साऱ्या महाराष्ट्राला ललामभूत ठरलेली `उद्यम नगरी’ किर्लास्कर वाडी! तिच्या उभारणीचे काम आजच्याच दिवशी २६ मार्च १९१० साली सुरू झाले. देशातील ह दुसरी उद्यम नगरी. बिहारमध्ये जमशेटजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर उभारले गेल्यानंतर लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी आपल्या स्वत:च्या उद्योग समुहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातूनच `किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला.
सांगली जिल्ह्यातील औंध संस्थानात कुंडल गावालगत एक मोठे माळरान होते. तीच जागा लक्ष्मणरावांनी मुक्रर केली. आौध संस्थानचे तेव्हाचे संस्थानिक कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी ही जमीन लक्ष्मणरावांना देणगीदाखल दिली. तिथेच किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचा कारखाना व तिथे काम करणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांची निवासाची वसाहत उभारण्यात आली. मोठाले रस्ते, टुमदार प्रशस्त घरे, स्वच्छता व कर्मचाऱ्यांसाठी उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा, वाचनालय, अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले.
स्वत: लक्ष्मणरावही इथेच येऊन राहू लागले. त्यामुळे उद्योगाची भरभराट झाली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी प्रवासाची यातायात करावी लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली.
सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.
आता तर मध्य रेल्वेवर `किर्लोस्करवाडी’ हे स्टेशनही आहे. तिथे प्रवाशांबरोबरच माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.
अशी किर्लोस्करवाडी! मराठी मनाचा हा एक मानबिंदू ठरला आहे.
— भरतकुमार राऊत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply