झूम मिटिंग संपवून किशोर आपल्या आलिशान केबिन मधील खुर्चीत विसावला. गेल्या महिन्या दोन महिन्यात जगात खूप उलथापालथ घडली होती आणि त्याचे परिणाम साऱ्यांनाच भोगायला लागत होते. किशोरची ‘किमया रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ ही मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल च्या क्षेत्रात काम करणारी कंपनी सुद्धा त्याला अपवाद नव्हती. शून्यापासून प्रवास करून तो येथवर पोहचला होता. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती च्या बळावर आतापर्यत त्याने जे स्वप्न पाहिले होते ते यशस्वी करत आणले होता. लॉकडाऊन जर आणखी महिना दोन महिने चालला तर येणारा मंदीचा काळ त्याला स्पष्ट दिसत होता. गेल्या वर्षभरात गाड्यांचा खप जगभर कमी झाला होता. त्यामुळे ऑटोमोटिव्ह फिल्ड शिवाय इतर क्षेत्रामध्ये पण शिरकाव करण्यास तो आतुर होता पण नैसर्गिक आपत्तीपुढे कुणाचेही चालत नाही. खरं तर ही आपत्ती मुळात नैसर्गिक आहे की मनुष्यनिर्मित यावरच जगभर मतभेद व्यक्त केले जात होते. पण किशोर ला त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. या प्रसंगाला यशस्वीपणे कसे तोंड द्यायचे याच एका विचारात तो गढून गेला होता.
*****
खुर्चीत बसल्या बसल्या त्याला जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीचा तो पावसाळ्यातील प्रसंग आठवला. १९९० चा जुलै महिना होता. पावसाने जोर पकडला होता. अजून वयाची विशी पार न केलेला किशोर आणि त्याचा लहान भाऊ गावातल्या नदीच्या किनारी उभा होता. खरं तर तो त्याच्या पहिल्या वहिल्या नोकरीच्या मुलाखतीच्या पत्राची वाट पहात होता. घराची परिस्थिती अगदी बेताची असताना सुद्धा त्याने निव्वळ इच्छाशक्तीच्या आणि मेहनतीच्या बळावर त्याने मालवणच्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका घेतली होती. डिप्लोमा झाल्यावर तेथील एका सरांच्या सांगण्यावरून त्याने बजाज ऑटो मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या दिवसापासून तो इंटरव्ह्यू लेटर ची वाट पाहत होता.
गावातले पोस्ट ऑफिस नदीच्या पलीकडे होते.मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढून पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पोस्टमन दोन तीन दिवस तरी त्याच्या घराच्या बाजूला फिरकण्याची शक्यता कमीच होती. पण कोणत्याही परिस्थितीत त्याला ही संधी दवडायची नव्हती. पत्र हाती पडले नसते तर ही नोकरीची संधी हातून निसटली असती म्हणून तो बेचैन होता. काहीही करून पोस्टऑफिस मध्ये जाऊन त्याला ते मुलाखतीचे कॉल लेटर घ्यायचे होते.
किशोरने काही वेळ विचार करून पाण्यात उडी मारली आणि नदीच्या दुसर्या काठाच्या दिशेने पोहण्यास सुरवात केली. त्याने पाण्यात उडी मारल्याबरोबर सहावीत शिकणारा त्याचा लहान भाऊ घाबरून घराच्या दिशेने पळाला, दादाने नदीत उडी मारली हे आईला सांगण्यासाठी! पण किशोरला फक्त ते इंटरव्ह्यूचे कॉल लेटर समोर दिसत होते. पाण्याच्या प्रवाहामुळे खूप ताकद लावावी लागत होती. निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर खूप प्रयत्नानंतर तो दुसऱ्या काठावर पोहचला तेव्हा खरे तर तो खूप थकला होता परंतु त्याही अवस्थेत तो पोस्ट ऑफिसच्या दिशेने पळायला लागला. त्याच्या या इच्छाशक्तीला परिणाम म्हणजे काही दिवसांनी मुलाखतीचे सर्व सोपस्कार पार पाडून तो बजाज ऑटो मध्ये रुजू झाला.
आज तीस वर्षानंतर सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती समोर उभी होती. आयुष्यभराची तपश्चर्या पणाला लागली होती. तीस वर्षात मोठया हिमतीने आणि मेहनतीने जो डोलारा उभा केला होता त्याला असे सहजासहजी तो कोसळू देणार नव्हता. कोरोना मुळे सारा व्यवहार ठप्प झाला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होता आणि त्याहून महत्वाचे म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या दीडशे कर्मचाऱ्यांचा प्रश्न होता. खुर्चीत बसल्या बसल्या त्याच्या डोळ्यासमोरून लहानपणीचे एक एक प्रसंग तरळून जात होते.
******
ते गावातले छोटेसे घर, घरातल्या चुलीवर भाकरी भाजणारी त्याची आई, रोजंदारीवर कुणाच्या तरी शेतात काम करणारे त्याचे वडील.
घरची परिस्थिती बेताची होती. दहावी पर्यंतचे शिक्षण गावातल्याच सरकारी मराठी शाळेतून झालेले. तो अभ्यासात बरा होता त्यामुळे शिक्षकांचा तो लाडका होता. अभ्यासाबरोबरच आणखी एका गोष्टीचे त्याला वेड होते, सिनेमा पाहण्याचे! गावातल्या व्हिडीओ पार्लर मध्ये पिक्चर पहाण्यासाठी लागणारा एक रुपया मिळवण्यासाठी तो शेजाऱ्याच्या शेतात काम करायचा. चित्रपट पाहताना तो हरवून जायचा. चित्रपटातील श्रीमंत व्यक्तिरेखा पाहून आपण पण मोठे उद्योजक बनून श्रीमंत होण्याची स्वप्ने रंगवत तो घरी परतायचा.
दहावी झाल्यावर किशोरने तालुक्याच्या महाविद्यालयात सायन्स ला अकरावीला प्रवेश घेतला. पण कॉलेज मध्ये त्याचे मन रमले नाही. इंग्रजीमधून विषय समजून घेताना त्याची तारांबळ उडत होती. दररोज दोन तास एसटी ने प्रवास करायचा पण त्याला कंटाळा आला होता. गावातल्या शाळेत चांगले मार्क्स काढणारा किशोर इथे मात्र थोडा मागे पडत होता.
अकरावीचे वर्ष पूर्ण होत आले होते. दहावीत ८० टक्के मार्क्स असून सुद्धा अकरावीत तो जेमतेम पास होण्याची अपेक्षा करत होता. अकरावीच्या रिझल्ट च्या दिवशी तो मित्राबरोबर कॉलेजच्याच बाजूला असणाऱ्या मोती तलावाच्या कठड्यावर बसला होता. मार्कशीट वरचे ४५ टक्के त्याला खिजवत होते. त्याचे घरी जाण्याचे पण मन करत नव्हते. मित्राच्या हातात त्या दिवशीचे वृत्तपत्र होते. किशोरची नजर कोपऱ्यातील जाहिरातीकडे गेली. मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनाची ती प्रवेशसंदर्भातील जाहिरात होती. त्याने इंजिनिअरिंग बद्दल दहावीत असताना शाळेच्या गुरुजींकडून ऐकले होते. दहावीच्या बॅच च्या निरोपसमारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतले एक इंजिनिअर आले होते. त्यादिवशी चित्रकलेचे काळे सर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचा फलक लिहीत असताना किशोर समोरच उभा होता. सरांनी पाहुण्यांचे नाव लिहून पुढे कंसात त्यांची डिग्री लिहिली- गिरीष सावंत (B.E. Civil).
“सर ‘B.E.’ म्हणजे काय?” किशोर ने सरांना विचारले.
“ BE म्हणजे ‘बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग’, सावंत साहेब सिव्हिल इंजिनिअर आहेत. ,त्यांचा बांधकामाचा मोठा व्यवसाय आहे” काळे सर म्हणाले.
सफारी घातलेल्या प्रमुख पाहुण्यांना आपल्या कार मधून खाली उतरताना पाहून त्याला सिनेमातील दाखवतात त्या श्रीमंत हिरोची आठवण आली. कधीतरी आपण पण असेच आलिशान गाडीतून कुठल्यातरी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जात आहोत आणि तेथील मंडळी हार तुऱ्यांनी आपले स्वागत करत आहेत हे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.
निरोप समारंभात भाषण करताना सावंत साहेब त्यांच्या कंपनीने केलेल्या विविध कामांची, त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कसब कसे पणाला लावावे लागते याची माहिती देत होते. इकडे किशोरच्या डोक्यात चक्र फिरू लागले होते. कार्यक्रमानंतर सावंत साहेबांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला सरांबरोबत किशोरही गेला होता. पाहुणे गाडीत बसणार इतक्यात थोडेसे घाबरत घाबरत त्याने विचारले “ सर, मला पण तुमच्यासारखे इंजिनिअर बनायचे आहे! ”
*****
तलावाच्या काठावर हातात अकरावीची ४५ टक्क्यावाली मार्कशीट घेऊन बसलेला असतानाच पेपरमधील डिप्लोमाच्या जाहिरात दिसावी हा त्याला योगायोग वाटला. त्याने तडक उठून कॉलेजचे ऑफिस गाठले.
“काय रे, थोड्या वेळापूर्वीच रिझल्ट घेऊन गेलास ना तू?” त्याला पाहून क्लार्क ने विचारले.
“हो, पण आता लिव्हिंग सर्टिफिकेट साठी आलोय!”
किशोर चे उत्तर ऐकून त्याच्याच गावातला तो क्लार्क जाग्यावरून उडाला होता! किशोर सारखा होतकरू मुलगा फक्त अकरावी करून शिक्षण सोडून देतोय की काय असे त्याला वाटले होते! किशोरने त्याला पॉलिटेक्निक चा प्लॅन सांगितला तेव्हा कुठे त्या क्लार्कचा जीव भांड्यात पडला.
पॉलिटेक्निकमध्ये त्याने मेकॅनिकल डिप्लोमा साठी प्रवेश घेतला. इथे मात्र तो बऱ्यापैकी रुळला. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मुळे पैशाचा प्रश्न नव्हता. इंजिनिअरिंग चे विषय ही त्याला आवडायला लागले. पहिल्या वर्षी इंजिनिअरिंग ड्रॉईंग तर त्याचा खूप आवडीचा विषय बनला. त्याला चित्रकलेत पाहिल्यापासून गती होतीच आणि इथे त्याला जोड मिळाली ती अभियांत्रिकीची. तासन तास खपून तो मन लावून ड्रॉईंग च्या असाइनमेंट्स पूर्ण करायचा. एकंदरीत तीनही वर्षे तो ७० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स घेऊन पास झाला.
सर्व काही सुरळीत चालले असताना कुठेतरी माशी शिंकली. शेवटच्या वर्षीची परीक्षा झाल्या झाल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. घरातील मोठा मुलगा या नात्याने घरची सारी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली. त्याच्या मागच्या दोन बहिणी अजून शाळेत शिकत होत्या. खरे तर त्याला पुढे शिकायची इच्छा होती. सांगलीच्या वालचंद कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे असे त्याचे कॉलेजचे सर म्हणत होते पण अचानक आलेल्या घरच्या जबाबदारीने त्याला लवकरात लवकर नोकरी करणे गरजेचे होते.
*****
जेव्हा ‘बजाज’ मध्ये त्याला आपली निवड झाल्याचे कळले तेव्हा तो आनंदून गेला होता. आतापर्यत जिल्ह्याबाहेर पाय न ठेवलेल्या किशोरसाठी पुणे म्हणजे ड्रीम सिटी होती. बजाज ऑटो मध्ये एक वर्ष मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये ट्रेनी म्हणून काम केल्यावर तो एका ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला हाय टेक पार्टस् पुरविणाऱ्या कंपनी मध्ये रुजू झाला. या दोन वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर पुढच्याच वर्षी त्याला मुंबई येथील ‘फियाट इंडिया ऑटिमोबाईल्स’ मधील संधी चालून आली. येथील चार वर्षे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती.
जॉब करता करता त्याला ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण स्वारस्य वाटू लागले होते. त्यावेळी भारताच्या कार मार्केट मध्ये फियाट, हिंदुस्थान मोटर्स आणि मारुती सुझुकी या कंपन्यांची मक्तेदारी होती. फोर्ड, होंडा हे ब्रँड भारतात येण्याचे घाटत होते. या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची तर एक इंजिनिअरिंग ची डिग्री गाठीशी असावी असे किशोर ला राहून राहून वाटत होते. त्यावेळी मुंबईमध्ये सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज पार्ट टाईम डिग्री कोर्स चालवत होते. येत्या काळात ऑटोमोटिव्ह च्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स चे अनन्यसाधारण महत्व तो जाणून होता त्यामुळे जॉब करता करता किशोर ने चार वर्षात चक्क इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवी प्राप्त केली.
त्यानंतर टाटा मोटर्स मधील दोन वर्षे त्याच्यासाठी BIW मधील सर्वांगीण कामाचा अनुभव देणारी ठरली. BIW म्हणजे Body in White ही ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मधील अशी स्टेज असते ज्याच्या दरम्यान कारच्या बॉडीचे सारे पार्ट्स एकमेकाला जोडले जातात. या स्टेजमध्ये वेल्डिंग, रिवेटिंग, क्लिंचिंग, ब्रेझिंग, या सारख्या कामासाठी रोबोट्स चा वापर होतो. फानुक, कुका, एबीबी, नाची सारख्या जगविख्यात कंपन्यांचे रोबोट्स प्रोग्रॅम करणे, विविध अप्लिकेशन्स साठी लागणारी उपकरणे रोबोट्सशी, PLC शी किंवा इतर थर्ड पार्टी उपकरणांशी कशी जोडायची तो सहजपणे शिकला.
पुढील दोन वर्षे तो जनरल मोटर्स या ऑटोमोटिव्हच्या क्षेत्रातील जगविख्यात कंपनीमध्ये व्हर्चुअल मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअर म्हणून काम केले. व्हर्चुअल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्ट तयार करण्यासाठीची प्रोसेस आखण्यासाठी, ती डोळ्यासमोर दृश्य स्वरूपात उभी करण्यासाठी संगणकीय सिम्युलेशनवर आधारित तंत्रज्ञान वापरणे. जनरल मोटर्स च्या अमेरिकेतील आणि साऊथ कोरिया मधील डिझाईन सेंटर मध्ये त्यांने गाड्यांच्या विविध मॉडेल्स वर काम केले. त्याची मुळची ड्रॉईंग ची आवड इथे कामी आली. आपले मुळचे इलेक्टॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मधील ज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात वावरताना शिकलेले ज्ञान यांची सांगड घालून तो एक एक शिखर काबीज करत चालला होता.
*****
इतकी वर्षे जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांबरोबर काम करून सुद्धा कुठेतरी त्याला आतून अपूर्ण वाटत होतं. स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न त्याला खुणावत होते. एव्हाना जगभरातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील विविध कंपन्यांचे काम अनुभवून झाले होते. त्यातूनच जन्माला आली “ किमया रोबोटिक्स”! दरम्यानच्या काळात पुण्याने भारताचे ‘डेट्रॉईट’ नावलौकिक मिळविला होता. २००९ साली सुरुवातीला स्वतःकडचे भांडवल घालून सुरू केलेली ही छोटीशी कंपनी गेल्या दहा वर्षात चांगलीच नावारूपाला आली होती. जपान, चायना, जर्मनी इत्यादी देशांतील नामवंत कंपन्यांबरोबर मिळून ‘किमया रोबोटिक्स’ काम करत होती.
२०१९ च्या जानेवारी मध्ये एक मोठी संधी किमया साठी चालून आली. चायनातील वूहान शहरातील एका नामवंत कंपनीबरोबर पार्टनरशिप करून ‘ किमया’ भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधित विशिष्ठ रोबोट्स बनवणारी एक अग्रगण्य कंपनी होऊ पहात होती. त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी किशोर जीवाचे रान करत होता. गेल्या चार पाच वर्षांपासून मेक इन इंडिया चे वारे वाहत असले तरी शेवटी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एवढे भांडवल उभे करणे सहज शक्य नव्हते. पण किशोर ने ते चॅलेंज स्विकारले आणि भांडवल उभे केले. रमेशला त्या करोडो रुपयांच्या कर्जाची तेवढीशी चिंता नव्हती. त्याला स्वतःच्या आणि कंपनीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. अखेर डिसेंबर महिन्यात प्रकल्प उभा राहिला. किमया च्या बाजूचाच प्लॉट विकत घेऊन रमेश ने अत्याधुनिक प्रकल्प उभा केला होता.
त्याचवेळी नेमके कोरोना चे थैमान सुरू झाले. वूहान पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले. काही देशांमधून येणारी यंत्रसामग्री अडकून पडली. ट्रेनिंग साठी गेलेले कंपनीचे चार इंजिनियर्स तिकडेच अडकले होते. नशिबाने ते वूहान मध्ये लॉकडाऊन होण्याच्या आधी कसे बसे बीजिंग ला पोहचू शकले होते. तेथे परिस्थिती तेवढीशी गंभीर नव्हती. पण त्या चौघांचीही सारी जबाबदारी कंपनी वर होती. उरलेल्या साऱ्या बाबी पूर्ण होण्याआधी नवीन प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य नव्हते. त्यानंतर कोरोनाचे लोण जगाच्या इतर भागात पसरायला सुरुवात झाली. भारतही त्याला अपवाद नव्हता. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात भारत पूर्ण लॉकडाऊन मोड मध्ये गेला. कंपनीत जे काम चालू होते तेही ठप्प झाले. ही किशोर साठी खरंच कसोटी ची वेळ होती. कंपनीच्या जवळ जवळ दीडशे तंत्रज्ञांची जबाबदारी किशोर वर येऊन पडली होती. त्यांना पगार न देऊन चालणार नव्हते. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या किशोरला परिस्थितीची जाणीव होती. गेले चार महिने फारशा नवीन ऑर्डर्स नव्हत्या. त्यात गेल्या सहा महिन्यांच्या काळात वरच्या पदावर काही नवीन माणसे पण नेमली होती. सर्व खर्च जसेच्या तसे होते आणि जमेची बाजू कोरी होती.
त्याच्या बालपणाने त्याला खूप काही शिकवले होते. कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यातला तो नव्हता. त्यानंतर दहा दिवस ऑफिस हेच त्याचे घर झाले होते. आलेल्या परिस्थितीतून मार्ग हा काढायलाच हवा होता.
******
झूम कॉल वरची मिटिंग संपवून तो आपल्या केबिनमधील खुर्चीत विसावला. गेले दहा दिवस आपण घरी गेलो नाहीयेय याची त्याला अचानक आठवण झाली. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कंपनीच्या आवारात असलेल्या गेस्ट हाऊस मध्येच तो आणि त्याचे तीन तंत्रज्ञ रहात होते. त्याने वृषालीला फोन केला. गेल्या वीस वर्षांत त्याच्या आयुष्यातील प्रत्येक उतारचढावाची साक्षीदार, समर्थपणे संसाराची जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात कंपनीच्या कामात मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीची म्हणजे वृषालीची खंबीर साथ त्याच्या साठी अनमोल होती. अनेक कठीण प्रसंगात वृषाली त्याच्यामागे खंबीरपणे उभी राहिली होती. दहा वर्षांपूर्वी बंगलोरहुन पुण्याला येताना त्याच्या गाडीला मोठा अपघात झाला तेव्हा जवळपास एक महिना तो हॉस्पिटल मध्ये होता. बरे झाल्यावर सुद्धा अनेकवेळा प्लास्टिक सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये जावे लागले होते. त्या साऱ्या प्रसंगांमध्ये वृषालीने दिलेल्या साथीच्या जोरावरच तो पुन्हा उभा राहू शकला होता. अगदी आज पण या कठीण प्रसंगात तो तिच्या सहकार्यामुळेच आपले सारे लक्ष कंपनीच्या कामात देऊ शकत होता.
दोन रिंग झाल्या झाल्या वृषालीने फोन घेतला.
“अरे काय हे, दिवसभरातून आत्ता फोन करतोयस? मी केव्हापासून वाट पहातेय!” वृषालीच्या आवाजातील काळजी किशोरला पटकन जाणवली.
“अग तुला माहिती आहे ना, आज लागोपाठ मिटिंग्ज होत्या. गेल्या महिन्याभराच्या त्रासातून आज कुठे आशेचा किरण दिसायला लागलाय”
“सांग मला पटकन, मी केव्हाची वाट बघतेय तुझ्या फोन ची..मला नक्की माहीत होते, सारे सुरळीत होईल बांदेश्वराच्या कृपेने!” मनोमन वृषालीने देवाला नमस्कार केला.
बांदेश्वर म्हणजे किशोरचे ग्रामदैवत. दोघांचीही खूप श्रद्धा होती बांदेश्वरावर. ‘आपण कितीही प्रगती केली तरी त्यामागे देवाची कृपा ही असावीच लागते’ ही कोणत्याही कोकणी माणसाची श्रद्धा दोघांच्याही ठायी पूरेपूर भरलेली होती. जेवढी ग्रामदेवतेवर श्रद्धा होती तेवढेच प्रेम दोघांचेही आपल्या गावावर होते. गेल्याच वर्षी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान त्यांचे आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली गेली होती तेव्हा कित्येक कुटुंबाना किशोर आणि वृषालीने मदतीचा हात दिला होता.
“ तर बातमी अशी आहे की आपल्या नव्या कंपनीला – ‘किमया हेल्थकेअर रोबोटिक्स’ ला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या Centre for Augmenting WAR with Covid-19 Heath Crisis (CAWACH) programme चे फंडिंग मिळालंय. वाईटातून काहीतरी चांगले घडते ते हे असे” किशोर च्या या शब्दांनी वृषालीला खूप हायसे वाटले.
गेल्या महिन्याभराच्या किशोरच्या अथक प्रयत्नांना आता यश मिळाले होते. सरकारने अतिआवश्यक अशा उद्योगांना सुरू करायची परवानगी दिली होती होती त्याच्या काही दिवस अगोदर किशोरने आपली नवी कंपनी ‘किमया हेल्थकेअर रोबोटिक्स’ स्टार्टअप म्हणून रजिस्टर केली होती. गेल्या महिन्याभरात किशोर ने आपला रोबोटिक्स आणि ऑटोमेशन मधला सारा अनुभव पणास लावला होता. फक्त एका महिन्यात त्याने आणि त्याच्या तंत्रज्ञांनी मिळून पूर्ण पणे स्वयंचलित असे एन 95 आणि थ्री प्लाय मास्क बनविणारे मशिन विकसित केले होते. त्याला लागणाऱ्या सर्व पार्टस भारतातीलच दोन कंपन्या पुरविणार होत्या आणि मुख्य म्हणजे किमया हेल्थकेअर फक्त या मशिन्स बनविणारच नव्हते तर मास्क चे उत्पादन पण सुरू करणार होते. कंपनीचे दुसरे प्रॉडक्ट्च्या “ UVC Disinfection Robot” च्या सर्व चाचण्या पण जवळ जवळ पार पडल्या होत्या आणि येत्या काळातील मागणी लक्षात घेता पुढच्या एका महिन्याच्या काळात हे प्रॉडक्ट पण मार्केट मध्ये उपलब्ध करण्यावर किशोर दिवस रात्र एक करत होता. कंपनीच्या ठप्प पडलेल्या उलाढालीला यामुळे चालना मिळणार होती. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत ची हाक दिली होती आणि त्याला अनुसरून गव्हरमेंटच्या प्रत्येक स्तरातून किशोरला सहकार्य मिळत होते. सर्व काही सुरळीत पार पडल्यास जगभर सर्वात किफायतशीर दरात या मशिन्स आपण विकू शकतो याचा विश्वास त्याला होता.
*****
वृषालीचा फोन ठेवल्या ठेवल्या किशोर चे लक्ष समोर ठेवलेल्या एका स्मृतिचिन्हाकडे गेले आणि तो स्वतःशीच हसला. तीन चार वर्षांपूर्वी किशोर एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता त्यावेळी त्या कॉलेजतर्फे त्याला ते स्मृतीचिन्ह देण्यात आले होते. त्यावेळी भाषण करताना किशोरने आपला प्रवास मुलांसमोर मांडला होता. उद्योजक होण्यासाठी, आपले स्वप्न साध्य करण्यासाठी दृढनिश्चय आणि शिस्त कशी गरजेची आहे, आयुष्यात येणाऱ्या हजारो अडथळ्यांची शर्यत जिंकण्यासाठी रोडमॅप आणि अपयशाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा टिच्चून सामना करण्यासाठीची विजिगीषू वृत्ती कशी आवश्यक आहे यावर बोलला होता. योगायोग म्हणजे त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर त्याला त्याच्या आलिशान कार पर्यंत सोडायला गेलेल्या स्टुडंट्स पैकी एका विद्यार्थिनी त्याला म्हणाली होती “ सर, मला पण तुमच्यासारखे इंजिनिअर बनायचे आहे!”
©दिनेश
#करिअर #careersochh
Leave a Reply