खरडुनी अक्षरे पुन्हा पुन्हा
ज्ञान येऊनि प्रवाह आटतो
समज येण्यासाठी नंतर
आपलाच कोणी उभा ठाकतो!
अर्थ–
ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग या जगात आहेत, एक- अभ्यास करून, वाचून, पाठांतर करून, घोकून, लिहून मिळणारे ( पुस्तकी ) ज्ञान.
दोन- या जगात, निसर्गात खुलेपणाने जगायला गेलं की लबाडीने मिळणारे, स्वार्थीपणाचा कस लागणारे, पोटास द्रव्य हवे म्हणून कराव्या लागणाऱ्या कामाच्या अनुभवातून मिळणारे ज्ञान.
मधे एका ओळखीच्यांकडे कडे जाणं झालं, त्यांच्या घरी गेल्यावर त्यांचा मुलाशी ओळख झाली. ५ वर्षाचा त्यांचा मुलगा श्लोक, सोत्र, संगीताची पदं, संस्कृत सुभाषित वगैरे जिन्नस म्हणण्यात एकदम पक्का आहे असे कळले. मग त्यांच्या आग्रहाखातर एखादी झलक होऊन जाऊदे या योजने अंतर्गत पुढची १५ मिनिटे कान शाळेत न समजलेली सुभाषिते ऐकण्यात आणि संधी सोडवता सोडवता जीभ वळते की काय अशी स्तोत्रे ऐकण्यात मग्न झाली. त्या मुलाचं कौतुक वाटलंच मला. मी तसं केलंही लगेच कौतुक पण नंतर मी विचारलेल्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर ऐकून मात्र मी काळजीत पडलो.
आमचा मुलगा एक पाठी आहे हो हे कौतुकाने सांगितले पण नंतर त्या मुलाच्या मुखात मिर्झापूर, सेक्रेड गेम्स या सारखी नावं यायला लागली आणि मात्र माझं टेन्शन वाढलं. एकपाठयास शिवी ऐकू येत नाही ? याचं विचाराने माझं डोकं सुन्न झालं आणि मी तेथून काढता पाय घेतला.
केवळ पुस्तकात निसर्ग अभ्यासणे आणि त्यातल्या गमतीदार गोष्टी आत्मसात करणे याने काय होणार? मोगरा जर सायंटिफिक नावाने ओळखता आला तर त्यात कौतुक आहे पण जर प्रत्यक्ष कधी पाहिलाच नाही तर त्याचा सुगंध किती सुंदर असतो हे कसे कळणार?
म्हणून केवळ पुस्तकात विश्व शोधण्यापेक्षा या विश्वात फेरफटका मारावा म्हणजे चांगले-वाईट सगळे धडे आपल्याला जगातल्या माणसांकडून मिळतात आणि त्यात आपली माणसे आघाडीवर असतात.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply