माझं (स्वानंदी) दुपारचं जेवण नुकतंच आटोपलं होतं. अंथरुणावर निजायला गेली तेवढ्यात पोटात कळ आली आणि मी जोरात किंचाळली. नवऱ्याला आवाज जाताच तो घाईघाईने बेडरूम मध्ये आला मला खाली बसवले. घाबरलेल्या नवऱ्याने( राहुल)लगेचंच जवळचं असलेल्या रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर आम्ही आई बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली.
हे ऐकल्यानंतर आमच्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढा आनंद यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. अवतीभवती ‘कुणी तरी येणार येणार ग’ हे गाणं वाजत असल्याचा मला सारखा भास होत होता. ही गोड बातमी आधी आई बाबांना की जवळच्या मैत्रिणींना कळवावी हा प्रश्न मनात फिरत होता. त्या एकाच रात्री बाळ कोणासारखं होणार, नाव काय ठेवणारं ही असंख्य स्वप्न रंगवलीत. काही महीन्यातचं जणू बाळाशी एक वेगळच नातं गुंफल गेलं. अनेकदा आरश्यासमोर उभं राहून मी पोटावरून अलगद हात फिरवून बाळाशी गुजगोष्टीही करायची. आनंदाने भरलेले हे दिवस भराभरा जात होते.
मात्र नियतीला काही औरच मंजूर होते. ती काळी रात्र (३१ डिसेंबर २०१९) आजही लख्ख आठवणीत आहे. संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करत होता. परंतु पोटात अचानक सुरू झालेल्या वेदनेमुळे आम्हाला रात्र रुग्णालयातच काढावी लागली. माझ्या बाळाला काही झाले तर नाही या भीतीने डोळ्याचे पाणी थांबत नव्हते. डॉक्टरांनी रात्रभर निगराणीत ठेवल्यानंतर सकाळी सुट्टी दिली. पुन्हा त्रास झाल्यास ताबडतोब रुग्णालयात या असे सांगितले.
आम्ही घरी आलो, पण तरीही मनातली भीती काही केल्या कमी होत नव्हती. दोन दिवसानंतर पुन्हा पोटात दुखू लागले आणि मी तडफडायला लागली. श्वास घेणे अवघड झाले होते. घामाने चिंब भिजून गेले होते. कसा तरी नवऱ्याला फोन केला असता तो घरी आला आणि मला गाडीत बसवून रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासून सांगितले माझा नैसर्गिक गर्भपात (miscarriage) झाला आहे.
मी खूप रडले, ओरडले, कळवळले माझी काय चूक झाली?? माझं बाळ मला परत द्या अशी विनवणी मी डॉक्टरांना करत होते. ठोके ही आले होते. काय वेदना झाल्या असतील त्या जीवाला. हे आमचं पहिलं बाळ होतं. या दुःखातून नवऱ्याने मला बाहेर काढले. तो ही बाबा होणार होता. पण त्याने कधीही माझ्यासमोर त्याचे दुःख दाखवले नाही. मला या परिस्थितीतून सावरले.
दिवस आले तसे गेलेही पण त्या आठवणी आणि वेदना मनात कायम खोलवर रुजलेल्या राहतील. या साऱ्यात एक वर्ष कसं गेल आम्हाला कळलचं नाही. आणि अश्यातच पुन्हा आमच्या घरात पाळणा हलणार होता. पहिला गर्भपात झाल्यामुळे मनात भीती होतीच पण आनंद ही तेवढाचं होता. यावेळी योग्य काळजी घेणार अस मी मनोमन ठरवलं होतं. त्यानेही माझी पुरेपूर काळजी घेतली. माझे सगळे डोहाळे ही त्यानेच पूर्ण केले. यावेळी सर्व सुरळीत सुरू होते.
पण नियतीने डाव साधत पुन्हा एका क्षणातच माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केली. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनी बाळ गर्भाशयात नसल्याचे सांगताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तातडीने शस्त्रक्रिया करून गर्भ काढावा लागणार हे ऐकताक्षणी मी बेशुद्ध झाले. पुन्हा एकदा त्याच वेदना आणि आठवणी माझ्या मनात उमळून आल्यात. देवा, मीच का? मला स्वतःचा प्रचंड राग आला. वाटले स्वतःला संपवून टाकावे. माझ्यातल्या हाडामासाच्या गोळ्याला काढून टाकले. शस्त्रक्रियेनंतर चे शरीरावरील व्रण काही काळानंतर भरून निघतील, पण माझ्या मनावर झालेल्या आघातांच काय? या वेदना कधीही, कशानेही भरून निघणार नाहीत.
देवा, हे लपंडावाच दुष्टचक्र पुरे झालं आता. माझे कान आसुसलेत ‘आई’ अशी हाक ऐकण्यासाठी. मी पुन्हा वाट पाहिन तुझ्या येण्याची. मी पुन्हा स्वप्न रंगवणार तुझ्यासाठी. पण पुन्हा येवून जाऊ नकोस. आता पुन्हा आम्हाला सोडून जाऊ नकोस!
टीप – स्वानंदी सारख्या असंख्य महिला आज (miscarriage) नैसर्गिक गर्भपाता च्या वेदना सहन करत आहेत. एका महिलेसाठी आई होणे हे स्वर्गसुखा सारखेच आहे. अश्या दुःखात तिला वेगळी वागणूक देण्यापेक्षा तिच्या एकटेपणाला कुटुंबाच्या आधाराची गरज आहे.
— सौ. शिल्पा पवन हाके
Leave a Reply