पडद्यावर खलनायकाची भूमिका वठविणारे कलाकार, प्रत्यक्षात कितीही सोज्वळ, भावनाप्रधान असले तरी समाज त्यांना कधीच माफ करीत नाही. त्यांची पडद्यावरील भूमिका, ते प्रत्यक्षातही वठवत असतील असा त्यांच्याबद्दल गैरसमज सर्रास गृहीत धरला जातो..
मिलिंद गुणाजी, हा कलाकार १९९३ पासून पडद्यावर दिसू लागला. त्याचा पहिला चित्रपट होता, ‘पपीहा’! दुसरा ‘द्रोहकाल’ व तिसरा ‘फरेब’! तिसऱ्या चित्रपटाने त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख करुन दिली. त्यातील नकारात्मक भूमिकेला पहिल्यांदा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं.. त्यानंतरचे तीन चित्रपट केल्यावर मिलिंदला ‘विरासत’ मिळाला. या मल्टीस्टार चित्रपटातील खलनायक, बाली ठाकूरची भूमिका मिलिंदने अविस्मरणीय वठवली. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला!
मराठीतील ‘सरकारनामा’मध्ये त्यानं लक्षवेधी काम केलं. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ मधील काली बाबूला कोण विसरेल? दरवर्षी त्याचे चित्रपट येत राहिले, ते अगदी गेल्या वर्षीपर्यंत.. हिंदी, कन्नड, तेलगु, मराठी, पंजाबी असे सुमारे साठ चित्रपट आज त्याच्या नावावर आहेत..
२३ जुलै १९६१ रोजी मिलिंदचा जन्म मुंबईत झाला. दूरदर्शनवरील ‘भटकंती’ या मालिकेतून त्याने महाराष्ट्रातील अनेक गड, किल्ल्यांची सफर घडविली. त्याने माॅडेलिंग क्षेत्रातही अनेक वर्षे काम केले. ‘लोकप्रभा’ साठी ‘माझी मुलुखगिरी’ हे सदर लिहिले. अनेक मोठ्या संस्थांचे मिलिंद गुणाजी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर राहिलेले आहेत.
ही झाली मिलिंद गुणाजी यांची ढोबळ ओळख.. आता हा पडद्यावरील खलनायक, वास्तवात ‘नायक’ कसा, ते सांगतो…
मिलिंदचा मुलगा अभिषेक यांचं लग्न राधा पाटील हिच्याशी काही महिन्यांपूर्वी, मालवणमधील वालावल येथे झालं. मिलिंदने मनात आणलं असतं तर हे लग्न मुंबईत एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सहजच करु शकला असता. मात्र त्यानं आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी निसर्गसुंदर मालवणचीच निवड केली.
हा शाही विवाहसोहळा वालावल येथील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात करण्याचे ठरले. या सोहळ्याची जबाबदारी कणकवली येथील सुजित काणेकर यांनी सांभाळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाॅटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर एजंट, मंडप डेकोरेटर, सनई चौघडा, डि जे वादक, सजावटकार, केटरर्स, स्थानिक पारंपरिक पदार्थ बनविणाऱ्या महिला असे सर्वजण एकत्र आले व कोकणी पद्धतीचे आदरातिथ्य दाखवून हा सोहळा यशस्वी केला.
या शाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला..
या मिलिंद गुणाजीच्या सांस्कृतिक व पारंपरिक कृतीने त्याची व्यक्तीशः असलेली सहा फूटी ‘नायका’ची उंची, सामाजिक दृष्ट्या आभाळापर्यंत पोहोचलेली आहे!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-१-२२.
Leave a Reply