कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. निसर्गावरील ओरखडे म्हणजे मातीचा नाश. विज्ञान सांगते की, जेव्हा एक पूर्ण वाढलेला स्थानिक वृक्ष मुळापासून नष्ट केला जातो.
माती हा कृषीचा कणा आहे. जेव्हा ती सेन्द्रिय कर्ब, मूलद्रव्ये आणि उपयुक्त जीवाणूंनी समृद्ध असेल तर हा कणा नेहमीच ताठ, सरळ असतो आणि म्हणूनच अशा मातीमधून पोषण प्राप्त करणारी पिके सुद्धा तेवढीच सुदृढ असतात. मातीचा स्तर हा स्थानिक भौगोलिक परिस्थिती, तेथील पाऊस पाणी आणि वाहणाऱ्या वाऱ्यावर अवलंबून असतो. सतत पाऊस पडणाऱ्या भागात माती ही कायम चीबड असते म्हणूनच अशा जमिनीत पाणी साचतच जाते आणि त्यास पर्याय म्हणून भातासारखे पिक घेतले जाते.
भारताच्या उत्तर पूर्वेकडील राज्यात भरपूर पाऊस पडतो त्याच प्रमाणे महाराष्ट्राच्या कोकण भागातही म्हणूनच भाताशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नसतो, विदर्भामधील माती गडद काळी म्हणूनच कापसासारख्या पिकाला योग्य असते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ती काळसर रंगाची असते मात्र या दोन भूभागांच्या तुलनेत कोकणची माती मात्र लालसर रंगाची आहे आणि त्यास कारण आहे त्या मातीमध्ये असलेले लोहाचे प्रमाण. मुसळधार पाऊस, वारा, थंडी आणि तापलेला उन्हाळा यामुळे या भागामधील लाल जांभा दगडाचे विदिरीकरण होते आणि यातून लाल मातीचा जन्म होतो. ही हजारो वर्षांची प्रक्रिया आहे. कोकणात पश्चिम घाटाची श्रीमंती अफाट आहे, या वृक्ष संपन्न घाटापासून मिळणारी जमिन मात्र काळसर असते कारण मूळ लोह मिश्रीत मातीमध्ये वनस्पतींची पाने व इतर भाग पावसामध्ये कुजून जातात आणि त्यात सेन्द्रिय कर्ब जो काळसर रंगाचा असतो तो वाढू लागतो आणि मातीचा रंग बदलतो. ही माती सुद्धा कृषी उत्पादनासाठी उत्तम समजली जाते. थोडक्यात उत्तर कोकणात म्हणजे पालघर, ठाणे भागात मातीचा रंग काळपट असतो तर दक्षिण कोकण जो गोव्याला जोडलेला आहे तेथे लाल मातीचे प्रमाण जास्त आहे.
कोकणात समृद्धीपासून स्वयंसिद्धता प्राप्त करण्यामध्ये येथील मातीचे योगदान फार मोठे आहे. कोकणच्या सपाट पठारावर लाल मातीच्या खाली जांभा दगड असतो, या दगडाने आज कोकणला समृद्ध केले आहे ते त्यावर उगवून स्थिर झालेल्या हापूसच्या बागांनी. जांभा खडकामधील लोहाचे प्रमाण हापूसच्या लाल गरामध्ये उतरते आणि त्याचा स्वाद आणि चव उत्कृष्ट होते, जांभा दगड आणि त्यावर अनेक वर्षापासून स्थिर झालेल्या हापूसच्या बागांनी आज कोकणला समृद्धीपासून स्वयंसिद्धतेकडे नेले आहे हा संपूर्ण हापूस निर्यातक्षम आहे, तरी पण फळांची संपूर्णपणे निर्यात करण्यापेक्षा स्थानिक तरुण आणि महिलांना रोजगार निर्मितीसाठी त्यामधील अर्धा वाटा तरी हापूस प्रक्रिया उद्योगासाठी वापरणे गरजेचे आहे.
जांभा दगडाचे संरक्षण आणि संवर्धन होणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आज या बहुमोल दगडाचे उत्खनन सुरू आहे. कोकणचा निसर्ग वाचवायचा असेल तर सर्वप्रथम पश्चिम घटामधील अवैध खाणकाम थांबवायला हवे. कोकणच्या लाल मातीवर भात, नाचणी आणि वाल यांचे उत्पादन घेतले जाते. जमिनीमधून प्राप्त झालेले लोह आणि इतर मूलद्रव्ये भाताच्या धान्यात येतात मात्र या भाताला पॉलीश केल्यामुळे ही सर्व पोषक मूल्ये कोंड्यामधून निघून जातात.
कोकणच्या समृद्ध लाल माती मधील मूलद्रव्ये म्हणजेच नत्र आणि पालाश आपणास नाचणीमध्ये आढळतात. नाचणी ही डोंगर उतारावर लावली जाते आणि हे पीक पावसामध्ये वाहून जाणाऱ्या बहुमोल लाल मातीस स्वतःच्या मुळांनी बांधून ठेवते. कोकणच्या लाल मातीचे संरक्षण करायचे असेल तर तेथील डोंगरावर नाचणी लावणे आवश्यक आहे. नाचणी हे पारंपारिक सेन्द्रिय पीक आहे, त्यांचा उताराही कमी असतो म्हणून सध्या कोकणचा शेतकरी भाताच्या तुलनेत या पिकाबद्दल बऱ्यापैकी नकारात्मक भूमिकेत आहे, आणि यास कारण आहे तेथील स्व-मालकीचे डोंगर, डोंगरावरील वृक्षतोडीमुळे तेथील दोन्हीही प्रकारचा बहुमोल मातीचा र्हास होत आहे. वृक्षछायेविना उघडी पडलेली ही माती मुसळधार पावसात वाहून खाली येते आणि नदी पात्रे गाळांनी भरून जातात, चिपळूण, महाडमध्ये साचलेला नद्यांच्या पुरामुळे गुडघ्याएवढा साचलेला चिखल कोकणच्या मातीचा र्हास दर्शवितो. हे सर्व स्वमालकीचे डोंगर वृक्ष संवर्धन आणि संवर्धनातून पुन्हा हरित झाले तरच आपण तेथील मातीचा र्हास थांबू शकतो. अनेक उद्योग समूह या डोंगरांचे कार्बन क्रेडीट घेऊन शेतकऱ्यांना नियमित मोबदला मिळवून देताना तेथील मातीचे अगदी सहज रक्षण करू शकतात.
कोकणच्या लाल मातीला हजारो वर्षाचा इतिहास आहे पण रासायनिक खतामुळे तिच्यामधील सत्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कोकणामध्ये अशा मातीच्या दरडी कोसळतात त्याला कारण डोंगर माथ्यावरील रासायनिक खतांचा वापर. माळीण गावची दुर्घटना याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाटावरील अहवालानुसार या संवेदनशील भागात रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वापरावर पूर्ण बंदी केली तरच येथील माती नद्यांमधून अरबी समुद्रामध्ये जाण्यापेक्षा जागेवरच स्थिर राहून तिचे संरक्षण होऊ शकते.
वाल अथवा पावट्याच्या शेतीमधून सुद्धा कोकणच्या लाल मातीचे उत्कृष्ट पद्धतीने संवर्धन होते आणि यास कारण आहे या पिकांच्या मुळांवर असलेल्या नत्र जीवाणूंच्या गाठी. पिक काढल्यानंतर या गाठी जमिनीमध्ये तश्यात राहतात आणि माती पौष्टिक होते. कोकणमधील आंबा, नारळ, कोकम, सुपारी आणि काजू या वृक्षांचे तेथील लाल मातीशी घट्ट नाते आहे. हे वृक्ष कमी होणे म्हणजेच मातीचा र्हास. म्हणूनच या वृक्षझालरी खाली येथील भूमी संपूर्ण आच्छादित होणे गरजेचे आहे.कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. निसर्गावरील ओरखडे म्हणजे मातीचा नाश. विज्ञान सांगते की, जेव्हा एक पूर्ण वाढलेला स्थानिक वृक्ष मुळापासून नष्ट केला जातो तेव्हा त्याची डेरेदार सावली आणि मूळांची खोली एवढी पौष्टिक मृदा कायमची नष्ट होते, म्हणूनच येथील मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर कोकणामधील प्रत्येक डोंगर लोकसहभागामधून संवेदनशील म्हणून घोषित होणे गरजेचे आहे. हे डोंगर संरक्षित झाले तरच नद्यांचे उगम सुरक्षित राहतील, त्यांच्या वेगावर नियंत्रण राहील आणि मातीला खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल.
कोकणची लाल माती हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे. तिचे जगणे, राहणे हे कोकणच्या समृद्धीशी जोडलेले आहे म्हणूनच या मातीच्या रक्षणासाठी मोकळ्या जागांवर मोठमोठी गवताळ कुरणे तयार होणे आवश्यक आहे. ही कुरणे मातीला धरून ठेवतात. यावरील गवत खाण्यास पाळीव पशुधन येते, त्यांच्या मलमूत्रामधून ही माती अजून जास्त सुदृढ होते. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया भागात तेथील मातीचे रक्षण करण्यासाठी अशा गवत कुरणांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.
कोकणाच्या पश्चिम घाटामधील माती ही जास्त समृद्ध आहे. या मातीचा स्रोत शेतीच्या लाल मातीत मिसळल्यास जीवाणूचे प्रमाण त्याचबरोबर कर्ब मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते. कोकणच्या माती संरक्षणासाठी तेथे रासायनिक खतांच्या अनियमित, अनियंत्रित वापरावर बंदी हवी. रासायनिक खत मिश्रित माती लोंढ्याच्या रूपात सहज़ वाहून जाते म्हणूनच रासायनिक खताऐवजी या मातीत जैविक घटक जेवढे जास्त वाढवता येतील तेवढा प्रयत्न करावयास हवा आणि यासाठीच म्हणूनच भात शेतीसाठी नील हरित शेवाळाचा जास्त वापर हवा. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अजून तरी कोकणची माती रासायनिक खतापासून बऱ्यापैकी संरक्षित आहे. मात्र पश्चिम घाटामधील सेंद्रिय कर्बाचा तिला हवा तेवढा फायदा आजही मिळत नाही.
कोकण कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचे मृदा संवर्धन आणि संरक्षणामधील संशोधन अतिशय मोलाचे आहे पण ते तळागाळामधील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे अतिशय गरजेचे आहे. फिरत्या परीक्षण प्रयोग शाळेच्या नकाशावर कोकणचे प्रत्येक गाव आणि त्यास जोडलेल्या वाड्या येणे आवश्यक आहे. कोकणमध्ये खऱ्या अर्थाने समृद्धी हवी असेल तर येथील लाल मातीत मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन होणे जरुरीचे आहे कारण ही माती त्यास जास्त पोषक आहे.
कोकणच्या मातीत उबदारपणा आहे ओलावा तर आहेच पण जैवविविधता सुद्धा तेवढीच श्रीमंत आहे. कोकणच्या विकासासाठी तेथील सुंदर निसर्ग, रुपेरी समुद्र किनारे, विविध प्राणी, पक्षी, जलस्रोत याबरोबर तेथील मातीही तेवढीच जबाबदार आहे. या मातीचे रक्षण केवळ लोकसहभागामधूनच होऊ शकते. कोकणी माणसाला त्याच्या मातीचा सुगंध जेवढा आवडतो तेवढे तिचे जतन सुद्धा करणे कारण ही लाल मातीच कोकणला खऱ्या अर्थाने समृद्धी कडून स्वयंसिद्धतेकडे घेऊन जाऊ शकते.
–डॉ. नागेश टेकाळे
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply