जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.
महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.
या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.
पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे
खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।
Leave a Reply