माझ्या अभियांत्रिकी दिवसांमध्ये जग काहीच्या काही वेगळंच होतं. त्यातले काही ट्रेसेस सध्या आगंतुकपणे भेटताहेत- उदा. आर एस खुर्मी आणि बी एल थेराजा यांची पुस्तके (२० च्या वर आवृत्या) आजही विद्यार्थ्यांच्या टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांच्या मांडवाखालून किती अभियंत्यांच्या पिढ्या यशस्वीपणे गेल्या आहेत, याचा हिशेब ठेवणं आता चित्रगुप्तालाही अवघड झालं असेल. हाँ, मात्र आमच्या वालचंदची फेमस “रस्सा बटाटा” अजूनही मी आठवड्यातून चारवेळा सेवन करीत आहे.(घशाखाली घालत आहे, हे जास्त संयुक्तिक वर्णन) सध्या तिच्या जोडीला आठवड्यातून चारवेळा “पनीर “भाजी पंगतीला आली आहे. बालाजीच्या एका वर्षात पनीर प्रकाराविषयी माझ्या मनात बसलेली अढी आजही तितकीच ताजी आहे-सुमारे अठरा वर्षांनंतर ! “काईट” च्या सहा महिन्यांच्या मंद वास्तव्यात तोंडात बसलेला “पंजाबी सामोसा” अजूनही घशाखाली सरकत नाहीए. बहुधा महिन्याभराच्या इथल्या वास्तव्यानंतर ” रस्सा बटाटा” चेही असंच काहीतरी होईल.
बाकी चाळीस वर्षातील हॉस्टेल आणी वर्ग लाईफ फारच पुढे निघून गेलंय- वर्गात मोबाईल सतत सुरु, अस्वस्थ/अस्थिरता /चंचलपणा मुक्कामाला आलाय नव्या पिढीच्या. वर्गात काही म्हणजे काही न करता तुमच्या नाक्कावर टिचून नुसतं बसून राहणे-टिवल्या बावल्या करीत आणि जाताना उपस्थितीबाबत नको तितकी जागरूकता ! बाकी तुम्ही काय शिकवताय (किंबहुना काहीही शिकविले तरी आम्हांला फरक पडत नाही असा उच्चरवात दिला जाणारा मूक संदेश.) याच्याशी देणंघेणं नाही. पूर्वी किमान लाजेकाजेस्तव, शिक्षकांप्रती कमाल आदर दाखविण्यासाठी त्यांनी फळ्यावर खरडलेलं वहीत उतरवून तरी घेतलं जायचं. नंतर संकोचापोटी ” सर, तुमचे PPT मला पेन ड्राईव्ह मध्ये द्याल कां? ” हा अजिजीचा मधला टप्पा अनुभवला. आता सरळ-सरळ मोबाईलवर तुमच्या फळ्यावरील आकृतीचा सर्रास फोटो काढून घेतला जातो.
प्रत्येक वर्गाचे अधिकृत व्हाट्सअँप ग्रुप आणि ताबडतोबीने होणारे संदेशवहन ! शिक्षकांनाही अपरिहार्यपणे त्यामध्ये सामील व्हावे लागणे हा काळाचा सांगावा.
बाकी लायब्ररी वगैरे कालबाह्य. लिखित शब्दांवरचा विश्वास उडालेला आणि छापील पुस्तकांना विसरून युगे लोटलीत अशी सध्याची अवस्था. आम्हीं मात्र “होम इशू ” च्या पुस्तकांवर (अभियांत्रिकीची पुस्तके- पाठ्य आणि संदर्भ या दोन्ही कॅटेगरीतील) आणि “नाईट लायब्ररी ” मध्ये होणाऱ्या अभ्यासावर लहानाचे मोठे झालो. माधुकरीसारखे तेथील ज्ञानवाटपावर अवलंबून असायचो.
बाकी कपडे, भाषा, अभिरुची, जीवनशैली याबद्दल नको काही नोंदवायला. फार चघळून चोथा झालाय त्याचा- उगाच वयदर्शक उल्लेख व्हायचा.
चाळीस वर्षांपूर्वी आणि आजकाल अभियंते कसे घडतात (?) याबद्दल जाता-जाता केलेली ही काही निरीक्षणे. तेव्हाचे ” भारतीय ” अभियंते आता चकाचक “इंडीया” चे प्रतिनिधी झालेले आहेत.
मात्र रायपूरच्या आमच्या “अशोकरत्न ” इमारतीतील २००७ मधील एक आठवण मागील आठवड्यात नव्याने भळाळली – झाले असे
रायपूरच्या (साल २००७) आमच्या इमारतीच्या पार्कींगमध्ये एक इस्त्री वाले जोडपे, छोट्या बाळासह दिवसभर मान मोडून काम करीत असे. सकाळी सौ. एका छोट्या स्टोव्हवर शिळ्या भातावर प्रक्रिया करीत नाश्त्याच्या तयारीत असत तेव्हा त्यांचे श्रीयुत प्रत्येक फ्लॅटच्या बेलवर बोट ठेवीत इस्त्रीसाठी कपड्यांची बेगमी करीत हिंडायचे. आणि रात्री पुन्हा घरोघरी कपडे देण्यासाठी चकरा. हाती कमाई म्हणून क्षुल्लक रक्कम.
मागील आठवड्यात (साल २०२३) इथला “पवन” माझ्याकडे कपडे नेण्यासाठी आला. प्रत्येक नगासाठी (धुवून+ इस्त्री) त्याने दर सांगितला- फक्त १०रुपये ! मी अचंबित ! पुण्यात याच कामासाठी मी नगापोटी ४०-५० रुपये देतो.
म्हणजे ” भारत” आहे तिथेच आहे अजून. त्याला “इंडीया” व्हावेसे वाटत नसेल कां ? एकाच संकुलात बदललेले आणि न बदललेले विश्व गुण्यागोविंदाने नांदताना बघून हळूहळू निब्बर व्हायला झालंय.
रोज सकाळी इथला एक ड्राइव्हर शुचिर्भूत होऊन, तांब्याचे पूजा साहित्य लखलखीत करून माझ्यासमोर डोळे मिटून सूर्याची आराधना करीत दिसतो, तेव्हा वाटते, त्याने तरी बदलू नये.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply