कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।
कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।
निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।
मानवाच्या हाती लागली । ‘कला’ कल्पकतेची ।।
विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।
प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरविले ।।
दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।
विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।
मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।
स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।
आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।
युक्ती चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।
घारीच्या द्दष्टीतील तीक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।
कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी स्वासांनी जे हरवले ।।
नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।
उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।
आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।
दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।
सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।
हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।
जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।
मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply