कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे
वैराण वाळवंटातील भगभगीत वारे
नात्यांचे आखीवरेखीव बंध काही
आपुलकीचा आनंद गंध नाही
हास्याच्या कृत्रिम कवायती या
अंतरीचा त्यात उन्माद नाही
भावनांना यांच्या ओल नाही
जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही
आटलेल्याच मनोनद्या साऱ्या
पात्र कुणाचेच खोल नाही
आपुलकीची ओसरतीही सर नाही
भावनांना कुणाच्याही घर नाही
अहिल्याच्या शिळांना तर आता
कुणा श्रीरामाचा कर नाही
काळजात सल कधी उठत नाही
आतड्यातही यांच्या का तुटत नाही
मनं कशी कुणात गुंततच नाही
नाती जुळलीच जर, तर कळत नाही
देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश
कोरडा मी, कोरडा तू, कोरडपाषाण सारे
विमनस्क अशा आभाळी विखुरले तारे
नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे
नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
मडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो
(आजच्या व्यवहारी (केवळ व्यावहारिक?) जगामध्ये वावरताना पुष्कळदा एक तटस्थ कोरडेपणा जाणवतो. माणसं सारी चांगलीच असतात – वाईट मुद्दामहून कुणीच वागत नाही. पण आपलं असं कुणीच वाटत नाही. अगदी नात्यातसुद्धा वैर कुणाचंच नसतं पण प्रेमही कुणी करत नाही. एक प्रकारचा भौतिक रोखठोकपणा, कोरडेपणा प्रत्येक व्यवहारातला भावनिक ओलावा-आपुलकी फार झपाट्याने शोषून घेत आहे. काळ जसजसा पुढे जात आहे तसा हा कोरडेपणा फारच प्रकर्षाने जाणवतो. कोरडेपणातच जन्म झालेल्या नवनव्या पिढींना कदाचित तो भासणारही नाही पण ज्यांनी भावनिक ओलावा अनुभवला असेल त्यांना ही रखरखीत माध्यान्हं फारच जड जात असतील.)
– यतीन सामंत
Leave a Reply