जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे!
जगूचा बाप घराच्या भिंतींना रंग लावणारा रंगारी होता. कोणीतरी रंगकामाची गुत्ते घेणाऱ्या गुत्तेदाराकडे रोजंदारीवर जायचा. एका इमारतीच्या बाहेरच्या भिंतींना रंग लावण्यासाठी तो झुल्यावर, रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन बसला. झुला चौथ्या मजल्याच्या गच्चीतून, खाली सोडण्यात आला. झुल्याचे दोर ज्यांनी धरले होते, त्यातील एकाला चक्कर आली. दोर सुटला. जगदीशचं बाप झुल्यावरून वेडावाकडा खाली पडला!—– आणि जग सोडून गेला!
जगू लहानाचा मोठा होऊ लागला. खर्च वाढू लागला. दिवस गरिबीचेच होते. आईने दोन, घर धुण्या-भांड्याची वाढवू घेतली. मग जगू साठी, भातासोबत वरण, भाजी मिळू लागली. कधी एखादा आंबा, केळ पण मिळू लागले.
“आई, तू पण खाना माझ्या सोबत!” आई त्याला आसट वरण भात भरवताना, जगू आईला म्हणाला.
‘बाळा, तू खा. मला भूक नाही!” हे तिचे पहिले ‘खोटे’ बोलणे होते!
जगू मोठा होवू लागला. ती कोठे कोठे कामे करू लागली. जगू शाळेत जाऊ लागला. खर्च वाढू लागला. मग तिने एका शिंप्या कडून, काजे बटणांचे काम घेतले होते. रात्री जागून, ती ते काम करायची.
“आई, झोप आता. खूप रात्र झालीयय. दिवसभर काम करून थकली असशील. तुला सकाळी कामाला पण जायचं असत ना?”
“झोप ना? अरे, मला झोपच येत नाही. म्हणून तर हे काम करतीयय. अन थकवा कसला? याला, असे कोणते कष्ट पडतात? तू मात्र आता झोप. सकाळी सातला शाळा आहे ना?” जगूला मऊसूत गोधडीचे पांघरून घालून झोपवायची.
हे तिचे बोलणे खोटेपणाचेच होते!
वाढत्या खर्चाने ओढाताण रोजचीच होती. अडचणी शिवाय दिवस उगवतच नसे.
“पोरी, तुझी परस्थिती आमच्याने बघवत नाही. पदरी पोर आहे. तुझंही वय फारसा नाही. तुझ्या पुढे खूप मोठे आयुष्य पडलंय. तुलाही प्रेमाची, आधाराची गरज आहे. माझा एक अनुभवाचे म्हणणे ऐकशील? तू दुसरे लग्न करावे, असे, तुझा एक हितचिंतक म्हणून वाटते. तुझी तयारी असेल तर सांग. एखादा सालस मुलगा पहातो.” जवळच्या एका वृद्धाने जगूच्या आईला सल्ला दिला.
” धन्यवाद काका. तुम्ही, हे माझ्या मायेपोटीच सांगत आहात, हे मला ठाऊक आहे. काहीच दिवसांचा प्रश्न आहे. हे हलाकीचे दिवस पालटतील! आणि माझा जगू, माझ्या जवळ आहे, तोवर मला वेगळ्या प्रेमाची आणि आधाराची गरजच काय? हा मला गरज आहे ती, फक्त तुमच्या आशीर्वादाची!”
तिला त्या काळात आधाराची आणि प्रेमाची खरेच गरज नव्हती का? पण ती खोटं बोलतच राहिली!
जगू हुशार होता. स्कॉलरशिप मिळाली. कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये नौकरी पण लागली. गावापासून लांब, बेंगलोरला! जगू आईस पैसे पाठवू लागला. पण तिने ते नाकारले.
“मला, असे कितीशे पैसे लागणार? आणि तितके आहेत माझ्या पाशी! तूच परक्या गावात राहतोस. रोज ऑफिसला जाताना आणि येताना बस, टॅक्सी साठी लागतील, तुझ्याकडेच राहू दे! स्वतःची आबाळ करून घेऊ नकोस!”
तुम्हीच सांगा यात कितपत सत्यावश होता?
भयानक परस्थिती होरपळलेली, शक्तीच्या बाहेर देह कष्टावलेला, वाढते वय. किरकोळ दुखणी तिने अंगावरच काढली. जागूला कळवलेच नाही. उगाच लेकराला त्रास कशाला द्या? दुखणी, काय आजची आहेत? या आधीही, अशी किती तरी दुखणी, आपल्या देहाने सोसली आहेत! त्यात भिण्या सारखे काही नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. एकदा ती पाय घसरून बाथरूम मध्ये पडली. मांडीचे हाड नको त्या ठिकाणी, मोडलं. असह्य किंचाळी.
शेजाऱ्यांनी दवाखान्यात ऍडमिट केलं.
जगू धावत एरपोर्टवरून सरळ दवाखान्यात पोहंचला.
तिला त्या अवस्थेत पाहून तो वेडा पिसा झाला. ती अश्या स्थितीत ती, नजरेला पडेल हा, त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.
तशाही परिस्थितीत तिच्या डोळ्यात मात्र समाधानच तरळत होत! जगूचे अश्रू मात्र आवरत नव्हते.
“फार दुखतंय का ग?” तिच्या दुखावलेल्या पायावरून, आपला हात हळुवारपणे फिरवत जगूने विचारले.
“नाही रे! मला आता खूप बर वाटतंय! तुला डोळेभरून पहाण्यासाठी जीव धरून ठेवला होता बघ !”
हे हि खोटेच होते! पायातून वेदनांचा डोंब उसळतच होता. हे फक्त तिलाच माहित होत!
“आई, असे म्हणू नकोस! तुला काही होणार नाही! मी, तसे होऊ पण देणार नाही!” जगू तिला मिठीत घेत म्हणाला.
पण —पण तिने जागूच्या मिठीतच प्राण सोडला होता!
हे मात्र सत्य होते! शेवटचे सत्य!
मित्रानो, जगू आणि त्याची आई, भलेही गोष्टीतली असतील, पण त्यांच्या भावना खऱ्या आहेत. आपल्या आईला, शक्य तितक्या लवकर जवळ करा. खूप दिवस तिच्या कुशीत रहा!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)
Leave a Reply