नवीन लेखन...

कोजागीरी

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक श्री रविकिरण संत यांची ही कथा… 


माझ्या घरातील तीस-पस्तीस वर्षापूर्वीची एका रविवारची सकाळ. एका हातात गरम चहाचा कप आणि दुसऱ्या हातात मटा.
” अग ही बघ ‘सेलेब्रिटी सोबत कोजागीरी’ सहलीची जाहिरात.” मी बायकोला म्हणालो.
संध्याकाळी आम्ही दोघे पार्ल्यातील त्या सुप्रसिद्ध ट्रॅव्हल एजन्सीत गेलो.
” या साहेब,” हात जोडून स्वागत झाले. आम्ही एजंटला, ” सेलेब्रिटी सोबत कोजागीरी ” सहली बद्दल विचारले.
त्यावर ,”तुम्ही अगदी वेळेवर आलात. शेवटच्या चार सीटस् शिल्लक आहेत.”
” आम्हाला जरा सविस्तर प्रोग्रॅम सांगता का?” बायकोचा प्रश्न.
“हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.”
” डहाणूला पोचल्यावर तुम्ही थोडावेळ समुद्रकिनाऱ्यावर पाय मोकळे करा, फ्रेश व्हा त्यावेळी गरम चहा- काॅफी दिली जाईल. तेथे मग वपुसाहेब आपली एक छान कथा ऐकवतील.”
” सव्वानऊच्या दरम्यान जिलबीचे सुग्रास भोजन देण्यात येईल.”
” सव्वादहा वाजता वपुसाहेब आपली दुसरी कथा ऐकवतील त्यानंतर त्यांच्याशी गप्पागोष्टी.”
” अकरा वाजता पूर्णचंद्राच्या साक्षीने मसाला दूध पीत कोजागिरी साजरी करायची! मग विविध खेळ आणि गाण्याच्या भेंड्या! मंगळागौरी सारखी कोजागौर दमेपर्यंत जागवायची. रात्री दोनच्या सुमारास परतीचा प्रवास सूरू. पहाटे साडेपाचला पार्ल्यात आगमन!”
” बरोबर कंपनीतर्फे कोण असणार आहे?”
” आनंद गणपूले असतील.”
दोन माणसांचे ७०० रूपये भरून आम्ही घरी गेलो.
****
सहलीच्या गप्पा मारण्यात आठवडा कसा पार झाला ते कळलेच नाही.
पुढच्या शनिवारी साडेचारलाच आम्ही दीनानाथ समोर जमलो. साधारणपणे ३५ ते ६० वयोगटातील मंडळी दिसत होती. शिवाय दहा-बारा वर्षाची पाच-सहा मुलेही होती. तेवढ्यात बस आली. लगेच बायका- मुले आत चढून बसली. पुरूष मंडळी उगाचच बाहेर घुटमळत होती.
तेव्हड्यात एक गोरटेले किडकिडीत वयस्कर गृहस्थ, ‘आदर्श विद्यालय,सांताक्रूझ’ अशा बसवरच्या रंगीत अक्षरांकडे बोट दाखवून म्हणाले,” कोजागिरीचा सूर्य पहायला लागला नाही म्हणजे मिळवले.”
“अस का म्हणता काका?” माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या.
” अहो शहरात स्कूल बसेसचे शाॅर्ट रूट्स असतात. त्यामुळे ते जून्या गाड्या आणि गोटा झालेले टायर्स वापरतात. लाॅन्गरूटवर केव्हाही दगा देतात ते.”(नंतर हे गृहस्थ एस.टी.चे रिटायर्ड डेपो मॅनेजर असल्याचे कळले.)
इतक्यात एक रिक्शा थांबली, त्यातून कंपनीच्या नावाची टोपी घातलेल्या व्यक्तीबरोबर हसतमुख वपु उतरले, तशी बोलणी एकदम थांबली. त्या व्यक्तिने “आम्ही इथे दोघे आलो आहोत पण ओळख फक्त माझीच करून देणार आहे “मी आनंद गणपुले” अशी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. सर्वजण हंसत वपुंना नमस्कार करत भराभर बसमधे चढून बसले. वपु आणि गणपुले पहिल्या सीटवर बसले. मी त्यांच्या मागचीच सीट पकडली. बायको आधिच स्त्रियांच्या ग्रूपमधे सामिल झाली होती.

सर्वजण वपुंना कौतुकाने न्याहाळत होते. त्यांना ह्याची सवय असावी, ते सगळीकडे सहजतेने नजर फिरवत होते.
सव्वापाचला बस सुटली. बोरीवली नॅशनल पार्क जवळ फ्लायओव्हरचे काम सूरू होते. रोड डायव्हर्ट केला होता. वहाने फारच हळू चालत होती. वसई खाडीपूल ओलांडायला सात वाजले आणि लगेच दिवाळीतला फटाका फुटावा तसा आवाज करत बसचा मागचा टायर फुटला. बस भेलकांडत रस्त्याच्या कडेला थांबली.
लोकांनी एकच गलका केला. त्यांना हात जोडून शांत रहाण्याची विनंती करत गणपुलेंनी चपळाईने सुक्या नाष्ट्याची पाकिटे वाटून सर्वांची तोंडे बंद केली.

क्लिनरने टपावर चढून स्टेपनी खाली टाकली, जॅक लावला आणि हा हा म्हणता टायर बदलला. मग हरहर महादेवच्या गजरात पावणेआठ वाजता आमची दिंडी पुढे निघाली.

पुढे चालणाऱ्या ट्रक्सच्या कुर्मगतीमुळे मनोर नाक्यापर्यंत यायला नऊ वाजले.
” अहो गणपूले मुलांना भुका लागल्या हो.
इथेच काहीतरी खायला घाला.” पाठीमागून एका वहिनींचा त्रासिक स्वर ऐकू आला.
” वहिनी, कंपनीच्या स्थानिक कॅटररने तिथे जेवणाची सुंदर व्यवस्था केली आहे. आता इथे थांबलो तर तास दिड तास जाईल आणि डहाणूला पोचायला साडेअकरा वाजतील. जर असेच पुढे गेलो तर तासाभरात पोचू. बोला काय ते लवकर.”
शेवटी हो-ना करता करता,” वेळेवर जेवण रोजच असते पण एखाद्या वेळी उशिर होतोच की. कोजागिरीचा कार्यक्रम महत्त्वाचा.” वगैरे शेरेबाजी करत मेजॉरीटी मंडळीनी गाडी तशीच दामटण्यास सांगितले.
गणपूले नि:श्वास टाकून खाली बसले.
“गणपूले तुमच्यात लोकसभेचे सभापती होण्याच्या सर्व क्वालिटीज आहेत,” डोळे बारीक करत वपु म्हणाले. त्यावर गणपुले आणि मी दोघेही हळूच हसलो.
बस सुमारे दहा बारा किलोमीटर पुढे गेली असेल तोच खडाम-खडाम आवाज करत गचके देत ती थांबली.
” आता पुन्हा काय झाले ?” अशी सगळी कडून त्रासिक स्वरात विचारणा झाली.
गणपुले भरकन खाली उतरले. ड्रायव्हर, क्लिनर आणि बहुतेक सर्व लोकही उतरले. टाॅर्चच्या प्रकाशात वाकून चेक करत, ” ॲक्सल तुटला आहे, वेळ लागेल” असे ड्रायव्हरने सांगितले.
आता मात्र लोकांचे कोजागीरीचे चंद्रबळ संपले. लोक तारस्वरात गणपुलेंना अद्वातद्वा बोलू लागले. गाडी चांगली बघून आणता आली नाही का?असा जाब विचारू लागले.
“अहो गाडी आमची कंपनी ठरवते.”असे केविलवाण्या आवाजात सांगून, ” मी मेकॅनिकला घेऊन येतो.” असे म्हणत विरूध्द दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमधे ते पटकन चढले.
त्यानंतर बराच वेळ पुरूषांचा आणि स्त्रियांचा शिमगा डहाणूच्या जंगलाने ऐकला.
मी गर्दीत वपुंना शोधू लागलो. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पसरला होता. थोड्या अंतरावर एका झाडाखाली दोन्ही हात खिशात घालून उभे असलेले ते मला दिसले. मी पटकन त्यांच्याकडे गेलो आणि विचारले,” भूक लागली असेल ना?”
” नाही, एरव्हीही मी रात्री काही खात नाही.” मग माझ्याकडे पाहून एक स्मित करत म्हणाले,” तुम्ही कंटाळलेले दिसत नाही.”
” मी तसा विचारच करत नाही, उलट तुमच्या सहवासाचा आनंद लुटतोय!”
इतक्यात एक साठी पार झालेले भरगच्च मिशांचे, उंच, दणकट व धोतर- सदरा अशा वेशातले एक गृहस्थ आमच्यापाशी आले. हातातील चंची पुढे करून म्हणाले, ” घ्या राव तंबाकू घ्या.”
“नाही, नको,” आम्ही दोघे एकदमच म्हणालो.
मग त्यातली थोडी तंबाखू आपल्या तळहातावर घेऊन ते ती चुन्याने मळू लागले.
” आमी इट्याच पाटील. माजा धाकटा भाऊ आमदार हाय. त्यास्नी भेटाया आलो हूतो. म्हनला, दादा तुला शांत समुद्र बगायचाय ना? येक सहल जातिया. जा मजा कर. म्हनून त्यान तिकीट काडलं. पन हित समदी बोम्ब. बर ते जावद्या. तुमी शेती करता का नोकरी ?” ते वपुंकडे पहात म्हणाले.
“नाही, मी दोन्ही करत नाही.”
” मंग प्वाट कसं भरता?”
” मी पुस्तके लिहीतो!”
” कितवीची?” पाटलांनी निरागस प्रश्न विचारला. मला हसू आवरेना.
“नाही, मी शाळेची नाही इतर पुस्तकं लिहीतो.” वपु न चिडता म्हणाले.
” हां, म्हनजे आरत्या, अभंगाची आनी झालंस्तोर चरित्रांची.” पूढे ते म्हणाले,” पन त्याला संकलन म्हनत्यात.”
“मी सुध्धा कधी माझ्या आठवणींच, कधी कल्पनांच संकलन करतो.” वपु शांतपणे स्वतःला पाटलांच्या फाॅरमॅटमधे बसवत म्हणाले.
” हे बेस झाल, तुमचा आड्रस दिवून ठेवा. आता हिवाळी अधिवेशन झाल का लगोलग माज्या भावाच चरित्र लिवायच काम हाये. एकदा पूर्न झाल की शासनाला सांगून अभ्यासक्रमात लावून टाकू. फुडच्या पिढ्यांना त्यागाच म्हत्व समजाया पायजे ना?”
” हो तर,” वपु स्मिंत करत म्हणाले.
त्यानंतर पाटील वळून एका दूसऱ्या झाडाच्या दिशेने ( बहूदा लघुशंकेसाठी ) चालू लागले.
मी विषय बदलत वपुंना म्हणालो, “खरं तर आपण कोजागीरी साजरी करायला एकत्र आलोत, मला तर वाटतय इथेच बसून कथाकथनाचा कार्यक्रम सुरू करावा. चालेल का?”
” चालेल की.” वपु उत्तरले.
मी हात वर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना रस्त्यापासून थोडे लांब, कडेच्या हिरवळीवर यायला सांगीतले. “बस रिपेरींगचे काम होत राहील, आपण तोवर वपुंची कथा ऐकूया का? ” अशी विचारणा केली.
“हो.” असा एकसुरात आवाज आला. सर्वांची मरगळ एकदम नाहीशी झाली. जागा करून दाटीवाटीने सर्वजण हिरवळीवर बसले. तिथे खुर्ची नव्हती. पण तिथे रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी आणलेले मैलाचे चौकोनी दगड ठेवलेले होते त्यातल्या एकावर बसून लोकांकडे बघत वपु म्हणाले, “आयुष्यात असाही एक माईलस्टोन असेल याची कल्पना केली नव्हती.”
पहिल्याच वाक्याला हशा पिकला आणि वपुंनी श्रोत्यांस जिंकले.
पुढे त्यांची एक प्रसिद्ध कथा त्यांच्याच तोंडून ऐकून श्रोते धान्य झाले.
आता पुढची कथा सांगा असा आग्रह झाला.
” जरा ड्रायव्हरला कोणी विचारून येईल का, अजून किती वेळ लागेल?” वपुंनी विनंती केली.
“अजून अर्धा तास लागेल.” कुणीतरी निरोप घेऊन आला.
मग वाॅटरबॅग मधले थोडे पाणी पिऊन वपुंनी त्यांची एक गाजलेली अद्भुत फॅण्टसी (कथा) कथन केली. कथा खूप रंगली. श्रोते अगदी तल्लीन झाले. आम्हा सर्वांसाठी तो एक लाइफटाइम एक्स्पिरियन्स होता. कथा संपल्यावर सहलीला आल्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
” सर्वानी गाडीत बसा.” असा क्लिनरचा निरोप आला तेव्हा सगळ्याची अवस्था भारावल्या सारखी झाली होती. तहान- भूक जणू हरपून गेली होती.
“गणपुले कुठे आहेत?” बस सुरू होत असताना कुणीतरी ड्रायव्हरला विचारले.
“ते केव्हाच ट्रकमधे बसून पुढे तयारीला गेले.” ड्रायव्हरने ऊत्तर दिले.
****
वाऱ्याच्या गार झुळकेने माझे डोळे उघडले. बसमधे केव्हा डोळा लागला हे कळलेच नाही. समोर अथांग समुद्र दिसत होता. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. बहुतेक सर्वजण खाली उतरले होते. मीही खाली उतरलो. डावीकडे एक टेंट लावलेला होता. त्यावर ट्रॅव्हल एजन्सीचे बॅनर होते. बरीच माणसे उभ्याने खात असलेली दिसली.
मी जवळ गेलो तर गणपुलेंची हाक ऐकू आली.” या साहेब. जेवण वाढू ना?”
माझी काही खाण्याची इच्छा नव्हती. मी मान हलवून नकार दर्शवला.
” घ्या, तोंड तरी गोड करा. असे म्हणून त्यांनी माझ्या एका हातात जिलब्यांचा द्रोण आणि दुसर्‍या हातात मसाला दुधाचा ग्लास दिला. मी आजूबाजूला पाहिले तर सर्वजण हेच खात होते.
टेंटमधे जेवणाचे हंडे रचून ठेवलेले दिसले.
” ह्या अन्नाचे काय होणार?” मी विचारले.
“सकाळी कॅटररवाले जिल्ह्यां परिषदेच्या शाळेत वाटून टाकतील. हा नेहमीचा शिरस्ता आहे.” गणपुले ऊत्तरले.
“मग ठिक आहे.” मी मान हलवली. ” वपु कुठे आहेत?”
” त्यांची कंपनीने हाॅटेलमधे रहाण्याची सोय केली आहे. त्यांना तिथे सोडले.”
मला कसेसेच झाले. अजून खूप काही बोलायचे राहून गेले असे वाटले. मग मला त्या मसाला दूधाची चवही एकदम फिकी वाटली !!

(समाप्त)

— रविकिरण संत

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..