समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून! वालुकामय, चिखलयुक्त किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या-त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते.
शास्त्रज्ञ सांगतात की, पृथ्वीची उत्पत्ती 3.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी झाली आणि या उत्पत्तीच्या कालावधीत निर्माण झाले महासागर, समुद्र आणि जमीन. या सागरांचा आपल्या सगळीच जीवसृष्टीशी महत्त्वाचा संबंध आहे. आपले जगणे आणि श्वास घेणे, पृथ्वीवरचे कार्बन आणि प्राणवायूचे चक्र, आपल्या हवामानात होणारे बदल, पृथ्वीवरचे जलचक्र आणि त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या गोड्या पाण्याचे स्रोत, आपले खास आवडीचे सीफूड म्हणजे मासे आणि इतर जलचर, सारे समुद्राशी, त्याच्या पर्यावरणाशी निगडित आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71 टक्के भाग व्यापणाऱ्या या जलस्रोतांचा हिस्सा भारतालाही लाभला आहेच. मेरीटाईम नेशन असणाऱ्या भारताच्या पश्चिमेला असणारी कोकण किनारपट्टी म्हणूनच महत्त्वाची! महाराष्ट्राला लाभलेला हा 720 किलोमीटरचा सागरकिनारा म्हणजेच आपली कोकण किनारपट्टी. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे कोकणात समाविष्ट आहेत.
या पार्श्वभूमीवर कोकण म्हटलं की नजरेसमोर येतो तो नजरेच्याही टप्प्यापलीकडे पसरलेला समुद्र…. त्याचा अथांग निळाशार गहिरेपणा, त्याला वेढणारे चमचमत्या वाळूचे स्वच्छ सुंदर किनारे आणि झालरीसारख्या पांढऱ्या शुभ्र लाटांचं त्याला लाभलेलं कोंदण! पण समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून! वालुकामय, चिखलयुक्त किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या – त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते. सूर्यप्रकाश पोहोचू शकणाऱ्या पेलॅजिक झोनपासून ते जिथे प्रकाश पोहोचू शकत नाही अशा गडद अंधाऱ्या अबायसल झोनपर्यंत हे समुद्राचं राज्य पसरलेलं आहे. आपला हा समुद्रही अद्भुत आणि अजूनही न कळलेल्या अशा कित्येक जलचरांचे निवासस्थान आहे. या अंडर वॉटर जगाचे आपल्याला सतत कुतूहल वाटत असते. यातील फोटिक म्हणजे प्रकाशमय भागात सूक्ष्म एकपेशीय वनस्पती आणि प्राणी प्लवंगांपासून अफाट पसरलेल्या सागरी शैवाल ते अवाढ्यव्य शरीराच्या व्हेल्सपर्यंत असंख्य जलचर राहत असतातच. पण समुद्राच्या खोल भागातही अनेक जलचर वास्तव्य करून असतात. इथल्या अंधाराला, अत्यंत कमी तापमानाला आणि इथे असणाऱ्या प्रचंड दाबाला अनुकूल अशी त्यांची शरीररचना त्यांना इथे जगायला मदत करत असते.
वालुकामय किनारे : वाळू, शंख – शिंपले यांचा चुरा आणि बारीक खडी यांनी व्यापलेले हे किनारे समुद्राचे बफर झोन्स म्हणता येतील. लाटांचा तडाखा सतत सहन करत, हे किनाऱ्यांचं संरक्षण करत असतात. सिलिका वाळू किंवा कार्बोनेट वाळू अशा दोन प्रकारची वाळू इथे आढळते. या वालुकामय किनाऱ्याचे निरीक्षण केल्यास इथे आपल्याला असंख्य प्रकारचे आणि आकाराचे मृदुकाय प्राण्यांच्या वर्गातील जीवांचे शंख – शिंपले वाळूत रुतलेले आढळतील. तसरे मुळ्ये, वाटी किंवा लाळी मुळ्ये, बटन शेल्स, एंजल विंग्स आणि अनेक प्रकारचे छोटे मोठे शिंपले इथे पाहायला मिळतात. तसेच वाळूवर तुरुतुरु धावणारे घोस्ट क्रॅब्स, लाटांबरोबर वाहून आलेले स्टारफिश आणि फुग्यासारखं किंवा छत्रीसारखं शरीर असणारे जेलीफिशेस ही इथे पाहायला मिळतात.
खडकाळ किनारे : कोकणच्या किनारपट्टीत अनेक ठिकाणी खडकाळ किनारपट्टी बघायला मिळते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीत अग्निजन्य खडकामुळे तयार झालेले महत्त्वाचे 32 खडकाळ किनारे आहेत आणि ते इंटर टायडल इकॉलॉजीचा महत्त्वाचा भाग आहेत. वाळू आणि त्यांच्या अध्ये- मध्ये असणारे हे खडक भरतीच्या पाण्याला काही प्रमाणात अडवून रॉक पूल्स तयार करतात आणि हे पूल्स असंख्य प्रकारच्या सूक्ष्म वनस्पती, प्राणी प्लवंगांपासून मोठ्या सागरी शैवाल, मासे, समुद्रफुले, सी अर्चिन, खेकडे, सी स्लग्ज (समुद्र काकडी), प्रवाळ, स्पॉन्जेस, शंख – शिंपले आणि इतर जीवांना आसरा देतात. प्रत्येक रॉक पूल ही एक स्वतंत्र इको सिस्टिम असते. सागरी शेवाळाचे कॉलरपा, उल्व्हा, पडायना, एंटेरोमॉर्फा, पोरफायर तसेच काही कोरलाईन अल्गी ही इथे आढळतात. अनेक प्रकारचे लहान मोठे सुंदर रंगीत मासे उदाहरणार्थ डॅमसेल, टार्गेट पर्च, सार्जंट मेजर, बोयर, स्कॅट तर इथे आढळतातच पण या पूल्सचं सौंदर्य खुलतं ते इथल्या प्रवाळ आणि त्यांच्या सोबतीने वाढणाऱ्या स्पॉन्जेसमुळे! सच्छिद्र शरीर रचनेचे हे प्राणी खडकांना किंवा प्रवाळांना चिकटून वाढतात. पांढऱ्या रंगापासून ते स्पंज निर्माण करतात लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी, केशरी अशा अनेक रंगांचे स्पॉन्जेस कोकण किनाऱ्यांवर आढळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पॉन्जेसपासून वेगवेगळ्या रोगांवर औषधे मिळू शकतात हे आता सिद्ध झाले आहे आणि आम्ही त्यावर कामही सुरू केले आहे. या स्पॉन्जेसच्या अनेक प्रजाती आपल्याकडे आढळतात. त्यात हॅलिक्लोना, ओपलीथिओस्पॉन्जीया, अँफीमेडॉन, हायोर्टीस, आयलोक्रॉईया, झेटोस्पॉन्जीया अशा प्रजाती सापडतात. पण यांचा अजून अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज आहे. खारफुटीची जंगले आणि चिखलयुक्त प्रदेश : सगळ्या सागरी किनाऱ्यांचा हा महत्त्वाचा भाग. खारे किंवा निमखारे क्षेत्र, खाड्या, बॅक वॉटर्स, सॉल्ट मार्श आणि कोस्टल मड फ्लॅट्स यांना लागून असणाऱ्या प्रदेशात क्षारतेतील बदल सहन करू शकणारी ही विशेष झाडे आढळतात. हे खारफुटीचे प्रदेश म्हणजे सागरी जलचरांची आश्रय आणि खाद्य स्थानेच! मासे आणि अनेक जलचर इथे अंडी घालायला येतात आणि त्यांची पिल्ले इथल्या पोषक वातावरणात वाढून, आपल्या पुढील जीवनक्रमासाठी सागराकडे स्थलांतर करतात. ही क्षेत्रे ‘बायोझोन्स’ म्हणूनही ओळखली जातात. कारण समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा किंवा त्सुनामीचा तडाखा झेलून, त्यांचा वेग कमी करण्यात ते मदत करतात. म्हणूनच खारफुटी प्रदेशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किनाऱ्यांची धूप टाळण्यासाठी ही खारफुटी किंवा चिपीची झाडे महत्त्वाची ठरतात. या झाडांना हवेतून प्राणवायू घेण्यासाठी खास मुळे असतात. मासे, खेकडे, इतर अनेक कवचधारी प्राणी, साप, सरडे, बेडूक, मगर, ब्राह्मणी घार, गरुड, कावळे, बगळे, खंड्या असे अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, शंख – शिंपले वर्गीय प्राणी या खारफुटीच्या प्रदेशात राहत असतात. तिवर, किरपा, लहान झुंबर, झुंबर, किरकिरी किंवा सोनचिपी, कांदळ, मोठा कांदळ, लाल कांदळ, करपू, मरांडी, भेलांडा असे खारफुटीचे प्रकार आपल्या इथे सापडतात. त्याचबरोबर मॅन्ग्रोव्ह असोसिएट प्रकारात मोडणारे मिस्वाक, कांदळवन नेचे, घोळ, गोट्स फूट, बरिंगटोनिया अशा अनेक वनस्पती इथे आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील कित्येक वनस्पती औषधी आहेत आणि किनारपट्टीतील लोक यांचा आपल्या आहारात किंवा औषधांत वर्षानुवर्षे वापर करत आहेत.
मड फ्लॅट्स किंवा चिखलयुक्त प्रदेश हे प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या सिल्टमुळे तयार होत असतात. ही एक अतिशय उत्पादक अशी इको सिस्टिम असते. मुंबईतील शिवडी यापैकीच एक. या ठिकाणी दरवर्षी येणारे फ्लेमिंगोज आणि इतर स्थलांतरित पक्षी या आगारातील एक वेगळीच ओळख देतात.
प्रवाळांचे क्षेत्र : या सगळ्या सागरी परिसंस्थेत प्रवाळांच्या बेटांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. केंब्रियन युगात 535 अब्ज वर्षांपूर्वी अस्तितवात आलेली ही प्रवाळ खरं तर असंख्य जलव्याल किंवा हायड्रा सारख्या प्राण्याची वसाहत असते. स्वतःच्या संरक्षणासाठी ते कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण स्वतःभोवती तयार करत असतात. याचबरोबर त्यांनी स्रवलेल्या रंगद्रव्याप्रमाणे हे प्रवाळ लाल, गुलाबी. पिवळे, केशरी, जांभळे, निळे अशा विविध रंगछटांमध्ये आढळतात. या प्रवाळाच्या कॉलनीज समुद्रतळावर तसेच खडकाळ किनारपट्टीतही वाढतात. आपल्या वन्य जीव संरक्षण कायद्याने प्रवाळांच्या सगळ्या प्रजातींना संरक्षित म्हणून घोषित केलं आहे. ही प्रवाळे आपल्या महाराष्ट्राच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीतही आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यापासून जवळ असणारे आंग्रिया बँक हे तर खास उल्लेख करण्यासारखे बेट आहे. 800 चौरस किमी क्षेत्रफळाच्या या समुद्रात बुडलेल्या बेटाभोवती प्रचंड जैवविविधता आढळली आहे. इथे संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या संशोधकांना इथे एकूण जैवविविधतेच्या 200 प्रजातींमध्ये प्रवाळाच्या 54 प्रजाती आढळल्या आहेत. याचा विचार करतानाच आपल्या रत्नागिरी किनारपट्टीत सापडणाऱ्या प्रवाळांच्या प्रजातींचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल. प्रवाळांची बेटे किंवा रीफ्स असंख्य जलचरांच्या सपोर्ट सिस्टिम्स आहेत. अन्न मिळवण्यासाठी , निवारा किंवा लपण्याच्या जागा म्हणून किंवा नर्सरी ग्राउंड्स म्हणून अनेक जलचर या प्रवाळांच्या बेटांचा आश्रय घेतात.
प्रवाळांच्या सोबत वाढणारे स्पॉन्जेस, सागरी शैवांल आणि इतर जीव हे अनेक सागरी अन्न साखळ्यांचे दुवे असतात. आपल्या किनारपट्टीचा अभ्यास करताना प्रवाळ आणि या सागरी स्पॉन्जेसचा असलेला सहसंबंध लक्षात येतो. त्याच बरोबर चांदणी मासे, ब्रिटल स्टार, सी अर्चिन, इलिशियासारखे न्यूडिब्रँक्स, मासे, कालवे, शिंपले आणि सागरी शैवालाच्या कॉलरपा, सरगॅसम, पडायना, कोरॅलीना, अँफिरोआ सारख्या कोरलाईन अल्गी, उल्व्हा, ग्रॅसिलॅरिया आणि इतर असंख्य प्रजाती इथे सापडतातच पण त्याच बरोबर खेकडे, समुद्र काकडी, डॅमसेल, सार्जंट मेजर सारखे अनेक रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या 18 प्रजाती इथे सापडल्या आहेत. हे आपल्या किनारपट्टीतील जैवविविधतेचं द्योतक आहे आणि म्हणूनच त्याची काळजी, संरक्षण तेवढंच गरजेचं आहे. रत्नागिरीच्या अलावा, मिऱ्या, उंडी, वायंगणी अशा बहुतेक खडकाळ किनाऱ्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजाती विशेषतः फॅविआ, हार्ड कोरलच्या पोरिट्स, अक्रोपोरा, मोन्टीपोरा अशा प्रजाती आपल्या किनाऱ्यावर आढळतात.
पण आज जगभरातील प्रवाळांचा मृत्यू आणि त्यामुळे त्यांचे होणारे ब्लिचिंग ही चिंतेची बाब बनली आहे. International Union for Conservation of Nature च्या अभ्यासानुसार जगभरातील सागर खूप जास्त प्रमाणात उष्णता शोषित आहेत आणि त्याचबरोबर त्यात विरघळणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही अनेक पटीने वाढले आहे. समुद्रातील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांवर त्याचा परिणाम होऊन त्याची उत्पादकता आणि कार्यक्षमता जर अशीच घटत राहिली तर त्यातील अन्नसाखळींवर त्याचे दूरगामी परिणाम होतील.
म्हणूनच आपली जैवविविधता जपणे आपले कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही. ही जैवविविधता आपल्या किनारपट्टीला एक विशेष ओळख तर देतेच पण आपल्याला मिळणाऱ्या मत्स्यसंपत्तीतही या सगळ्या प्रवाळ आणि त्यांच्या सोबतच्या या सजीवांची महत्त्वाची भूमिका असते. समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला एक वेगळा आयाम ही जैवविविधता मिळवून देऊ शकते. पण ह्या जैवविविधतेला धक्का न लावता तिचा योग्य उपयोग करून घेता येऊ शकेल. पर्यटनाला जागरुकतेची जोड देऊन अनेक ठिकाणी तसे प्रयोग केले गेले आहेत. डोळसपणे आपल्या या नितांत सुंदर जैवविविधतेचा शोध, अभ्यास आणि योग्य उपयोग करणे आपल्याच हातात आहे. समुद्र, ज्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व आहे….. त्याचा विचार, अभ्यास आणि जोपासना याची प्रतिज्ञा आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे. बदलते हवामान, येणाऱ्या महामारी आणि एकूणच पृथ्वीवरील जाणवणारे बदल यांच्या पार्श्वभूमीवर आज आपण आपलीही जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.
डॉ. स्वप्नजा मोहिते
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply