धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख-समाधान लाभावे ही गावकर्यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण..!’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्या आहेत.
आचरा (ता. मालवण) गावाची गावपळण राज्यात प्रसिद्ध आहे. आचरा गावातील रामेश्वर मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. रामेश्वराची परंपरा म्हणून दर पाच वर्षांनी या गावात ‘गावपळण’ची प्रथा आजही पाळली जाते. रामेश्वराच्या कृपेने गावकऱ्यांवर कोणतंही अरिष्ट येत नाही अशी श्रद्धा आहे.शिवाय मालवण तालुक्यातील मसुरे-बिळवस गावाच्या गावपळणीत वेगळेपण आहे. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. आजारी व्यक्ती, लहान मुलांना घरी राहण्यास मुभा आहे. पाच दिवस ही ‘गावपळण’ चालते. कुठल्याही घरात पाच दिवस कचरा काढला जात नाही. घरातील चुलीवर जेवण बनवले जात नाही. त्यासाठी दुसरी चूल थाटतात. विशेष म्हणजे या कालावधीत घरच्या देवाची पूजा होत नाही. देवासमोर दिवा पेटत नाही. तसे बंधन आहे. रात्रीच्यावेळी गरजेपुरती वीज वापरली जाते. गावात, सुख, समाधान, शांती लाभावी हा या परंपरेमागचा उद्देश असल्याचे गावकरी सांगतात.
गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीची पूजाही पाच दिवस बंद ठेवली जाते. बिळवसची ‘गावपळण’ म्हणजे पूर्वी मसुरे गावाचीच ही ‘गावपळण!’ वाड्यांचा पसारा वाढल्याने बिळवस गावाने ही प्रथा सुरू ठेवली. देव दीपावलीला श्री देवी सातेरी मंदिरात गाव जमा होतो. धार्मिक विधीनंतर भात, काकडा, नारळ व दिवा ओवाळून बिळवसनजिक माळगाव-हुमरस सीमेवर ही ‘खोरणी’ घातली जाते. तिसर्या दिवशी गावपळणीस सुरुवात होते. गावभरणीच्या दिवशी ‘डाळ’ बसवतात. देवीला नारळ ठेवून पळण मान्य असेल तर कौल घेतला जातो. कौल दिल्यास त्याच दिवशी गाव भरतो.
गावपळणीच्या दिवसांत गावातील ग्रामस्थ गुरेढोरे घेऊन माळगाव-हुमरस भागात छोट्या झोपड्या बांधून राहतात. जेवणासाठीचे साहित्य बरोबर असते. गुरेढोरे गावात गावपळण पूर्ण होईपर्यंत प्रवेश करत नाहीत. नित्य व्यवहार चालूच असतात. थंडीच्या दिवसांतही ग्रामस्थ थंडी सहन करीत ही परंपरा जोपासतात. जंगली भागात ते वास्तव्य करतात, पण देवीच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्या मनाची तयारी आधीच झालेली असते. पूर्वी एक महिना ‘गावपळण’ असायची. आज ती पाच दिवसांवर आली आहे. ग्रामस्थांनी उभारलेल्या छोट्या झोपड्यांत रात्रीच्यावेळी गोष्टी, गायनाचे फड रंगतात. एकमेकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी कथन करण्यासाठी शेतकर्यांना हीच तर एक संधी असते. ज्येष्ठांच्या गप्पांत युवकांबरोबरच छोटी मुलेही सहभागी होतात. जेवणाच्या पंगती एकत्रच बसतात. त्यामुळे एकत्रित राहण्याची परंपरा या प्रथेने जपली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. गावातील रोगराई नष्ट होऊन गाव समृद्ध बनतो तो गावपळणीमुळेच अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गाव. या गावाचीही ‘गावपळण’ होते. देवीची चाकरी करणारे दर तीन वर्षांनी एकदा सहकुटुंब गावपळणीला जातात. तीन दिवस सीमेबाहेर राहिल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांना गुरव, घाडी आणण्यासाठी जातात. त्यानंतर नौबत होते. पारधी कौलप्रसाद होतो. एका बाजूला समुद्र तर दुसर्या बाजूला डोंगर, नारळी, पोफळीच्या बागायतीमध्ये मुख्य रस्त्यावरच भगवती देवीचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते.
५०० वर्षांचा इतिहास असणारी देवीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभार्यात काळ्या पाषाणात कोरलेल्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील कोरीवकाम असलेली पाषाणमूर्ती ४ फुटी आहे. प्राचीन शिल्पकलेचा तो अमूल्य ठेवाच आहे. देवालयाचे बांधकाम हेमाडपंथीय आहे. श्रीदेवी शिव यांच्या पूजेचे पाणी जमिनीखालून गोमुखाकडे उत्तरेकडे बाहेर येते. या गोमुखी शिवस्थानामुळे देवीला सोममुखी प्रदक्षिणा घालतात. पालखीचा मार्गही तसाच असतो. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. भगवती मंदिर आवारात श्री देवी पावणाई, भावय, अनभवणी, देव गांगो, देव गिरावळ, बायची आदी श्रद्धास्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिरातील देवीची पूजा लिंगायत, गुरव, पाध्ये यांच्याकडून होते. देवी दर तीन वर्षांनी मुणगे, करविणेवाडी येथील पाडावे यांच्या घरी आपल्या लवाजम्यासहित माहेरवाशीण बनून राहायला येते. या गावातील ‘गावपळण’ प्रसिद्ध आहे.
वैभववाडी तालुक्यापासून १४ कि. मी. अंतरावर असलेले शिराळे गाव! येथेही ‘गावपळण’ होते. साधारणत: जानेवारी महिन्यांत ही गावपळण होते. गाव सुना सुना होतो. त्यांची ‘गावपळण’ सात दिवसांची असते. दरवर्षी पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत शिराळेवासीय आपल्या लवाजम्यासह गाव सोडून नजीकच्या सडुरे गावाच्या हद्दीवर वास्तव्य करतात. हा त्यांच्यासाठी ‘सण’ असतो. त्यांची ग्रामदेवता दौडोबा. पाटील, मानकरी कौल घेतात. त्यानंतर गुराढोरांसह, लहान मुलांसह सर्वजण घर सोडून गावाबाहेर राहतात. विशेष म्हणजे मोकाट सोडलेली गुरे या गावपळणीच्या काळात गावाकडचा रस्ता विसरतात. तेथे पायही ठेवत नाहीत. गेली ४५० वर्षे ही ‘गावपळण’ येथे सुरू आहे. गावपळणीचा कालावधी संपला की भोरपी समाजाचा पारंपरिक ‘घोरीप’ खेळ सादर होतो. त्याला तेथे ‘नाडे घोरीप’ म्हणतात.
गावचे गावपण बिघडू नये याची दक्षता गावकरी घेतात. गाव सोडून दुसर्या ठिकाणी राहणे या कल्पनेमागे गावकर्यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे. गावात सुख, शांती, समाधान लाभावे, एकोप्याची भावना प्रत्येकात निर्माण व्हावी या हेतूनेच ही ‘गावपळण’ होते. गावातील शेतकर्यांसाठी ही एकप्रकारची ‘टूर’ म्हणावयास हरकत नाही. गावातील ग्रामदैवतांशी बांधील असणारा हा समाज तेथील चालीरीती आणि शिस्तीचे पालन करतो. त्यातूनच सुख-समृद्धी प्राप्त होतील या आशेवरच तो जगतो.
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
मला गावपळण बद्दल असणाऱ्या दंतकथांबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल का?