नवीन लेखन...

खरा गुरु

खूप शिकलेल्या व्यक्तीला पाश्चात्य देशात ‘वेल-रेड’ (खूप वाचलेला) म्हणतात. तर भारतीय संस्कृतीत बहुश्रुत (खूप ऐकलेला).
छापखान्यांची सोय नव्हती, विद्या गुरुमुखातून शिष्याला मिळायची आणि ऐकून, पाठ करूनच ती जपली जायची तेव्हाची ही संज्ञा. म्हणून विद्वान माणसाला बहुश्रुत’ म्हणत असतील कदाचित. पण त्यापाठीमागे आणखीही काही भाव जाणवतो. आपली अशी श्रद्धा आहे. ज्ञानं वृद्धसेवया । वृद्ध माणसांची सेवा करून, त्यांचे अनुभवाचे बोल ऐकले, त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेलं ज्ञान त्यांच्या शब्दात ऐकलं की आपल्याला ज्ञान मिळतं. पुस्तकांपासून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा गुरुमुखातून आलेल्या ज्ञानाला आपल्या संस्कृतीत जास्त मान.

ग्रंथ हे गुरु खरे. पण ते साऱ्यांना सारखाच उपदेश करतात. एकच ग्रंथ वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजावत नाही. परंतु वृद्धांचं किंवा गुरूचं तसं नाही. आपल्या समोरच्या माणसाची बौद्धिक कुवत, मानसिक जडणघडण, त्याच्याभोवतीची परिस्थिती यांचा विचार करून त्याला झेपेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीनं एकच तत्त्व ते सांगत असतात.

सन्मार्गाला जाण्याचा उपदेश करणारे अनेक ग्रंथ असतात. पण त्या मार्गानं प्रत्यक्ष जाताना माणसाला कितीतरी अडचणी येतात. व्यवहार आड येतो. मोह, लोभ, मत्सर, अहंकार वाट चुकवतात. अशा वेळी प्रेमळपणानं त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करावा लागतो. हे अनुभवी माणसंच करू शकतात. पुस्तकं नव्हे.

एक माणूस एका साधूकडे गेला. पश्चात्तापानं होरपळून आपल्या कित्येक पापांची त्यानं कबुली दिली. ‘मी फार वाईट आहे. अध:पतीत आहे’, असं तो सतत म्हणत होता. तो साधू म्हणाला, ‘बस्स एवढंच ! मी तर याहून जास्त पापं केली आहेत,’ असं म्हणून त्यानं आपल्या पापांचा पाढा वाचला. तेव्हा तो माणूस मनात म्हणाला, ‘हा इतका पापी माणूस जर साधू होऊ शकतो, तर मी का होऊ शकणार नाही? ‘ तो निघून गेला. साधूच्या शिष्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘महाराज, आपलं जीवन इतकं निष्कलंक, पवित्र असताना तुम्ही असं का सांगितलंत त्याला? साधू म्हणाला, ‘मी त्याचा माझ्यावरचा विश्वास घालवला. पण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवला. त्याला यावेळी उपदेशाची नव्हे-आपणही चांगले होऊ शकतो या आत्मविश्वासाची गरज होती. ‘

पुस्तकं माणसाला असं समजावून थोडीच घेऊ शकतात? पुस्तकात तत्त्व आदर्श लिहिलेले असतात, पण व्यवहारात ती आचरताना अडचणी येतात. माणूस गांगरून जातो. आपल्याला हे जमणार नाही असं मानून त्यापासून दूर पळतो. अशा वेळी चार पावसाळे पाहिलेला, जगात जगलेला वृद्ध माणूस ‘अरे, असं होतंच.’ असा धीर देऊन योग्य ज्ञान देतो.

अर्थात या ठिकाणी ‘वृद्ध’ म्हणजे केवळ ‘ वयोवृद्ध’ नाही. ज्यांनी जीवनाविषयी काही चिंतन केलंय, ते ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध हे खरे वृद्ध. अशी माणसंच तरुणांचं जीवन फुलवू शकतात. त्यांना ज्ञान देऊ शकतात. असेच वृद्ध जीवनाचं बदलतं रुप समजून घेऊ शकतात आणि म्हणूनच ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ किंवा आजची पिढीच अशी…’ बगैरे शेरे न मारता परिस्थितीशी सुसंगत संदेश देऊ शकतात.
वृद्धांच्या सेवेतून ज्ञान मिळते’ हे मान्य करताना समाजात आज असे वृद्ध किती आहेत? हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही.
त्याचबरोबर जे आहेत, त्यांच्याकडून ज्ञान घेण्याची आमची तयारी आहे का? हाही विचार व्हायला हवा.

आज परीक्षांकरता बाचलेली पुस्तकं वर्तमानपत्रं, नियकालिकं, दूरदर्शन, रेडिओ हीच आपली ज्ञानाची साधनं बनली आहेत. मोठ्या माणसांनी सांगितलेले मागच्या पिढीचे जुने विचार’ म्हणून फेकून देण्याची सवय वाढली आहे. पूर्वी किती सहजपणे आजी-आजोबांच्या गोष्टीतून संस्कार होत होते. आता मात्र आजी-आजोबांचा नातवंडांशी सुखसंवादच होऊ शकत नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात आजी-आजोबा घरी नसतातच. आई-वडील आपापल्या कर्तृत्वाच्या क्षेत्रात मग्न असतात. जेव्हा ही सारी मंडळी काही सांगण्यासाठी रिकामी होतात, तेव्हा मुलांचं संस्कारक्षम वयच निघून गेलेलं असतं. भोवतीच्या मोहमयी बातावरणाची भूल कधीच पडलेली असते. अशा वेळी ‘अनुभवाचे बोल ‘ ऐकण्याची मनस्थिती असतेच कुठे? घरातल्या घरातच एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद बंद होत चाललाय.

झपाट्यानं बदलत्या परिस्थितीत आपल्या पुढच्या पिढीवर असणारे ताण-तणाव वृद्ध समजून घेऊ शकत नाहीत आणि ‘आमच्या वेळी ‘… ची धून वाजत राहाते. याउलट जुनं ते सगळंच टाकाऊ नसतं. त्यातल्या काही गोष्टी याही काळात उपयोगी मार्गदर्शक असतात हे पटवून घ्यायला आजची पिढी तयार नसते. अशा वेळी ‘ज्ञान’ वृद्धांच्या सेवेतून मिळणार कसं? बाहेरचा विचार केला तर ‘गुरू ‘चीही अवस्था फारशी आशादायक नाही.

आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार गुरूंनी मनातून कधीच काढून टाकलाय. त्यांना परीक्षेपुरती माहिती देणं एवढंच ते आपलं काम मानतात. असं म्हणतात, की गुरूची भूमिका ही दूधवाल्यासारखी असते. दुसऱ्यानं भाडं पुढे केलंय की नाही, दूध सांडत नाही ना हे बघून त्याला घालावं लागतं.

तसं गुरूला आपलं ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोचतंय की नाही हे पाहावं लागतं. आजकाल गुरूही दूधवाल्यासारखे नाहीत, तर वर्तमानपत्र टाकणाऱ्या माणसांसारखे झालेत. कुणी उचलला की नाही याचा विचार न करता ते पेपर टाकून जातात. त्याप्रमाणं ‘गुरु’ वर्गात बोलून जातात. मुलांच्या समजण्याचा विचार मुलांनी करावा.

मुळातच ‘ज्ञान’ हे मनातून उमलून येत असतं. ‘शिक्षण’ याचा अर्थही आपलं मूळचं व्यक्तित्व हळूहळू आतूनच विकसित करीत जाणं असा आहे. या अर्थानं पाहिलं तर आपण ज्याला ज्ञान मानतो, ती असते फक्त माहिती आणि ती पुस्तकं, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रं, मासिकं अशा कितीतरी माध्यमातून मिळते. म्हणूनच आज ना ज्ञानाची मागणी आहे, ना वृद्धसेवेची आस ! याला अपवाद फक्त दोन कलांचा संगीत आणि नृत्य या दोन कला अशा आहेत, ज्या पुस्तकातून मिळत नाहीत. आपली कित्येक वर्षांची तपस्या यामध्ये गुरु आपल्या शिष्याला देत असतात. म्हणूनच अजून या क्षेत्रात गुरुसेवेला महत्त्व आहे. ‘ज्ञानं वृद्धसेवया’ याचा खरा अर्थ इथे कळतो.

इतर सगळ्या क्षेत्रात मात्र ‘बहुश्रुत’ पणापेक्षा ‘वेल-रेड’ असणंच आता प्रतिष्ठेचं होतं आहे. एक मात्र खरं आहे, विद्या पुस्तकातून आलेली असू दे नाही तर ऐकण्यातून, ती आत्मसात करून वागण्यात उरतलेली असेल, तरच ती उपयोगाची. अन्यथा पुस्तकातली विद्या आणि ऐकून सोडून दिलेल्या गोष्टी साया सारख्याच निरुपयोगी !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..