीच दररोज पोटात जाईल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती . मिळालंच तर ते बव्हंशी शिळपाकं. एखाद्याची सवत म्हणून रहायला कोणत्या स्त्रीला आवडेल ? परंतु इथे एकट्या स्त्रीचे भयावह असुरक्षित जगणे नको म्हणून आपल्या नावाशी नाव जोडून एखाद्या पुरुषाला नवरा म्हणून स्वीकारायचे आणि त्याला आपला राखणदार म्हणून नेमून आपली संपूर्ण मालकी त्याला सुपूर्द करायची. गरज त्या स्त्रीची म्हणून , तिच्या मालकी आणि राखणीशिवाय नवऱ्यावर तिच्याप्रति अन्य कोणतीही जबाबदारी नाही.
प्रत्येक हव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीच्या बाबतीत सगळीकडून हतबलता वाट अडवून उभी राहिली की हातात उरते ते फक्त प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणे . इथे चोखंदळपणाला अवघ्या आयुष्यात कधीही स्थान नाही. कोणत्याही बाबतीत एखादा पर्याय निवडायचा असेल तर समोर ते निदान दोन तरी हवेत. इथे तर जे नशिबात वाढून आलेले आहे फक्त तेच स्वीकारणे हाती .
जिथे आणि जोपर्यंत कोणी पालं हलवित नाही तो पर्यंत आयुष्याचा तो एक थांबा. अंगावरील दुधाशिवाय मुलांना दुसरं काही द्यायलाच नाही तिथे कुठून शक्य होणार त्यांचे चोचले पुरवणे आणि शिक्षण देणे ! प्रत्येक बाबतीत पराकोटीची वानवा असल्यावर साहजिकच जे काही स्वतःकडे आहे ते तुटपुंजं असलं तरी मौल्यवान ठरतं. मग त्यावरून रोजची कचाकचा कर्कश्य भांडणं.
बऱ्याच वर्षांपूर्वी टी व्ही वर मी एका खूप आतल्या प्रदेशात असलेल्या आफ्रिकन खेड्यातील लोकांचा खेळ पाहीला होता. त्यात ते आपल्याच दोन पाळीव प्राण्यांच्या झुंजी लाऊन , त्या झुंजणाऱ्यांपैकी एक मरेपर्यंत झुंज पहात स्वतःची करमणूक करून घेताना दिसले. त्या प्राण्याच्या अंगावरील जखमा जसजशा वाढत जात, तसतसे ते बघे विकृत आनंदाने टाळ्या पिटत खिदळत होते.
इथेही स्वतःचं असं काहीही नसलेल्यांची तशीच मानसिकता घडत जात असावी. सुखाच्या कणांचे कधीही दर्शन होत नसताना दुसऱ्याच्या दुःखाचे क्षणही त्यांच्यासाठी करमणुकीचे ठरत असावेत.
आजचा दिवस कालच्यासारखा . उद्याचा आजच्या सारखा आणि येणारा परवाही तसाच असणार याची खात्री असल्यामुळे कसलीही उत्कंठा नाही की उमेद नाही . उणिवांच्या पुराला ना आदि ना अंत ना खेद ना खंत . दिवस उगवला की असेल त्या परिस्थितीत खळगी भरेपर्यंतची वेळ मारून न्यायची आणि त्यालाच जगणे मानायचे .काळोख पडला की आजच्यासारख्याच उद्याची प्रतीक्षा करत निजायचे.
पोटात रोजचे चार घास कसे जातील एवढीच सतत भ्रांत असलेल्यांना कसलं देणंघेणं असणार संस्कारांशी आणि मूल्यांशी ?
असे दुर्दैवाचे जिणे सदैव नशीबी असलेल्यांच्या जीवनाचा अर्थ स्वतःला जिवंत ठेवणे इतकाच असतो याची एकदा जाणीव झाली , आणि त्यांच्यावरच्या रागाचं रूपांतर कणवेत कधी झालं ते मलाच समजलं नाही.
–अजित देशमुख
( निवृत्त ) अप्पर पोलीस उपायुक्त.
9892944007
E-mail: ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..