कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही. ते अॅसिडिटी कमी करणारे आहे. मराठीत त्याला कटांबी, कोकम, आमसूल, रातांबा अशी अनेक नावे आहेत.
कोकमची लालसर किंवा गडद जांभळी फळे असतात. त्याच्या सालींपासून आमसुले तयार केली जातात. आमसुलाशिवाय आपल्याकडच्या आमटीला चव येत नाही. कोकम या वनस्पतीचे शास्त्रीय नाव गार्शिनिया कम्बोगिया असे आहे. तो भारतीय मसाल्याच्या पदार्थांमध्ये मोडतो. कोकम ही वनस्पती आफ्रिकन आहे व ती झांझिबारमधून इकडे आली आहे.
कोकमचा रस म्हणजे आगळ (साखरविरहित), नारळाचे दूध, तसेच थोडीशी मिरची यांच्या मिश्रणापासून बनवलेली सोलकढी अतिशय चविष्ट व पाचक असते. कोकमात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे ते मुक्तकणांना (फ्री रॅडिक्लस) अटकाव करतात. त्यामुळे त्याचा उपयोग कर्करोग, हाडे ठिसूळ होणे, संधिवात अशा रोगांवर होतो असे म्हटले जाते.
कोकम फळात सायट्रिक अॅसिड, मॅलिक अॅसिड, पॉलिफेनॉल, कार्बोहायड्रेट, अँथोसायनिन, हायड्रोसायट्रिक अॅसिड, गारसिनॉल हे घटक असतात. कोकमच्या बियांमध्ये २३ ते २६ टक्के तेल निघते. त्याला कोकम बटर असे म्हणतात. त्याचा घट्ट गोळा बनतो. ते त्वचेवर लावल्यास त्वचा मऊसूत बनते. कोकम घरीही तयार करता येते. साधारण एप्रिल महिन्यात कोकमची फळे काही विशिष्ट दुकानात मिळतात. ती घेऊन चिरून साखरेच्या सिरपमध्ये बुडवून ठेवावीत व किंचित मीठ घालून ते लालसर पाणी प्यावे.तेच कोकम सरबत असते. असे ताजे सरबत केवळ उन्हाळ्यातच शक्य असते. त्याची चव बाजारात मिळणाऱ्या कोकमपेक्षाही फारच वेगळी व छान असते. कारण त्यात बियांचा आंबटसर गरही असतो. आयुर्वेदात कोकम सरबताला फार महत्त्व आहे.
त्यामुळे उष्माघात किंवा अतिसारात आराम मिळू शकतो. कोकम फळात अल्सरविरोधी गुण असतात. आता कोकम सरबत टेट्रापॅकमध्येही मिळते, पण ते महाग पडते. कोकम सरबताची पावडरही मिळते. त्यामुळे मधुमेहींना विनासाखरही हे सरबत घेता येते. शरीरातील जंतुसंसर्गाला त्यामुळे अटकाव होतो.
मूत्रविकारातही ते उपयोगी पडते. तहान भागवण्यासाठी उन्हाळ्यात वापरले जाणारे हे पेय इतरही वेळी उपयोगी पडते. कोकमपासून बनवलेल्या आमसुलाचे सार हे आजारी व्यक्तींच्या तोंडाला चव आणणारे व पाचक असते. एकूणच कोकणचा हा रानमेवा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचायला हवा.
Leave a Reply