काही दर्दभरी गाणी (बहुतांशी मुकेशची ) ऐकत काम करत बसलोय. त्याच्या आवाजातील वेदनेला अधिक भावविभोर करतोय पार्श्वभूमीचा कोरस ! ” संसार हैं एक नदिया ” असो वा “कई सदियोंसे !”
हा कोरस नायक -नायिकेचे , गायक -गायिकेचे सुखदुःख अधोरेखित करतो. त्याला एक खर्ज,एक खोली बहाल करतो.
पण या पाठीमागच्यांना अनुल्लेखाने मारले जाते – नाटकातल्या बॅकस्टेज कलाकारांसारखे ! मुख्य भावनेला, अधिक टोकदार, तर कधी गहिरी बनविण्याचे काम कोरस करीत असतो. तुमच्या भावना multiply करुन त्या अधिक वैश्र्विक बनवतो. कधी -कधी तुम्ही एकटेच नाही,आम्हीही त्या प्रवाहातून वाहतोय याची सूक्ष्म जाणीव करुन देतो. आपल्या साथीला कारवाँ आहे ही जाणीवच एकटेपणाची भावना नष्ट करते.
व्यक्तिगत जीवनातही आपण कोरसमध्ये ऊभे असतो – संस्थेत वरिष्ठांच्या मागे ,त्याच्या निर्णयांना साथ देत, कधी त्याच्या सुरात -सूर मिसळून ! कुटुंबात नात्याच्या हो ला हो म्हणत ! स्वतःचे अस्तित्व विरघळून टाकत. जणू तुझे सुखदुःख सारे माझेच ! माझा वेगळा असा आवाज /स्वर नाहीच. कोरसमध्ये स्वला विसरून गाणे म्हणणे खरंच अवघड ! ते सुंदर आवाजांचे मालक कधीच स्वतःच्या आवाजात गात नसतील का ? त्यांच्या नशिबी कायम पाठीमागे उभे राहून आणि सगळ्यांनी मिळून एक mike share करणे एवढेच असावे कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply