रात्रीचे दहा वाजले होते. दिवसभरराची ड्युटी संपवून यमराज रिपोर्टिंगसाठी चित्रगुप्ताकडे पोहोचले. चित्रगुप्ताने यमराजला पाहून आपला लॅपटॉप ‘शट्डाऊन’ केला व महालात ते शतपावली करु लागले. यमराजांच्या चेहऱ्यावरुन ते वैतागलेले आहेत हे, चित्रगुप्तानं ओळखलं.. आणि त्यांच्या शेजारी आसनावर बसत विचारलं, ‘मित्रा, तू फारच त्रासलेला दिसतो आहेस, काय घडलंय ते मला जरा सविस्तर सांगशील का?’
यमराज बोलू लागले… ‘काय ‘घडलंय’ काय विचारताय मला, पृथ्वीवर सगळंच ‘बिघडलंय’.. गेल्या दोन वर्षांपासून या कोरोनामुळे माझ्या शेड्युलचं अगदी ‘वाट्टोळं’ झालंय.. सगळ्यां कोरोना केसेसना वरती आणता-आणता, आम्ही दोघेही पार दमून गेलोय..
वर्षातून एकदाच येणारा, माझा ‘वट पौर्णिमेचा सण’ या तमाम मराठी मालिकावाल्यांनी, त्यांच्या कथानकातील ‘कट कारस्थानां’नी उधळून लावलाय.. पूर्वी साधंसुधं ‘दूरदर्शन’ असताना वट सावित्रीच्या व्रत वैकल्याचे, या दिवशी गोडवे गायले जायचे. या दिवसाचं निमित्त साधून वट पौर्णिमेचं एखादं गाणं किंवा प्रसंग असलेला मराठी चित्रपट आवर्जून दाखवले जायचे. त्याकाळातील सुलोचना, आशा काळे, इंदुमती पैंगणकर, उमा भेंडे, अलका कुबल, इ. सोज्वळ नायिका, मला प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत, भक्तीभावाने सुमधुर गाणी म्हणायच्या..मला अगदी कृतकृत्य वाटायचं..
‘दूरदर्शन’ तर आता दूरच राहिलं आहे. या सतराशे साठ वाहिन्यांनी माझा ‘भेजाफ्राय’ करुन टाकलेला आहे. मराठी मालिका पूर्वी चांगल्या आशयघन असायच्या. त्यांची कथानकं, पात्रं ही आपल्या घरातीलच वाटायची. त्याला कारणही तसंच होतं. मालिकेचे भाग हे तेरा किंवा फारतर सव्वीस पर्यंतच असायचे. नंतर या नवीन मालिका वर्षभर चालू राहू लागल्या. मूळ कथानकात पाणी घालून, घालून दोन वर्ष, तीन वर्ष त्या घरातील संसारी स्त्रियांना ‘पिडू’ लागल्या..
या कौटुंबिक मालिकांमधून, हळूहळू वर्षातील सगळे सणवार साजरे होऊ लागले. त्यामुळे घरातील स्त्रियांना अलीकडे कॅलेंडर पहाण्याची गरजच उरलेली नाही. गणपती येण्याच्या आधी आठवडाभर त्या भागाचे प्रोमो पहायला मिळाल्याने, त्या त्या सणाची तयारी घराघरात आपोआप होऊ लागली..
चित्रगुप्ता, मला देखील तो भिंतीवरचा टीव्ही न पाहता माझ्या मोबाईलवरच या मालिका पहाण्याची तीव्र इच्छा झाली, त्यासाठी मी ‘अंबानी’च्या दारात जाऊन, फक्त उभा राहिलो…त्यानं लागलीच मला एक आयफोन भेट दिला व त्याचा लाईफटाईमचा ‘नेटपॅक’ भरुन दिला, त्यामुळे मी आता माझ्या आवडीची कोणतीही मालिका, कुठेही पाहू शकतो..
गेल्या वर्षी मी आसावरी व बबड्याची मालिका कामातून वेळ काढून, न चुकता पहायचो. त्यामध्ये मला न पटणाऱ्या अनेक गोष्टी होत्या, तरीदेखील केवळ ‘गोड चेहऱ्याच्या’ शुभ्रासाठी मी ते सहन करायचो. त्या ‘वेड्या’ सोहमचं वागणं मला अजिबात पटायचं नाही. आसावरीनं नको तेवढे लाड करुन त्याला बिघडवून टाकलेला, तिथं बिचारा अभिजित तरी काय करणार? मालिकेच्या शेवटी अभिजित, राजा हरिश्चंद्राप्रमाणे आपलं हॉटेल सोहमला देऊन टाकतो व चाळीत राहू लागतो तेव्हा मला मालिकेच्या लेखकाची किंव करावीशी वाटू लागली. एकदाची ती मालिका संपली व मी तिच्या त्या भयंकर जाचातून सुटलो…
मार्च पासून तीच मालिका थोडा नावात बदल करुन पुन्हा सुरु झाली. एरवी घरात फराळाचे पदार्थ करुन त्याची विक्री करणारी आसावरी, हेलिकॉप्टरमधून ऑफिसला जाताना पाहून मी चक्रावूनच गेलो. पुन्हा सोहम बदलला. शुभ्रा बदलली. आता सोहम आईला, आई ऐवजी ‘मॅडम’ म्हणू लागला. तिने त्याला आपल्या ऑफिसमध्ये कामाला ‘पगारी नोकर’ म्हणून ठेवलेलं आहे. आता शुभ्राला एक लहान मुलगा असताना, सोहमचे आपल्या सेक्रेटरी, सुझानसोबत ‘अफेअर’ चालू आहे.
अभिजितने अनेकदा प्रयत्न करुनही सुझानचे झेंगट, सोहम पासून काही सुटत नाही. सोहम, सुझानला ‘पत्नी’पद बहाल करण्याचं दिवा’स्वप्नं’ पहातो आहे…अशी मालिका भरकटताना पाहून माझं डोकं, गरगरायला लागतं रे… चित्रगुप्ता!
साहजिकच या मालिकेची लोकप्रियता खूपच कमी झालेली आहे. त्याचं टायटल सुरु झालं की, रिमोटने चॅनल बदललं जातं. या कलाकारांना त्यांचं मानधन मिळाल्याशी कारण…मग मनाला न पटणारी ही भूमिकाही साकारायला ते एका पायावर तयार!! पूर्वी भूमिका पटणारी नसेल तर ती नाकारणारे, स्वाभिमानी कलाकार होते…आता पैसे मिळत असतील तर, वाट्टेल तशी भूमिका साकारण्यासाठी नामवंत कलाकारांची तयारी आहे..
कालच्या भागातल्या शेवटी मी आजचं ‘ट्रेलर’ पाहिल्यावर माझं डोकं भडकलं..त्यात आसावरी व शुभ्रा माझं व्रत पूर्ण करण्यासाठी वडाची पुजा करायला येतात, तर तिथं डोक्यावरील पदराने तोंड झाकलेली ‘खवट’ सुझान, पायात चप्पल घालून पुजा करायला हजर असते.. शुभ्रा तिचा तोंडावरील पदर काढते, तेव्हा आसावरीला सुझानचं ‘कारस्थान’ कळतं..
घरी गेल्यावर सोहम, सुझानला म्हणतो, ‘या वर्षी तुला वट पौर्णिमेची पुजा करता आली नाही तरी पुढच्या वर्षी तू नक्कीच करशील…’
चित्रगुप्ता, मला आता हे सहन होत नाही रे…आपल्या भारतीय संस्कृतीची, या मराठी मालिकावाल्यांनी वाट लावून ठेवली आहे. मी सहजच या मालिकेच्या लेखकांची माहिती पहायला गेलो तर चाट्च पडलो.. हिची कथा, पटकथा व संवाद लिहिणाऱ्या तिन्ही, स्त्रियाच आहेत…आता स्त्रियाच जर असं लिहू लागल्या, तर विषयच संपला….
चित्रगुप्ता, माझं डोकं आता भणभणायला लागलंय..तू माझं एक काम कर.. फ्रिजमधली माझी, ती थंडगार पाण्याची बाटली दे बरं.. बघूया, ते पाणी पिल्यावर तरी माझं डोकं ‘शांत’ होतंय का…अन्यथा अॅस्प्रो, अॅनॅसिन, सॅरिडॉनच्या गोळ्या खाण्याशिवाय, दुसरा कोणताही पर्यायच नाही माझ्याकडे….’
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-६-२१.
Leave a Reply