कोसळत्या मनाला सावरत,
तो शांत धीरोदात्त वाटला, ओघळणारे अश्रू पुसताना,
आवाज आला” मी आहे ना”-?
उद्ध्वस्त चित्त, कापते अंतर,
हलून गेलेले काळीज नि,
गलबललेले अंत:करण,
धीर देत माझ्या उदास मना,
आवाज आला,” मी आहे ना”-?
चटके घेतलेला धपापता उर,
वास्तव स्वीकारत रडवेला सूर, दाबत मी, साऱ्याच यातना,– आवाज आला,” मी आहे ना”-?
वेदनांचा खेळ सारा,
उभ्या देही फैलावला,
नियंत्रण सुटता मग,
जिवापाड जाऊन पेलला,
अवजड ओझे पेलताना,
आवाज आला,” मी आहे ना”-?
कोण तो कुठला हात देता,
उन्हात सावलीचा कवडसा,
वाटे किती थोर दिलासा,
आवाज आला,” मी आहे ना”-?
दुःखे, व्यथांचा सोडवीत गुंता कळेना मग कशी अस्वस्थता,
वाटे संपवावे आता जीवना,
आवाज आला,” मी आहे ना”-?
भेटीने — तुझ्या,—
जीव पालवे, —
घायाळ मनातले, —
स्फुल्लिंग चेतले,—!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply