नवीन लेखन...

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – २

शाळेला महत्व की कोचिंग क्लासला हा आता सोप्पा प्रश्न झालाय आणि साऱ्यांना त्याचं उत्तर तोंडपाठ आहे. पूर्वी शिकवणी असं या प्रक्रियेचं नांव होतं आणि अभ्यासात काही कारणाने मागे पडलेला विद्यार्थी/विद्यार्थिनी त्याच्या कश्यपी लागत. शक्यतो शिकवणी इंग्रजी/गणित/शास्त्र अशाच विषयांसाठी असे आणि तीही शाळेच्या शिक्षकांकडे ! शाळेला समांतर “ट्युशन “व्यवस्था मी विदर्भात लहानपणी पाहिली. वरील तीन विषयांच्या शिक्षकांकडे सकाळी २-३ बॅचेस आणि सायंकाळी शाळा सुटल्यावर १-२ बॅचेस असं दमछाक (शिक्षकाची) करणारं ज्ञानसत्र (?) सुरु असलेलं मी पाहिलं आहे. कदाचित कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चणचण, शाळेतील समस्या असं काहीतरी त्या शिक्षकांना धावडवत असावं. आता उलटं झालंय – विद्यार्थी धावताहेत आय आय टी च्या स्वप्नामागे ! त्यासाठी पालक आर्थिक ताण (पोटाला चिमटा वगैरे) आणि तरुण शारीरिक/मानसिक खच्चीकरणाच्या मागे धावताहेत. मुलांना बरं वाटत नाही आणि ते क्लासला येत नाही हे कळल्यावर “कोटा फॅक्टरीचा ” शिक्षक म्हणतो – ” आजारी पडण्याची चैन तुम्हाला परवडणार नाही. ” फळ्यावर तो स्टॅटिस्टिकस लिहितो – ” कोटामध्ये   व्हिटामिन डी ची कमतरता असलेले किती टक्के विद्यार्थी आढळतात, कितीजणांमध्ये व्हिटामिन बी १२ कमी असते वगैरे ! ” मुलं दवाखान्यात तपासणी करून घेतात. त्यांतल्या वैभव पांडेला चक्क कावीळचे निदान होते.

शिक्षकांनी जबरदस्ती केल्यावर तो आईला कोटामध्ये बोलावतो. मग त्याची आणि मित्रांची चंगळ – रोज आईच्या हातचे जेवण. बाजारातून आईने निगुतीने आणलेली फळे ! वैभव बरा झाल्यावर शिक्षक त्याला सांगतात- ” आईला आता परत पाठव. तिचे काम झालं आहे. कायम थोडीच तिला येथे राहायला बोलाव असं मी तुला सांगितलं होतं ! ”

आई परतते, जाताना मुलासाठी आणि त्याच्या मित्रांसाठी लाडूचा डबा ठेवून जाते.

“श्यामच्या आई ” मधील श्यामचे वडील असेच श्यामसाठी त्याच्या आईने पाठविलेले लाडू घेऊन शाळेत आलेले असतात- न सांगता . “वीर-जारा ” मधला शाहरुख किरण खेरला म्हणतो तसे- ” जगातल्या सगळ्या आया यच्चयावत सारख्याच असतात.” प्रेमाचे सिंचन झाल्यावर वैभव तरारतो.

आम्ही वालचंदला असताना वडील यायचे अधून-मधून ! आई कधी नाही आली. आली ती एकदमच कॉनव्होकेशनला विद्यापीठात ! वडील दिवसभर होस्टेलवर आणि रात्री गावातल्या त्यांच्या मित्राकडे झोपायला जात. माझ्या काही मित्रांचे ” वरच्या ब्रॅकेट “ मधील आई-वडील सांगलीला आले की चक्क हॉटेलात राहात आणि मित्र दिवसभर त्यांच्या समवेत सैर सपाटा करायला !

बाकी एक हृद्य प्रकार म्हणजे शिक्षकांची पळवापळवी – अर्थात चांगल्या ! त्यांना खूप डिमांड असते. कोटाचा अध्याहृत नियम असा की फॅकल्टी आय आय टी वालीच असायला हवी. हे वेगळ्या प्रकारचे “आरक्षण ! आय आय टी वाले कधीच “एक्स ” होत नाहीत असं अभिमानाने कोटामधील शिक्षक सांगतो.

रायपूरला मी असताना ए आय सी टी ई च्या व्हिजिट आधी ( इलिजिबल स्टाफची कमतरता असल्याने)  आमच्या इंजिनिअरिंग विंगमध्ये असेच शिक्षक पळवापळवी प्रकरण झाले होते. स्पर्धक(?) महाविद्यालयाकडून एका रात्रीत चार ज्येष्ठ प्राध्यापक (पी एच डी ) आयात करण्यात आले होते. यथावकाश (काम झाल्यावर) ते त्यांच्या मातृसंस्थेत परतले.

कोटा फॅक्टरीत या पळवा पळवीला रूप दिलंय “संगीत खुर्चीचं “. एका क्लास मधील शिक्षक सोडून गेला की हुशार (?) संस्थाचालक लगेच त्याच्या बदली शेजारच्या क्लासमधील शिक्षक पळवितात आणि तो क्लास मग आणखी वेगळ्या ! कोटामध्ये अनेक कोचिंग क्लासेस असल्याने हे सत्र कायम सुरु असतं.

मध्यंतरी विदर्भात एका व्याख्यानाला गेलो असता, तेथील संयोजक म्हणाले- ” अहो, आमच्या क्लाससाठी आम्ही मुंबई आय आय टी ची फ्रेश पोरं लाख-दीड लाख रुपये महिना पगार देऊन इथे आणतो-इथल्या पोरांना त्यांची क्रेझ असते, त्यामुळे आमच्या ऍडमिशन्स चांगल्या होतात.” ( विदर्भात इतका पगार- पुण्या /मुंबई इतका? आणि रोज तिकडची फ्रेश पब्लिक पुण्या-मुंबईला नोकरीसाठी येतात. मला काही टोटल लागेना.)

“टिकतात कां हो ही मंडळी ? सो कॉल्ड “क्रीम ऑफ सोसायटी” ??”

” नाही हो, विदर्भातील उकाडा, मुंबई-पुण्यात असलेलं /मिळणारं आयुष्य इथे नसतं ना? फार तर सहा-सात महिने टिकतात. ”

शाळेला समांतर यंत्रणा असलेली विदर्भातील फॅक्टरी आता चक्क कोटा येथे सुरु झालीय. सहा-सात आकडी पगार आणि त्यामुळे डिमांड जास्त !

शिक्षकी पेशाला (किमान कोचिंग क्लासवाल्या) केवढी मागणी ? आमच्या महाराष्ट्रात शिक्षकांचे पगार वेळेवर होतही नाहीत.

अगदी आय आय टी तून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीलाही कोटामध्ये खूप मागणी ! त्याला (आय आय टी वाला असला म्हणून काय झालं ?) शिकविता येत नाही म्हणून मुलं संस्थाचालकांकडे तक्रार करतात.

हे आम्ही लहानपणी भुसावळला असताना आधीच केलेलं ! शाळेच्या शिक्षकांना शिकविता येत नाही म्हणून आम्ही चक्क त्याकाळी मुख्याध्यापकांकडे गेलो होतो. त्यांचा मुलगा आमचा वर्गमित्र, आणि तोही या प्रकरणात आमचा साथीदार ! मग अधिक चेव चढला नसेल तर नवलच.

अपेक्षेप्रमाणे भुसावळसारखे कोटालाही काही होत नाही.

थांबण्यापूर्वी एक अफलातून प्रसंग- एक क्लास सोडून दुसऱ्या क्लासकडे जाताना (तेही शिक्षकाने समजवल्यावर) वैभव कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून सरांच्या घरी भेटवस्तू घेऊन जातो. जितू दादा ( विद्यार्थीप्रिय शिक्षक) त्याला म्हणतात-

” चल आतमध्ये , तुला काहीतरी दाखवितो. ”

आतल्या कपाटात असंख्य किंमती भेटवस्तू ! जितु दादा मुलांच्या नावांची आणि त्यांच्या भेटवस्तूंची जंत्री वैभवला ऐकवतो.

” बापाच्या पैशातून गिफ्ट घेऊन आलायस होय रे ? तुझ्या स्व- कमाईतून भेटवस्तू आण –  या सगळ्यांसारखी. मग मी स्वीकारेन.”

रायपूरची #निलेशसोनी, #स्नेहाराठी, #रियाचोरडिया या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांची मला आठवण आली. त्यांनींही मला स्वतःच्या पहिल्या पगारातून पुस्तके/ भेटवस्तू दिल्या-माझ्यावरील प्रेमाचे प्रतीक म्हणून !

शिक्षक या पेशालाच असे निर्व्याज प्रेम वाट्याला येत असावे बहुधा.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..