नवीन लेखन...

कोकण ‘कन्या’

“ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात .. पण एकदम सुस्वभावी आणि कष्टाळू मुलगा.. नातीगोती सांभाळत सगळ्यांना जपणारा .. तो जवळच्याच दुसऱ्या गावात एका खाजगी कंपनीत नोकरीला .. वात छोटसं एकमजली घर .. मागे नारळ आणि जवळच थोडी कलमं ..

हळूहळू “ती” सुद्धा शक्य असेल तो एकेक व्यवसाय करू लागली.. आंब्यांच्या सीझन मध्ये आंबे विकायचे .. आपल्या कडचे संपले की पंचक्रोशीतून घेऊन विकायचे .. गच्चीत वाळवणं घालून केलेल्या चिकवड्या .. स्वतः राबून तळलेले गरे , आंबा -फणस पोळी, लोणची , सांडगी मिरची वगैरे .. असं काही ना काही वर्षभर सुरू ठेवण्यासाठी जीव ओतून काम करायची .. घरखर्चात आणि भविष्यासाठीच्या बचतीत आपला हातभार लागावा हाच हेतु ..

वयस्कर सासू-सासरे आणि हे दोघं असे मिळून मिसळून राहायचे त्या घरी .. तसं लहान वयात घरच्या बऱ्याच जबाबदाऱ्या अंगावर पडल्या होत्या .. दोनेक वर्षांत गोड मुलगी झाली .. नवऱ्यानी कंपनीतून कर्ज घेऊन गाडीसुद्धा दारात उभी केली.. तौक्ते आणि निसर्ग वादळ थोडा दणका देऊन गेलंच होतं .. पण त्या संकटाची पूर्वकल्पना असल्याने नुकसान कमी झालं .. बाकीची आजारपणं .. त्यात कोरोनाचं भूत मानगुटीवर होतंच वर्षभर .. अशा सगळ्या चांगल्या-वाईट वेळेत सगळे एकमेकांना धरून असायचे ..

पाऊस दोन दिवसांपासून मुसळधार कोसळतोय .. सालाबाद प्रमाणे अंगणात फुटभर पाणी .. कंपनीच्या कामानिमित्ताने चार दिवसांसाठी तो मुंबईत गेला होता .. सासरे आता साधारण ८५ च्या आसपास .. बऱ्यापैकी अवलंबून .. सासूबाईंचं नुकतंच मोतिबिंदूचं ऑपरेशन झालेलं .. खरं तर कोकणातल्या लोकांना असा पाऊस काही नवीन नाही .. पण आजचा पाऊस जरा जास्तच भयानक वाटत होता .. त्यात सोशल मीडिया आणि टीव्ही वर कोकणात पाणी भरत असल्याच्या बातम्या.. अपेक्षेप्रमाणे लाइट गेले … थोड्याच वेळात मोबाईल नेटवर्कनी प्राण सोडले .. बाहेर पाण्याच्या पातळीसोबत आता मनात भीतीची पातळी वाढू लागली.. हिला काय करावं कळेना .. भेदरलेली ४-५ वर्षांची लहान पोर आणि धीर खचलेले सासू-सासरे .. त्यात नवऱ्याला फोन लागेना .. ही धावत पळत गच्चीत गेली … लांबून येणारे पाण्याचे लोट , सतत वाढणारी पातळी बघून धस्स झालं .. त्याच पावली ताबडतोब खाली आली … एका हातात सासूबाईंना आणि कवटाळलेल्या लेकीला गच्चीत नेऊन बसवलं .. सावकाश हात धरून सासऱ्यांना सुद्धा सुरक्षितपणे गच्चीत आणलं .. पायाला भिंगरी लावल्यासारखी झपाझप वरखाली फेऱ्या मारल्या .. जे जे आणता येईल ते वर घेऊन आली .. मदतीला तरी कोणाला बोलवणार ??… आजूबाजूचे सगळेच भांबावलेले ..

गॅस शेगडी आणि सिलेंडर स्वतः उचलून वर चढवला .. खाण्यापिण्याचं थोडं सामान , काही भांडी , पैसे , किमती वस्तु , महत्वाची कागदपत्रं , थोड्याफार ईलेक्ट्रॉनिक वस्तु , सासू सासऱ्यांची औषधं , अंथरूण-पांघरूण , थोडे कपडे..
ताडपत्री , मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या , मिळतील त्या दोऱ्या-सुतळ्या ..

बारीक बारीक गोष्टींचा विचार करत, जे वाचवता येईल ते वाचवायचा प्रयत्न करत होती.. सारखं वर-खाली धावपळ करून अक्षरशः गळून गेली .. एव्हाना बाहेर दोन पुरुषभर पाणी .. गच्चीवर पत्रे घातले होते आणि बाथरूम वगैरे होतं ही एकमेव जमेची बाजू .. आता इतक्यात तरी हे सगळं पूर्ववत होत नाही याचा अंदाज आला ..

तिथे मुंबईत नवऱ्याची चलबिचल पण रस्ते बंद असल्याने येताही येत नव्हतं ..

खांबांना प्लॅस्टिक/ताडपत्री बांधून आडोसा तयार केला .. एखाद्या बंद खोलीसारखा .. एकीकडे पावसाचा रुद्रावतार आणि पुराचं थैमान .. मध्येच रडणाऱ्या लहान मुलीला सांभाळायचं .. दुसरीकडे दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना धीर द्यायचा ..

अशा सगळ्या जबाबदाऱ्या एकाच वेळेस पार पाडत होती बिचारी .. तेही स्वतः खचून न जाता .. सासूबाईंना डोळ्यात ड्रॉप , दोन वेळेस शक्य तो स्वयंपाक असं बरंच काही .. धैर्याने एकहाती किल्ला लढवत होती ..

२ दिवस असेच गच्चीत काढले सगळ्यांनी .. मध्येच खालच्या मजल्यावर जाऊन यायची कशीबशी .. काय शिल्लक आहे आणि काय नाही याचा आढावा घ्यायचा प्रयत्न .. सतत आदळणाऱ्या पावसाचा भयावह आवाज आणि गच्चीतून दिसणारं विक्राळ रूप .. अंगणात लावलेल्या गाडीचं तर फक्त छप्पर दिसत होतं .. आत्ता होत असलेलं आणि पुढे भोगावं लागणारं नुकसान डोळ्यासमोर दिसत होतं.. पण सध्या जीव वाचवणं आणि बाकीच्याना सांभाळणं जास्त महत्वाचं होतं .. त्यामुळे बाहेर कितीही पाणी असलं तरी डोळ्यांतून मात्र पाणी येऊ दिलं नाही ..

२ दिवसांनी पुर ओसरला तर आता घरात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य .. शक्य तितकं धुवून स्वच्छ केलं एकटीने .. कपाटाखालून , कपड्यातून एक दोन साप सुद्धा निघाले .. सगळीच काटा आणणारी परिस्थिती .. मोबाईल सुरू झाल्यावर नवऱ्याशी किमान बोलणं तरी झालं ..

दुसऱ्या दिवशी हायवे सुरू झाल्यावर मजल दरमजल करत तो सुद्धा पोचला एकदाचा .. घराची , गाडीची झालेली भीषण अवस्था बघवेच ना त्याला .. पण अचानक आलेल्या या संकटाला धीरोदात्तपणे सामोऱ्या गेलेल्या बायकोचं कौतुक वाटलं ..

श्रीकृष्णानी गोवर्धन पर्वत उचलत पावसापासून रक्षण केल्याची गोष्ट आपण ऐकतो .. पण हे तरी कुठे वेगळं होतं .. हा सुद्धा प्रतिकात्मक गोवर्धन पर्वतच तर होता .. या भयानक अनुभवाचे साक्षीदार असलेल्या सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात सूनेविषयीचा अभिमान तरळत होता ..

नवरा आलेला बघून मात्र तिचा बांध फुटला .. ओक्साबोक्षी रडत ती त्याला बिलगली .. लहान लेक सुद्धा कुशीत शिरली .. त्यानी सुद्धा भरल्या डोळ्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, “ तुला मजा मस्करीत “मुंबईची मुलगी” म्हणून चिडवायचो मी कधीतरी ss पण या सगळ्याची कसलीच सवय नसूनही मोठ्या धीरानी , संयम आणि प्रसंगावधान दाखवत इतकी नाजुक परिस्थिती तू ज्या पद्धतीनी हाताळलीस .. खरंच अभिमान वाटतो तुझा.. आमच्यासाठी तूच “कोकण कन्या” !!

(या आपत्तीला तोंड देत , आपापलं घरदार , माणसं वाचवण्यासाठी पराकाष्ठा करणाऱ्या या अशा सगळ्याच कोकणपुत्र आणि कोकणकन्यांना त्रिवार सलाम)

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..