राजा राममोहन रॉय हे बंगालमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धीचे असलेले राममोहन रॉय यांनी सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेदाचा तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तर ते काही काळ काशीलाही (बनारस) जाऊन राहिले होते. सर्व चराचरात व्यापून राहिलेला परमेश्वर एका मूर्तीत कसा असू शकतो याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते मूर्तिपूजाविरोधक बनले. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व रुढी धर्ममार्तंडांनी स्वतःच्या फायद्यासाठी व स्वतःचे वर्चस्व समाजावर राहण्यासाठी सुरू केल्या, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा अनिष्ट रुढींना धर्मग्रंथात कोठेही थारा नाही हे त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखविले. त्यामुळे त्या काळच्या समाजात ते अप्रिय बनले. त्यांच्या या सुधारकी विचारांमुळे वडील रागावल्यामुळे खुद्द त्यांना स्वतःचे घर सोडावे लागले. त्या काळी समाजामध्ये सतीची चाल रुढ होती. विशेषत : बंगालमध्ये सतीच्या चालीमुळे अनेक बालविधवा चितेच्या भक्ष्यस्थानी पडत होत्या.
राजाराममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट चालीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेमक्या त्याच वेळेला त्यांच्या मोठया भावाचा साथीच्या रोगामुळे मृत्यू झाला व त्याच्याही तरुण पत्नीला चितेवर चढून बळी जावे लागले. सर्वांच्या साक्षीने ढोल बडवित झालेला हा समारंभ पाहून राममोहन रॉय यांना तीव्र धक्का बसला. त्याच दिवशी त्यांनी प्रतिज्ञा केली की, ही सतीची अमानुष चाल बंद केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यांनी या चालीविरुद्ध समाजजागृती करण्यास प्रारंभ केला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बेटिंग यांना भेटून सतीची चाल कशी धर्मविरोधी आहे हे त्यांनी पटवून दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले व लॉर्ड बेटिंगने सतीची चाल बंद करण्याचा कायदा केला. त्यामुळे राजा राममोहन गॅय हे खरेखुरे समाजसुधारक बनले.
Leave a Reply