समजावू कसे या मनाला
जे शोधिते अजूनही तुला..
आजही लोचनी रूप तूझे..
तुझाच ध्यास या जीवाला..
एकमेकांवरी नि:सिम प्रीती
तुझी न माझी, जडली होती
पाहता , पाहताच एकमेकां
प्रीतीभाव आगळा रुजला..
नि:शब्दुली ! भाषा मनांची
अंतरंगी सारीच प्रीतभारली
कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी
जगवित होती तनमनांतराला..
जरी निर्व्याज ही सत्यप्रीती
प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी
तुजविण सारे निरर्थ जीवन
हाच दुर्दैवी शाप जीवाला..
क्षणक्षण सारे आज हरवले
त्राणही क्षीण , संथ जाहले
सांजवेळी साऱ्या आठवणी
विमनस्क करती जीवाला..
आज प्रश्न ? मी काय प्रार्थू ?
ओशाळले जीवन सारे सारे
घायाळ जाहली जरी स्पंदने
अंती तुझाच ध्यास जीवाला..
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. ३७
दिनांक:- १० – ३ – २०२१
Leave a Reply