नवीन लेखन...

खेळावेसे वाटले म्हणून

पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास. उत्साहात शिकविणारे दाभोळकरसर अचानक बेसावध असणाऱ्या,हिंदी भाषेसाठी एकदा “बादल-बिजली-बरखा” क्लासमधे “सलीम-जावेद” सरांची शिकवणी लावल्यानंतर मग अजून ‘काय शिकवायचे ( किंवा शिकायचे) असते हो त्याच्यात ?’ असा पुलंच्या रावसाहेबांसारखा मुलभूत प्रश्न पडलेल्या आणि केवळ शरीराने वर्गात पण मनाने वर्गाबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्याला उठून उभे राहायला सांगतात.

शायर शाह हातिम म्हणतो ,
तुम कि बैठे हो एक आफत हो
उठ खडे हो तो क्या कयामत हो।
‘आप इस शब्द का बहुवचन किजिये….. लकडी’
“सर…..सर”
‘बताइये….. बताइये’
“सर…… लडकीया”….नरी कॉन्ट्रॅक्टरच्या अंगावर चार्ली ग्रीफिथचा बाऊन्सर यावा तशा आलेल्या या प्रश्नाने हडबडलेला तो मुलगा बाऊन्सर चुकविण्याच्या प्रयत्नात हिटविकेट होतो.

‘आप कृपा करके कक्षा के बाहर जाईये’….अंपायरचे बोट वर जाण्याऐवजी दरवाजाच्या दिशेने वळते. मंडळी,वाचकप्रिय कादंबरीकार कै. नाथमाधवांच्या शब्दांत सांगायचे तर तो स्वयंचित होऊन, मान खाली घालून,इतर खेळाडूंच्या नजरा चुकवित मैदान सोडणारा फलंदाज मी होतो हे आमच्या ( चाणाक्ष, सुजाण इ.) वाचकांनी ओळखले असेलच.
त्यानंतर बरोबर तेरा वर्षांनी ( म्हणजे वनवास संपल्यावर पण अज्ञातवास सुरु होण्याआधी) निव्वळ नझीर हुसेन व मनमोहन देसाईंच्या सिनेमात ( मध्यंतरानंतर ) शोभून दिसेल असा योगायोग माझ्या आयुष्यात आला आणि दाभोळकरसरांच्या चुलतमेहुणीच्या नणंदेशी माझे शुभमंगल झाले.काहीकाळाने ( विषाची परीक्षा नको म्हणून ) संसार स्थिरस्थावर झाल्यावर मी एका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या ( कुटुंब बायकोचे.. जिव्हाळा माझा ) कार्यक्रमात मी दाभोळकरसरांना “त्या” प्रसंगाची आठवण करुन दिली.

आपल्याला बसलेल्या मानसिक धक्क्याचे व पडलेल्या चेहेऱ्यावरचे भाव संजीवकुमारलाही लाजवतील अशा अभिनयकौशल्याने लपवत व घशात अडकलेला श्वास अर्ध्या लिटर पाण्याने परत पोटात ढकलत ‘मांडवली’ करायच्या उद्देशाने ते समजावणीच्या सुरात म्हणाले….”काय आहे जावईबापू,मी सहसा कोणत्याही विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढत नाही. मुलं आहेत,ती थोडाफार दंगा करणारच.पण त्यादिवशी माझा अगदी नाईलाज झाला असणार.म्हणजे तुम्ही मुद्दामून तसे उत्तर दिले असे म्हणत नाही मी, गडबडीत असे होते कधीकधी. पण मी पाचच मिनिटांनी तुम्हाला परत वर्गात बोलवायला मुलगा पाठविला होता. तुम्ही बाहेर नव्हतात.तो पूर्ण मजल्यावर चक्कर मारुन आला पण तुम्ही बहुदा घरी गेला असणार.” सरांनी बचावाचे भाषण पूर्ण केले आणि आता खुलाशाच्या अपेक्षेने ते माझ्याकडे पाहू लागले.
मी शोएब अख्तरइतका स्टार्ट घेऊन सुरुवात केली….”घरी नाही सर, मी पार्कात ( अर्थातच शिवाजीपार्कात ) गेलो होतो. त्यादिवशी शिवाजीपार्क जिमखाना विरुद्ध दादर युनियनची कांगालीगची मॅच चालू होती. मी (अनिच्छेने) वर्गात येईपर्यंत ‘मार्शल’ विठ्ठल पाटीलांनी व मिलिंद रेगेने शिवाजीपार्कला ३६ धावात उखडले होते. तुम्ही मला वर्गाबाहेर काढून मी पार्कात पोहोचेपर्यंत सुनिल गावस्कर आणि रामनाथ पारकर ( सुनिल आणि रामनाथ यांनी दादर युनियन , मुंबई आणि पश्चिम भारतासाठी दीर्घकाळ आणि भारतासाठीही काही काळ सलामी दिली.) फलंदाजीसाठी मैदानात उतरत होते.” ….मॅच फिक्सिंगच्या आरोपांत पकडल्यावर विधु दारासिंगने पोलिसांसमोर द्यावी तशी मी सरांसमोर धाडधाड कबुली दिली.पण अझरुद्दीनची शपथ, मी खरे तेच सांगत होतो.

३६ धावा खूपच कमी आहेत याची मैदानावर सगळ्यांनाच कल्पना होती. सामना आम्ही हरणारच होतो.पण आम्हाला सुनिल-अब्दुल इस्माईल जुगलबंदीची जास्त उत्सुकता होती.इस्माईलने गोलंदाजीला सुरुवात केली आणि चौथ्याच चेंडूवर धारदार इनस्विंगरवर त्याने सुनिलची उजवी यष्टी उखडून टाकली. यंव ये गब्रू! त्याक्षणी पार्कात जमलेल्या तीन ते चार हजार दर्दी प्रेक्षकांनी केलेला जल्लोष मला विसरु म्हणता विसरणे शक्य नाही. सुनिल आम्हाला जवळचा होताच पण अब्दुल इस्माईल आम्हाला “जास्त जवळचा” होता. म्हणजे बघा , जेव्हा सेना-भाजप युती असते तेव्हा ठीक आहे, पण युती नसते तेव्हा,तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालेला,तुम्हाला नावाने ओळखणारा, तुमच्या शेजारच्या आजोबांच्या आजारपणात मध्यरात्री अँब्युलन्स व रक्तासाठी धावाधाव करणारा व दिवाळीच्या चार दिवस आधी न चुकता सुगंधी उटणे पाठविणारा शिवसेनेचा नगरसेवक तुम्हाला “जास्त जवळचा” वाटतो ना, अगदी तसेच.

‘चंद्रशेखर हाच भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज’ असे WhatsApp वर शोभणारे ‘पीजे’ मारायचे व मंदगती गोलंदाजांचे आवडत्या सुनेसारखे डोहाळे पुरवायचे ते दिवस होते. अब्दुल इस्माईल, पांडुरंग साळगावकर, बारुन बर्मन, गोविंदराज या व इतर जलद गोलंदाजांच्या नशिबी कायम नावडतीची उपेक्षाच आली. जलद गोलंदाजांना सुगीचे दिवस नंतरच्या,म्हणजे करसन घावरी व कपिलदेवच्या काळात सुरु जाहले. तळपत्या उन्हात भेदक मारा करुन डावात आठ बळी घेऊनही “मॅन ऑफ द मॅच” न मिळाल्यामुळे वैतागलेल्या मायकेल होल्डिंगने जणू भारतीय जलद गोलंदाजांची व्यथाच एकदा बोलून दाखवली …”मान, इथे जलद गोलंदाजांनी फक्त घाम गाळायचा असतो आणि विकेट काढायच्या असतात, बस्स.अजून काही अपेक्षा ठेवायच्या नाहीत.” अब्दुल इस्माईलला जिमखान्यावर मिळणारी प्रत्येक टाळी ही त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनापोटीच पडत असावी.

शायर वहिदुद्दीन वहीद म्हणतो ,
हमने अपने आशियाने के लिये
जो चुभे दिल मे , वही तिनके लिये।
मला आठवतंय ,

शिवाजीपार्क जिमखान्याची ( नरेन ताम्हाणेंच्या) दादर पारसी झोराष्ट्रीयन संघाबरोबर मॅच होती.अजित नाईकचे लागोपाठ तीन आऊटस्विंगर्स झोराष्ट्रीयन संघाच्या नवख्या फलंदाजाच्या बॅटच्या कानात गडकरी चौकातल्या रोडसाइड रोमियोसारखी शीळ घालून विकेटकीपर पपा कारखानीसच्या ग्लोव्हजमधे विसावले. आपण काही आठवड्यांपूर्वी हिंदू कॉलनीत मित्रांसोबत गोट्या खेळत होतो तेच बरे होते असा पश्चातापी भाव त्या फलंदाजाच्या चेहेऱ्यावर दिसत होता. इतक्यात गोलंदाजाच्या बरोब्बर मागे उभा असलेला एक १०/१२ वर्षाचा मुलगा वीसेक पावले पुढे जाऊन ‘कृष्णकुंज’ची झोपमोड होईल इतक्या खणखणीत आवाजात अजितला म्हणाला ….”अरे राजा, स्टिकवर मार….. स्टिकवर मार.” अख्ख्या मैदानात हास्याची लहर पसरली. बॉलिंगएन्डला उभे असलेले आंतरराष्ट्रीय पंच मामसादेखिल खिशातून सफेद रुमाल काढून त्यात तोंड लपवून हसू लागले. हसला नाही तो एकटा अजित. त्याने नव्याने बॉलिंग रनअप घेतला आणि मिळालेल्या आदेशानुसार पुढचा चेंडू स्टंपांत टाकला.यावेळेस चेंडूच्या ऐवजी पपाच्या हातात मधली यष्टी होती. ‘सुईण’ वेळेवर आल्यामुळे सुखरुप ‘सुटका’ झाल्यासारखी त्या फलंदाजाची देहबोली होती आणि अजितच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होते. तो मुलगा उभा होता त्या घोळक्याच्या दिशेने अजितने हात उंचावत कामगिरी फत्ते झाल्याची पोचपावती दिली. त्या मुलाचे काही चुकले होते असे मैदानातल्या एकाही जाणकार प्रेक्षकाला वाटले नाही. किंबहुना तो त्यांना आपला प्रतिनिधीच वाटला. आपल्या पोराला ‘बाबा’ म्हणायच्या आधी ‘बॅट’ म्हणायला शिकविणाऱ्या बापाच्या आणि त्याला भिंतीला धरुन उभे रहायला शिकविण्याआधी ‘स्टंप’ला धरुन उभे रहायला शिकविणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला तो अस्सल शंभर नंबरी शिवाजीपार्कीय,सच्चा भूमिपुत्र होता. त्याने अजित नाईकला सल्ला दिला तर त्यात त्याचे काय चुकले ? त्याचा तो  जन्मसिध्द हक्कच होता.
शायर शाहिद कबीर म्हणतो,
अपना ही वहम कू-ब-कू(गल्लोगल्ली) बोला
मैं ये समझा कही से तू बोला।
८५/८६ साली पोटाची खळगी भरण्यासाठी मी पाताळगंगेला एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होतो. आम्ही ज्या कंपनीसाठी फॅक्टरी बांधत होतो त्या कंपनीचे फायनान्स मॅनेजर अत्यंत गंभीर (म्हणजे खडूस) आणि शिस्तप्रिय (म्हणजे जाम कडक) असल्याचे मला आतल्या गोटातून कळले. मी एक बिल सबमिट केल्यावर ते बिलाच्या फॉरमॅटवर नाराज असून त्यासंदर्भात त्यांनी भेटायला (म्हणजे बोंबला) बोलावल्याचा निरोप मला मिळाला.

‘दीपक प्रधान, सी.ए.’….अशी चकचकीत पितळी पाटी लावलेला शिसवी दरवाजा ढकलून मी आत गेलो.
“येस…. काय काम आहे ?”
‘मी ते बिलाच्या फॉरमॅटच्या संदर्भात…..’
“हो… हो… हे बिल चालणार नाही… बदलून द्यावे लागेल”
‘ठीक आहे… कसे पाहिजे सांगा… बदलतो मी’
“मराठी दिसतोस तू… नाव काय?”
मी नाव सांगितले.
“राहायला ?”
‘आधी दादरला होतो….नुकताच ठाण्याला आलो’
“दादरला… अरे वा !”….त्यांच्या चेहेऱ्याचे दोन स्नायू वितळल्याचा मला भास झाला.
” शाळा कोणती ?”….( नशिब… जन्म डॉ.गुप्त्यांच्या हॉस्पिटलमधला की डॉ. नायरांच्या ते त्यांनी विचारलं नाही.)
‘बालमोहन’
“अरे मी पण बालमोहनचाच ….तू उभा का ? बस की..”

अभ्यासावर काही विशेष बोलण्यासारखं (माझ्याकडे) नसल्यामुळे मी डेनिस लिलीने चेंडूगणित एकेक स्लिप वाढवत न्यावी तसा आधी शिवाजीपार्क मग क्रिकेट आणि शेवटी कांगालीग असा एकेक विषय वाढवत नेला. मी गेल्याच रविवारी गुरु गुप्तेने घेतलेल्या एका कॅचचे गुणगान केल्यावर ते पर्थच्या खेळपट्टीप्रमाणे उसळून म्हणाले…”अरे तू काय सांगतोस मला (तुझ्या) गुरु गुप्तेचं कौतुक ? आम्ही स्लीपमधे अजित (वाडेकर) ला मैदानावर कोपर टेकून एकसेएक झेल घेताना पाहिलं आहे.” कदाचित नुसते वर्णन करुन माझ्या डोक्यात (मी ठाण्याला राहायला गेल्यामुळे) प्रकाश पडणार नाही असे वाटल्याने, क्षणार्धात प्रभाकर पणशीकरांच्या ‘तो मी नव्हेच !’ नाटकाच्या फिरत्या रंगमंचावर नेपथ्य बदलावे त्याप्रमाणे त्यांच्या समोरच्या प्रशस्त टेबलाचे शिवाजीपार्क मैदान झाले. काचेखाली पसरलेल्या हिरव्यागार मखमलीचे खेळपट्टीत आणि काचेच्या पेपरवेटचे चेंडूत रुपांतर झाले.आणि खुद्द प्रधानसाहेबांचा हात, एकेकाळी रे इलिंगवर्थच्या इंग्लिश आणि गॅरी सोबर्सच्या वेस्ट इंडियन संघावर पडलेल्या ‘अजित’च्या अजिंक्य हातासमान भासू लागला. त्यांनी मला तिथल्यातेथे वाडेकरने घेतलेल्या २-३ झेलांचे प्रात्यक्षिक दाखविले.मी थोडा आग्रह केला असता तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्कात मला (व बिचाऱ्या गुरु गुप्तेला) त्या झेलांचा लाइव्ह डेमोसुद्धा दिला असता. कॉफीपान झाल्यावर निघतानिघता मी विचारले….’तो बिलाचा फॉरमॅट ?’

“ते जाऊदे आता…. यावेळेस चालवून घेतो, तुला नविन फॉरमॅट नंतर देतो मी…पुढच्या वेळेस त्या फॉरमॅटमधे बिल दे.’
…. प्रधानसाहेबांनी मला सव्वीस स्नायूंचा वापर करत हसऱ्या चेहेऱ्याने निरोप दिला.
त्यानंतर प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत आणि झाल्यावरही मी त्यांना खूपदा भेटलो. फॅक्टरीत भेटलो,त्यांच्या हेडऑफिसला भेटलो आणि शिवाजीपार्कातही भेटलो. त्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकातील पार्कातील दैदीप्यमान क्रिकेटच्या इतिहासाचा खजिनाच मला उघडून दिला; पण शेवटपर्यंत त्यांना अपेक्षित असलेला बिलाचा फॉरमॅट काही दिला नाही.आणि खरेच सांगतो, मीदेखील तो मागितला नाही.तुम्हीच सांगा, राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद यांच्या सुवर्णयुगाची चर्चा सुरु असताना कोणी (ठाण्याचा) शहाणा माणूस अनिल धवन, विजय अरोरा आणि राकेश पांडे (हे तीन वेगवेगळे जिवाणू होते की एकाच विषाणूची ही तीन नावे होती ते इसाक मुजावरच जाणोत) यांचा विषय तरी काढेल का ?

शायर राही म्हणतो,
तेरी क़ुद्रत का करिश्मा पसेमंज़र(आश्चर्यकारक) निकला
बुझ गई आग ज़मीं कि तो समंदर निकला।

“आधी उडतो चिखल आणि मग येतो चेंडू” असे कोणीतरी पावसाळ्यात होणाऱ्या कांगालीग स्पर्धेचे यथार्थ वर्णन केले आहे. पण हा चिखल राजीखुषीने अंगावर कोणकोण उडवून घेत असत ? एकदा यादी तरी नजरेखालून घाला.
विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर(शिवाजीपार्क जिमखाना),सुनिल गावस्कर, रामनाथ पारकर, दिलीप वेंगसरकर(दादर युनियन),एकनाथ सोलकर(हिंदू जिमखाना),सलीम दुराणी(खार जिमखाना) आणि अशोक मांकड(जॉली जिमखाना). तरी मी फक्त कसोटी क्रिकेट खेळलेले व स्मरणशक्तीला फारसा ताण न देता आठवलेले खेळाडूच सांगितले आहेत. रणजी सामने खेळलेल्या खेळाडूंची यादी केली तर ती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (अर्थातच जनतेच्या कल्याणासाठी) पक्षत्याग केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षाही मोठी होईल.

शहाण्या माणसाने कधी आठवणींना आवतण देऊ नये म्हणतात.त्या येताना एकट्या दुकट्या येत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्याने उत्साहाने आपल्या लग्नाला बोलविलेल्या आमदाराने सोबत पंचवीस तीस फुकट फौजदारांचा लवाजमा आणावा आणि त्यामुळे लग्नमंडप भरुन जावा त्याप्रमाणे या आठवणी तुमच्या मनात भाऊगर्दी करतात आणि तुम्ही वधुपित्याप्रमाणेच सैरभैर होता.

शायर फ़िराक़ गोरखपुरी म्हणतो
मुद्दतें गुज़रीं तेरी याद भी आई न हमें
और हम भूल गये हों तुझे, ऐसा भी नही।
आठवण, वेस्टइंडीजला स्थायिक झालेल्या पण काही कामानिमित्त भारतात आलेल्या आणि शिवाजीपार्क जिमखाना विरुद्ध दादर युनियन सामन्याला,भूतकाळाचा पदर पकडून, पार्कात दिवसभर आवर्जून हजेरी लावलेल्या महान लेगस्पिनर सुभाष गुप्तेची.

आठवण, आपल्या हातात खुदाने दिलेली बॅट ही केवळ षटकार ठोकण्यासाठीच आहे या सिद्धांतावर नितांत श्रद्धा असलेल्या,कधीकाळी परवीन बाबीचा नायक झालेल्या,रोमन नायकाप्रमाणे देखण्या व रुबाबदार प्रेक्षकप्रिय सलीम दुराणीची.

आणि आठवण, डॉ. एच. डी.कांगांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळल्या जाणाऱ्या कांगालीग स्पर्धेत , एका मोसमात ९२ बळींचा विक्रम करणाऱ्या, कसोटी क्रिकेटचा टिळा न लागलेल्या, कमनशिबी पण शिवाजीपार्कवासीयांची ‘मर्मबंधातली ठेव’ असणाऱ्या, कांगालीगच्या अनभिषिक्त सम्राटाची,पद्माकर उपाख्य पॅडी शिवलकरची.पॅडीला लयबध्द चालीने पल्लेदार डावखुरी मंदगती गोलंदाजी करत,भल्याभल्या फलंदाजांना ‘मामा’ बनवत,प्रतिस्पर्धी संघाची चटणी करताना पहाणे हे चार्ली चॅप्लिनचा “मॉडर्न टाइम्स” अनुभवण्याइतकेच किंवा आर.के.लक्ष्मणांची मठ्ठ व बथ्थड चेहेऱ्याच्या पण भ्रष्ट व पाताळयंत्री पुढाऱ्यांवरची व्यंगचित्रमालिका पहाण्याइतकेच आनंददायी होते.

एक शेवटची आठवण सांगतो.
मी दहावीला असताना,नेहमी जाहीर करतात त्याप्रमाणे एका सोमवारी आमचा निकाल (की निक्काल ?) लागणार असल्याची घोषणा झाली. मी रविवारी रंगात आलेला शिवाजीपार्क जिमखाना व (गोपाळ कोळींच्या) न्यू हिंद क्लबचा सामना बघत असताना, दुपारी ३.३० वाजता शाळेत निकाल आल्याचे माझ्या आईला घरी कळले. आता १८ एकरच्या पार्कात मला शोधणार कुठे ? पण शिवाजीपार्क संप्रदायाचाच जेष्ठ वारकरी असलेल्या माझ्या मामाने तिला आत्मविश्वासाने सांगितले…

“जिमखान्याला लागूनच सिमेंटचा लांबलचक ओटा आहे. तिथे कॅन्टीनसमोरच्या जागेवर संदीप बसलेला असेल बघ. संदीपची ती ‘राखीव’ जागा आहे.”आणि विशेष म्हणजे अक्षरशः कोणाकडेही चौकशी न करता आई थेट माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यानंतर (आयुष्यात पहिल्यांदाच) सामना अर्धवट सोडून अत्यंत नाइलाजाने व दुःखद अंतःकरणाने शिवाजीपार्ककडे पाठ करुन मी शाळेचा रस्ता ओलांडला.

शायर बशीर बद्र म्हणतो,
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए।
मी मॅच पहायला पार्कात गेलो होतो हे कळल्यावर (तेरा वर्षांनी का होईना) पण माझ्या पाठीवर पसंतीची थाप मारुन,मला माफीच्या साक्षीदाराप्रमाणे ‘माफीचा जावई’ म्हणून स्वीकारणारे ( व नंतर शाळेचे मुख्याध्यापक झालेले) दाभोळकरसर मध्यंतरी, देवपुत्रांची हिंदी सुधारण्यासाठी पुष्पक विमानातून स्वर्गलोकी रवाना झाले.वयाच्या ४९ व्या वर्षीच आयुष्याचा सामना अर्धवट सोडून अजित नाईकदेखील अकाली पॅव्हेलियनमधे परतला. आमचे दीपक प्रधानसाहेब शिवाजीपार्कची जागा सोडून पुण्याला स्थायिक झाले.(मात्र तरीही गुरु गुप्ते अजूनही हिंदू कॉलनीत रहातो की नाही हे कोणाला विचारायची आजही माझी हिंमत नाही.)

पहाटेच परदेश दौऱ्याहून भीमपराक्रम करुन परतल्यावर, जेटलॅगचा बागुलबुवा न करता,सकाळी कांगालीग सामन्यासाठी माटुंग्याच्या दडकर मैदानात हजेरी लावणारे सुनिल गावस्करसारखे खेळाप्रती निष्ठा असणारे खेळाडू आजकाल दिसत नाहीत. आणि सुनिलच्या या आदर्श वृत्तीची केवळ टेबलन्यूज न करता,त्याचा स्पोर्ट्स शॉर्ट घातलेला, हातात किट घेऊन मैदानात येतानाचा फोटो दुसऱ्या दिवशीच्या महाराष्ट्र टाइम्समधे कौतुकाने छापणारे सज्जन क्रीडापत्रकार चंद्रशेखर संतदेखील आज हयात नाहीत. दादरच्या सीकेपी हॉलला आपल्या सख्ख्या भाचीचे (अथवा पुतणीचे) लग्न असूनही,सीमांतपूजन,लग्नघटीका,जेवणाची पंगत व रिसेप्शन या गडबडीत मधल्या वेळेत, लग्नाच्याच पोषाखात सामना बघायला पार्कात धाव घेणारे क्रिकेटरसिक तरी आता कुठे आहेत ?

त्यात भरीसभर म्हणून मध्यंतरी मुंबईतील क्रीडागणांच्या दुरावस्थेमुळे व मुंबईची ‘तुंबई’ करणाऱ्या बेभरवशी पावसामुळे कांगालीगच्या ऐकूण १३ राउंड्स पैकी धड ३-४ राउंड्स सुध्दा होईनात. जेव्हा दिलीप वेंगसरकरकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनची धुरा आली तेव्हा या साऱ्या परिस्थितीला वैतागुन त्याने पावसाळ्याच्या उत्तरार्धातच ही स्पर्धा घ्यायला सुरुवात केली.

शेवटी खंत तरी कशाकशाची म्हणून बाळगायची ?
शायर म्हणतो,
रात ही रात मे तमाम,
तै हुए उम्र के मुकाम,
हो गई जिंदगी की शाम,
अब मै सहर को क्या करु ?
आता तुम्हीच मला सांगा,येत्या पावसाळ्यात, कुंद रविवारच्या सकाळी,खरंच मी काय करु ?

संदीप सामंत
९८२०५२४५१०
२२/०५/२०२०.

Avatar
About संदीप सामंत 21 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..