सिंधुदुर्गातली दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाच झपाट्यान शहरीकरण होत असतानाच फराळासाठी केल्या जाणाऱ्या ”चावदिसाच्या फॉवा” ची परंपरा आजही टिकून आहे.
दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात सकाळी फराळ करतांना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. या पोह्यांना मालवणी भाषेत ‘फॉव’ म्हणतात.
कोकणची दिवाळी म्हणजे पोह्यंचा महोत्सवच असतो. हे फॉव तयार करण्याची पद्धत सुद्धा पारंपारिक आहे. भाताच्या गिरणीमध्ये तयार होणाऱ्या आजच्या ‘इन्सटंट’ पोह्यांच्या जमान्यात सिंधुदुर्गातल्या काही घरात भातापासून तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांचं महत्त्व आजही टिकून आहे. या दरम्यान भाताचे नवीन पीक हाती आलेले असते. तो भात हे पोहे तयार करण्यासाठी आदल्या रात्री भिजत घालावा लागतो. सकाळी तो भात गाळून घेऊन चुलीवर मडक्यामध्ये भाजण्यात येतो. नंतर व्हायनामध्ये म्हणजेच लाकडी उखळीमध्ये हे भात घालून मुसळान कुटलं जातं. याला कांडपणे असं म्हणतात. कांडल्यानंतर तयार होणारे पोहे चुलीवरच शिजविले जातात. या अस्सल वाफाळलेल्या गावठी भातांच्या पोह्याची चव काही निराळीच असते.
पूर्वी हे पोह्याचं कांडप करतांना वयोवृध्द महिलांकडून ओव्यासुद्धा म्हटल्या जात. पण आता त्याही आता ऐकू येईनाशा झाल्या आहेत.
गिरणीवर सगळं तयार मिळत असताना किंवा बाजारात सगळे पदार्थ रेडीमेड मिळत असताना ते घरी तयार करण्याचा व्याप तरी का करायचा?
तसे पाहिलं तर आता कोकणातल्या घरांमधून माणसंही तशी कमीच झाली आहेत. तरीही काही एकत्र कुटुंबांतले लोक हौस म्हणून आजही सर्व परंपरा पाळतांना दिसतात… चावदिसाच्या फॉवाची मनसोक्त मजा लुटतात.
— संतोष
Leave a Reply