सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नांदगिरी हे गाव आहे. या गावात ठिकठिकाणी आपल्याला उसाची आणि ज्वारीची शेती नजरेस पडते.
कल्याणगड सर करताना अगदी सुरुवातीला पक्क्या रुपात दगडी पायर्या आहेत. पण त्यानंतर गडमाथा संपेपर्यंत चढाईसाठी पायवाट ही फक्त मुरवाड स्वरुपाची आहे. समुद्रसपाटीपासून या गडाची उंची ३५०० फूट इतकी आहे.
राजा शिलाहार दुसरा यांनी कल्याणगडाची निर्मिती केली असून इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत त्याची उभारणी झाली. पुढे १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी सातारा व त्यालगतचा प्रदेश जिंकला होता. ह्या भागात कल्याणगडचाही समावेश होता. शिवकाळानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर म्हणजे १८१८ रोजी हा गड जनरल प्रिझनर या इंग्रज अधिकार्याच्या हाती आला. असा या कल्याणगडचा इतिहास आहे. कल्याणगडाची चढाई सोपी असून मुख्य माथ्यावर पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी ‘ ->’ अशा खुणा करुन ठेवल्याचं आढळतं. त्यामुळे चढाईसाठी नवोदितांना फारसा त्रास देखील उदभवत नाही. अवघ्या तासाभरातच आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. हा दरवाजा उत्तराभिमुख असून तिथून समोरच एका मंदिराचं दर्शन घडतं. दुसर्या दरवाज्यातून आत शिरल्यावर एक कातळकडा आहे. या कातळकडेच्या डाव्या बाजूस पायर्या उतरल्यावर एक गुहा आहे. या गुहेत बारामाही पाणी असते. पण संपूर्णत: या गुहेत अंधार असल्याने टॉर्च घेऊन जाणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रवेशदेखील करता येणार नाही. हे पाणी बर्यापैकी शुद्ध असल्याने त्याचा पिण्यासाठीदेखील वापर होतो. पण तिथे प्रवेश करण्याअगोदर चप्पल, बुट, पायर्यांशेजारी काढून ठेवावेत.
मात्र कॅमेरा सोबतच ठेवावा. कारण गुहेतील दृश्य नक्कीच टिपण्यासारखी आहेत. त्यासाठी फ्लॅशची सोय अगोदरच करुन ठेवावी. कारण अंधारी गुहेत या गोष्टी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते. गुहेत उतरल्यावर जवळपास कमरेपर्यंत पाणी लागते. लहान मुलं असल्यास त्यांना खांद्यावर बसवण्याशिवाय पर्याय नाही. सुरुवातीच्या काही भागात वाकून जावं लागतं. व साधारणत: पन्नास-साठ पावलं चालल्यानंतर पार्श्वनाथाची ९व्या शतकातील मूर्ती आहे. शेजारीच दत्ताची छोटेखानी मूर्ती व त्यालगतच देवीची देखील मूर्ती आहे. इथे प्रकाशयोजना नसल्यामुळे याचं दर्शन टॉर्चच्या उजेडातच घ्यावं लागतं. ज्या रस्त्याने आपण प्रवेश केला तिथूनच परतीचा मार्ग आहे. गुहेतून बाहेर आल्यावर गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी वरच्या दरवाज्याची वाट धरावी. वरील दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्ही बाजूंनी बुरुजांनी संरक्षित आहे. या दरवाज्याच्या आत हनुमानाचे मंदिर असून शिखरावर गणपतीची मूर्ती देखील बसवण्यात आली आहे. कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून तिथे वाड्याचे व शिवबंदीच्या घरट्यांची जोती आहे. व मध्यभागी वडाचे भव्य वृक्ष असून त्याखाली एक कबर आहे. कल्याणगडाच्या उंच माथ्यावरुन संपूर्ण सातारा शहर, अजिंक्यताराचा किल्ला, पूर्णगड, यमाई देवीचा डोंगर, वर्धनगड व एकांबेचा डोंगर दृष्टीस पडतात. गडाच्या समोरच्या डोंगरावर असणार्या पवनचक्क्यादेखील लक्ष वेधून घेतात. असा हा वैशिष्ट्यपूर्ण कल्याणगड, गुहेतील जलमंदिरामुळे नेहमीच भक्तांना व गिर्यारोहकांना साद घालत आला आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply