खिद्रापूर – सांगलीपासून सुमारे ५१ किमी अंतरावर, नृसिंहवाडीपासून जवळ !
फार पूर्वी गेलो होतो पण आताची नजर जरा वेगळी होती. राष्ट्रीय वारसा, पण बऱ्यापैकी दुर्लक्षित ! पर्यटकांचा राबता मर्यादीत. नाही म्हणायला नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये न्यूझीलंड /ऑस्ट्रेलिया वगैरे देशांतून असंख्य पर्यटक येतात, सगळ्या हेमाडपंथी कलाकुसरीचं कौतुक करतात, इतिहासांच्या पानांतून डोकावतात, पण पिकते तेथे —- अशी गत ! कोठलाही बोर्ड नाही, गाईड नाही (सुरुवातीला एक स्थानिक माणूस काही पोपटपंची करत होता पण त्याच्यात फारसा दम नव्हता), ऊजेड नाही, पिण्याचे पाणी किंवा इतर मूलभूत सुविधा नाहीत. शंकरबाप्पाच्या पिंडीजवळ एक स्त्री बसली होती . तिला विचारले तर उत्तर आलं – ‘ मीही येथे पाहुणी आहे.”
घरातील जर्जर वृद्धाकडे जसे लक्ष (?) दिले जाते तितपत ! एक पुस्तिका मात्र दाराजवळ विकायला होती. ” तुम्ही विकत घ्या आणि माहिती मिळवा.”
इतकं पराकोटीचं दुर्लक्ष्य कां ?
इतक्यात माझ्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल हो) एक लघुसंदेश (SMS हो )आला – (माझा एक “सखाराम गटणे “मित्र आहे ,त्याच्या “शुद्ध “भूमिकेतील हे वाक्य)
” आयडिया कर्नाटका वेलकम्स यू !”
क्षणार्धात उलगडा झाला – महाराष्ट्र शासन इकडे कां लक्ष देत नाही याचा ! राष्ट्रीय स्मारक असलं म्हणून काय झालं, त्याचं जतन करण्याची जबाबदारी शेजारच्या राज्याची आहे. असो.
“कर्नाटकातील (?)” हे शिल्पस्वप्न बघायलाच हवं ! आम्हीं निघताना एक हौशी वाटाडया आला होता- माहिती दयायला ! म्हणून काही उलगडे पदरात पडले, अन्यथा गाभाऱ्यातील शिवाप्रमाणे हा परिसरही मूग गिळून बसला आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply