नवीन लेखन...

कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती

शेगटाच्या शेंगांची आमटी, भात आणि मस्त घरी कढवलेलं कणीदार साजूक तूप.
पोळी, मटकीची उसळ.
नारळाची चटणी, पोह्याचा आणि बटाट्याचा पापड.
खीर, पुरण.
ताजं कैरीचं लोणचं
आणि दूध तुपासहित पुरणपोळी.

ह्यावर्षीच्या होळीला घरी दुपारचा मेन्यू होता.

सुटीचा दिवस, हा टिपिकल कोकणस्थी मेन्यू आणि त्यानंतर तास दोन तासाची झोप!

त्याक्षणी समोर विठोबा उभा राहिला असता तर एकच मागणं मागितलं असतं.

“हेचि घडो मज, जन्मजन्मांतरी
मागणे श्रीहरी, नाही दुजे!!
अजून काही देऊ नकोस रे, हेच साक्षात मोक्षपद वगैरे आहे रे! ह्यापुढे अजून काही नकोच!”

” विठोबा, मेन्यूत अगदीच बदल करायचा असेल तर पुरणपोळीऐवजी आमच्या टिळकांचं श्रीखंड किंवा चितळ्यांचं आम्रखंड,  मटकीच्या उसळीऐवजी बटाट्याच्या काचऱ्या, पीठ पेरलेल्या तोंडलीच्या काचऱ्या, पडवळाच्या बियांची चटणी, पापडाऐवजी मिरगुंड, तीळ दाण्याची चटणी किंवा तळलेली सांडगी मिरची हे बदल कर. ब्रह्मानंदी वगैरे जे काय असतं ते फार सहज लागू रे!”

मी जातीयवादी नाही पण एखाद्या भरलेल्या पानात हिरमुसलेला तळणीचा मोदक किंवा लसणीच्या चटणीत लसणीच्या मोठ्या मोठ्या लठ्ठ कळ्या दिसल्या की मी ताटीयवादी नक्की होतो. त्यावेळी ह्या सर्वांपेक्षा आपल्या ताटात किती चांगलं वाढलं जातं ह्या विचाराने माझा ऊर भरून वगैरे येतो.

आपल्याकडे प्रत्येक सेक्शन ऑफ सोसायटीची खाद्यपदार्थांची एकेक स्टाईल असते. कोक्स लोकांची ती एक स्पेशल आहे. जन्मापासून मी ती बघत आणि उपभोगत आलोय.

पॅव्हेलियनमधून अनुष्का शर्मा विराट कोहलीची इनिंग जितक्या कौतुकाने बघते किंवा रणबीर कपूरला परफॉर्म करताना नितुसिंगला जेवढं कौतुक वाटतं तेवढंच अपार कौतुक मला आमच्या घरातल्या पदार्थांचं वाटतं.

स्ट्रेट ड्राईव्ह हा प्रकार जसा सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर ह्या सारस्वतांकडून शिकावा अगदी तसंच सुटीच्या दिवशी सकाळी हातात पिशवी घेऊन बाजारात गेल्याशिवायदेखील स्वयंपाक कसा चांगला होऊ शकतो, हे कोकणस्थांकडून शिकावं, बिनकामाचे दहा पंधरा मसाले न वापरतादेखील स्वयंपाक कसा चांगला होऊ शकतो हे कोकणस्थांकडून शिकावं, स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थाची शेजारच्या आळीत वासाकरवी दवंडी न पिटवता चविष्ठ कसं शिजवावं हे देखील कोकणस्थांकडून शिकावं.

डाव्या पायावर चेंडू आल्यावर लेग ग्लान्स मारून बाउंड्री कुणीही मिळवेल पण त्यात अजहरसारखी नजाकत असणं जेवढं महत्वाचं तेवढंच पदार्थ शिजवून झाल्यावर ते वाढणं देखील नजाकतीचं.  आणि म्हणूनच कोणत्याही पदार्थाला एकमेकांच्या टेरिटरीमध्ये घुसखोरी न करू देता डावी बाजू, उजवी बाजूंचा पानातला आब राखून पान कसं वाढावं, हेही आमच्याकडून शिकावं.

नारळ ह्या फळावर आमचा विशेष जीव आहे. नारळातलं कोलेस्ट्रॉल वगैरे आमच्यासाठी एकतर भाकडकथा आहेत किंवा अंधविश्वास.

परशुरामानी कोकणात नारळ रुजवला तो मुळात पोह्यांवर, साबुदाण्याच्या खिचडीवर, उपम्यावर, उसाळींमध्ये, कोशिंबिरींमध्ये किंवा आमटीमध्ये घालण्यासाठी. आठवड्याभरात दोन चार नारळाच्या वाट्या तुमच्या घरात संपत नसतील तर तुम्ही मॅच खेळूच नये. बारावा म्हणूनही तो कोकणस्थ कधी क्वालिफाय होऊ शकत नाही.

भाताबरोबर रस्सा हा प्रकार फार प्रचलित असतो. पण तो चालवून घ्यायचा म्हणजे वकार युनूससोबत दुसऱया एन्डला डेव्हिड जॉनसनला बॉलिंग देण्यासारखं आहे. भातासोबत आमटीच हवी. गोडं वरण किंवा साधं वरणदेखील चालेल पण रस्सा म्हणजे अगदीच नो नो.

यू नो व्हॉट- नारळाचे शहाळे, नारळ आणि सुकं खोबरं ह्या प्रकारचं वर्गीकरण आणि गोडं वरण, साधं वरण आणि आमटी हे वर्गीकरण माहिती नसलेला कोक्स टेनिस कोर्टवर बॉल बॉय म्हणूनच शोभून दिसेल अशी आमची फार घट्ट धारणा आहे. त्याने उगाच रॅकेट वगैरे हातात घ्यायच्या भानगडीत पडू नये.

नारळावर जेवढा आमचा जीव आहे तेवढाच तो उकडीच्या मोदकांवर आहे. लिझ हर्ली एकवेळ शेन वॉर्नसोबत पुन्हा संसार मांडून त्यांच्या मुलांना ‘सांग सांग भोलानाथ’ शिकवेल पण कोक्स कधीही तळणीच्या मोदकांच्या प्रेमात पडणार नाहीत.

मोदक हे उकडीचेच, तळलेले तर वडेही असतात हा त्यांचा विश्वास हडप्पा संस्कृतीसोबत जन्माला आला आहे.  वाफळणारे उकडीचे मोदक, ते उघडून त्यात तूप आणि जोडीला नारळाचं दूध! ऋषी मुनींचंसुद्धा तप मोडायला इतनाही काफी है, अप्सरा वगैरे गरजच नाही.

खीर, वरण, तळण, पुरण, मीठ, कोशिंबीरी, पंचामृत, दही, गोडधोड, डाळिंबी उसळ, काजूची उसळ, घट्ट दही, अळूची भाजी, फुलके हा अमराठी आणि रोडगे नावाच्या अमानुष नसलेल्या पोळ्या असे दहा पदार्थ पानातून पोटात गेले की समाधानाचे सिग्नल्स मेंदूत डायरेक्ट पोहोचतात.

सरते शेवटी ताक!

ताक हि उदरभरणाच्या यज्ञाची पूर्णाहुती आहे. ताक हि लास्ट बॉलवरची फिनिशिंग सिक्सर आहे. त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होऊच शकत नाही. ताकावर पोहणाऱ्या लोण्याच्या छोट्या छोट्या दाण्यांसाहित शेवटची आहुती द्यायची, विविधतेने नटलेल्या खाद्य परंपरेचा पाईक व्हायची पुन्हा एकदा प्रतिज्ञा करायची आणि निवांत वामकुक्षीचा रस्त्यावर लागायचं! विठोबा मोक्षपद द्यायला उभा असतोच.

— सारंग लेले, आगाशी.

सौजन्य : पराग खोत

श्री. उदय सप्रे यांनी WhatsApp वरुन पाठवलेला लेख 

त.टी- देवाच्या कृपेने आत्तापर्यंत वेगवेगळी कुझिन्स खायचा योग आला आहे. तरीही आपल्या घरच्या पारंपरिक जेवणाची आवड प्रत्येकाला असतेच. तशी ती मलाही आहे. ह्यात अवाजवी श्रेष्ठत्वाचं प्रदर्शन करून कुणाला दुखवायचा हेतू अजिबात नाही. गैरसमज नसावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..