भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..
असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या निकम्म्याच निपजणार याचा केवढा हा तुमचा आत्मविश्वास..!) आणि म्हणून ह्यांची पारदर्शी कारभार, काय, कटोरा काय नि यू शुड नो कायची नाटकं सुरू आहेत हे का आम्हाला समजत नाही? आम्हा मतदारांना तुम्ही सर्व काय मुर्ख समजलात काय? तुमची भांडण पाहून लोण्याचा गोळा नि त्यासाठी भांडणाऱ्या दोन गबर बोक्यांची गोष्ट आठवतेय..सत्तेच्या व त्यातून होणाऱ्या विनासायास ‘लक्ष्मीदर्शना’च्या लोण्याच्या स्वार्थी लालसेने चाललंय हे सारं हे कळतंय आम्हाला व म्हणून आम्हाला काही तुमच्याबद्दलच्या प्रेमाचं भरतं वैगेरे काही येत नाही तर चीड-संताप व तिरस्कारच वाटतोय..
आणि त्या शिवाजी महाराजांना का वेठीस घरलंय तुम्ही लोकांनी?..ते काय तुम्हाला निवडणूक लढवायचं ‘कॅपिटल’ वाटलंय की काय? अरे महाराष्ट्राचं दैवत आहे ते, काय तुम्ही त्यांची दशा करताय याचं तरी भान आहे का तुम्हाला? महाराजांवर तुम्ही तुमचा काॅपिराईट सांगताना अखिल महाराष्ट्राचा व पर्यायाने देशाचा तुम्ही अपमान करताय याची तरी जाणीव आहे का तुम्हाला? कि सत्तेसाठी एवढे आंधळे-बहिरे झालात? आणि आम्हा मतदारांचं काय? आम्हाला कोण हवंय यापेक्षा काय हवंय याचा कधीतरी कानोसा घ्यावासा वाटला का तुम्हाला?
सर्वदणं कंटाळलेत आता. तुम्हालाच नव्हे, तर एकूणच राजकारणाला आणि तुम्हा राजकारण्यांना..हे असंच चालू राहीलं तर मात्र कठीण आहे, जनता चिडून उठाव करणार नाही याच्या भ्रमात राहू नका, जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. वेळीच सावध व्हा. अन्यथा..
या निवडणूकीत मी तरी NOTA वापरण्याचं नक्की केलंय..मत फुकट जाईल आणि असंही तुम्हाला दिल्यावर तरी तुठे सार्थकी लागणार आहे, फुकटच जाणार आहे..फरक एकच, की मी NOTAचा पर्याय पूर्ण शुद्धीत वापरणार व तसं करताना तुमच्या कोणाहीबद्द्लच्या प्रेमाची बेशुद्धी मला नसेल. NOTA वापरताना माझं मत फुरट जाणार याची मला पूर्ण जाणिव असेल आणि तुम्हापैकी कोणालाही मत देतांना काही तरी सत्कार्य करतोय अशी स्वत:ची केलेली फसवणूक तरी नसेल..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply