
दिवसाच्या पहिल्या उजेडाने , दंवाने ओल्या झाल्यामुळे झळाळी आलेल्या माडांच्या झावळ्या. त्यातून वर वर जात असलेला निळसर धूर. आकाश बऱ्यापैकी उजळले असले तरी अजून सूर्याची किरणे झाडा झाडातून झिरपायला थोडा अवकाश आहे.
त्या धुराला एक विशिष्ठ गंध असतो . नारळाची चवडं ,शेंब्या , सुकलेल्या पोग्या, करवंट्या , झावळ्यांच्या हीर काढून उरलेल्या पात्यांच्या वळ्या, सुका पालापाचोळा , सुकलेल्या काट्या कुटक्या , शेणाची गोवरी यांचा एकत्रित जळण्याचा आसमंतात पसरणारा तो गंध. कोकणात लहानपण गेलेल्यांसाठी तो सुगंधाचा लोटच.
कोकणातील कोणत्याही खेडेवजा गावातील प्रात:काळचे हे दृश्य.कौलारू घराच्या मागच्या पडवी पासून साधारण आठ दहा फुटाच्या अंतरावर चिऱ्याच्या तिन दगडांची पुरातन चूल .
त्या चुलीवर तिच्याहून कित्येक जास्त पावसाळे पाहिलेले , काजळीची पुटांवर पुटं चढून काळी खवले अंगभर वागवणारे आणि ज्याने अनेक पिढ्यांना अंघोळीसाठी पाणी पुरवलेले असे ठोक्याचे मोठे पितळी तपेले . त्यावर बहुदा अल्लुमिनियमच्या ताटलीचे झाकण आणि तपेल्यातील गरम पाणी काढून घेण्यासाठी एक अल्लुमिनीयमचे दांडी असलेले भांडे . एका चिऱ्याला पुढून उभी करून ठेवलेली तितकीच पुरातन आणि काळवंडलेली फुंकणी.
चुलिसमोर , ती पेटवताना बूड टेकण्यासाठी बहुदा एका बाजूचं पावकं उडालेला फळकुटवजा लहानसा सागवानी पाट, फुटभर अंतरावर झाकणाला भोक पाडलेली काचेची छोटी रॉकेलची बाटली. हीचा मान मोठा. तिला तिरपी करून एक थेंब नारळाच्या चवडावर पाडून काडी लावली की पुढचं काम वेळ न जाता सुकर होतं. तपेले टेकलेल्या पुढच्या चिऱ्यावर बाहेरच्या कडेवर एक आगपेटी . हे त्या धुराचे उगमस्थान.
अजून दिवसाला आवाज फुटलेला नाही. एखादया घरातून रात्रीच्या जेवणाच्या विसळलेल्या भांड्यांची टोपली , घासण्यासाठी मागीलदारी ठेवतानाचा आवाज. कोणी राहिलेल्या शिळ्या अन्नाचं भांड रिकामं करण्यासाठी कुंपणाजवळच्या दगडावर उलटे आपटल्याचा आवाज आणि त्या कोणाची पाठ वळताच एक दोन कावळ्यांची त्या अन्नावर हवेतून झेप घेतानाची सळसळ . कुठे कोणी कोंबड्यांचा खुराडा उघडल्यावर दिवसभरासाठी मुक्त झालेल्या कोंबड्यांच्या पंखांची फडफड. तर एखाद्या गोठ्यातून म्हैस पाजायच्या आधी तिच्यापुढे आंबोण भरलेले पत्र्याचे घमेले सरकवल्याचा आवाज.
दिवस उगवल्याची वर्दी देणारे इतकेच काय ते आवाज. काळ थांबून रहावा अशी ती वेळ . अशा वेळी हाताशी असलेल्या कोणत्याही फडक्यावर आणि ते नाही मिळालं तर अंगावरच्या सदऱ्याच्या टोकावर धरलेल्या पितळी पेल्यातील वाफाळत्या चहाचे घोट अमृततुल्य न झाले तरच नवल.
अजित देशमुख.
Leave a Reply