कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत.
श्रीलंबोदर
(गणपतीपुळे, जि. रत्नागिरी) –
हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्याचा द्वारपाल असा मुद्गल पुराणात ज्याचा उल्लेख आढळतो तो हा प्रसिद्ध गणपती.पुळ्याच्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेली उंच अशी टेकडी हाच गणपती ग मानला जातो. लंबोदराचे मंदिरमात्र टेकडीच्या पायथ्याशी आहे. लंबोसुर दैत्याशी गणेशाची लढाई या स्थानापासून सुरू झाली. तसेच गणेशभक्त परशुरामाने सागरतीरी म्हणून या गणेशाची आराधना केली. या टेकडीची प्रदक्षिणा हीच गणेशाची प्रदक्षिणा मानली जाते. अनेक गणेशभक्तांनी येथे गणेशाची तपश्चर्या केली आहे आणि त्यातील काही सत्पुरुषांच्या समाध्याही येथे आहेत. बाजीराव पेशव्यांनी या स्थानाचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. आज हे स्थळ गणेशतीर्थ स्थानाबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणूनही उदयास आले आहे.
गलबतवाल्यांचा गणपती
(गणेशगुळे, आगरगुळे, जि. रत्नागिरी) –
पावसपासून ५ कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. गणपतीपुळ्याच्याच लंबोदराचे हे रूप असल्याचे मानतात. पावसचे श्री. रामचंद्रपंत चिपळूणकर यांनी पोटशूळेची व्याधी बरी होण्यासाठी गणेशाच्या दृष्टांतानुसार येथे या गणेशाची स्थापना केली. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनाने व्याधी दूर होतात असी लोकांची श्रद्धा आहे. मंदिरातील अकरा फूट उंचीची व तीन फूट रुंदीची एक प्रचंड शिळा हीच गणपतीची मूर्ती म्हणून मानली जाते. मंदिर परिसर शांत व रम्य आहे आणि माघी गणपती उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
श्रीदशभुजासिद्ध लक्ष्मी गणेश –
(हेदवी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी)
हे गणपतीमंदिर पेशवेकालीन आहे. मंदिरातील संगमरवरी मूर्ती अत्यंत नयनमनोहर असून ३।। फूट उंचीच्या आसनावर अधिष्ठित आहे. गणेशमूर्ती दशभुज आहे.
दैत्यविमर्दन गणेश
(श्रीक्षेत्र राजूर) –
सिंधुरासुराचा वध केल्यानंतर सर्व देवांनी व वरेण्यराजाने मिळून या राजसदनक्षेत्री या गणपतीची स्थापना केली. येथेच गजाननाने वरेण्याला गणेशगीता सांगितली. हे स्थान जालन्याजवळ असून गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.
लिंबा गणेश (बीड) –
चंद्राने गणपतीची उपहासात्मक हास्याने निंदा केली. त्यावेळी गणेशाने दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रासाठी सर्व देवतांनी या ठिकाणी गणेशाची उपासना केली आणि गणेशाची मूर्ती स्थापन केली.
भालचंद्र गणे (गंगामासले) –
शापमुक्तीसाठी चंद्राने केलेल्या गणेशाच्या ध्यानधारणेमुळे गणेश संतुष्ट झाला. चंद्राने केलेल्या विनंतीनुसार गणेशाने चंद्राला आपल्या भाळी धारण केले व संकष्टी चतुर्थीला तुला प्रथम अर्ध्य देऊन माझी पूजा करतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा चंद्राने देवब्राह्मणादिकांसह या गणेशाची स्थापना केली.
विज्ञान गणेश (श्रीक्षेत्र राक्षसभुवन)
जालन्याजवळ श्रीदत्तात्रेयांनी येथे गणेश उपासना करून स्वानंद समाधिसुखाचा अनुभव घेतला. गणेशाची येथे आत्मनिवेदन भक्ती केली. त्यामुळे त्यांना गणेशदर्शन घडले व गणेशाची कृपा त्यांनी संपादित केली. गुरु संप्रदायानुसार येथे त्यांनी श्रीविज्ञान गणेशाची स्थापना केली व उपासना करुन येथेच वास्तव्य केले. तसेच सूर्यपुत्र शनीनेही येथे उपासना केली आहे.
नवगणपती (नवगणराजुरी, बीड) –
येथील मंदिरात एका चौकोनी दगडावर एकमेकांकडे पाठ केलेले चार गणपती आहेत. पूर्वेकडे मुख असलेला महामंगल, री पश्चिमाभिमुख शेषाब्धिष्ठित, दक्षिणाभिमुख मयुरेश्वर आणि उत्तराभिमुख उच्छिष्ट गणपती. या मूर्ती वेगवेगळ्या आसनात अंदाजे पावणेचार फूट उंचीच्या आहेत. हे पेशवेकालीन मंदिर असून गावाच्या चार वेशीवर चार गणपती आहेत. म्हणून या स्थानाला नवगणराजुरी म्हणतात.
-प्रदीप रामचंद्र रास्ते, पुणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०२१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply