वैभव पांडे या प्रातिनिधिक तरुणाच्या प्रश्नांचा प्रवास ” कोटा फॅक्टरी ” मध्ये आढळतो. ” इनसाईड एज ” या मालिकेने जसे क्रिकेटविश्वाच्या पोलादी आणि श्रीमंत विश्वाचे विश्वरूप दर्शन घडविले,तसेच कोटा फॅक्टरी शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणाचे चित्र रंगविते – ते भेदक आहे,त्रासदायक आहे पण आय आय टी च्या ५२६३ जागांसाठी दरवर्षी १० लाखांहून अधिक तरुण (आणि पडद्याआडून त्यांचे पालक) जेव्हा त्यांची स्वप्ने, ऊर्जा, पैसे, वेळ पणाला लावतात तेव्हा प्रश्नही त्याच तोडीचे पडतात.
अशावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवलेल्या आणि नोकरीची वाट बघत शेवटी फास लावून घेणाऱ्या MPSC वाल्या स्वप्निल लोणकरची (जुलै २०२१) उगाच आठवण होते. आणि “रोटी कपडा मकान ” मधला वडिलांना सुनावणारा अमिताभही आठवतो ( “जवानी के २०-२५ सालोंकी किमत —– ” वगैरे ) मग जीवनातील अग्रक्रमांकडे बघायचे कधी?
कारण ” कोटासे बच्चे तो निकल जाते हैं, लेकिन कोटा बच्चेकें अंदरसे बाहर नहीं निकलता ! ” आय आय टी त निवड झाली तर सुकून अन्यथा जन्मभराची चुभन, जेलसी आणि “छिछोरे ” सिनेमाप्रमाणे पडणारा ” लूझर ” हा जन्मभराचा शिक्का ! हा विचार पालकांनी आणि तरुणांनी करायला नको कां ?
दोन शिक्षण संस्थांमधील /कोचिंग इंडस्ट्री मधील फरक काय ?
कोटा फॅक्टरी म्हणते- भिंतींचे रंग, बाकांची मोजमापे, फी कमीजास्त, एज्युकेशनल ऍप्स पुरविणे, क्लासरुममधील पंख्यांची संख्या? काय निकष असतात कोट्याला जायचे ?
रायपूरला एका शिक्षणतज्ज्ञाला मी बोलाविले होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. ते म्हणाले – ” बाकी इमारती, सोयी-सुविधा, शिक्षकांना एसी खोल्या, हॉस्टेल,बस,कँटीन सगळं इन्फ्रा तुम्ही देखणं बनवलंय, पण ह्यूमन इन्फ्रा चे काय?”
डोळे खाडकन उघडणारा हा प्रश्न होता. कोटा फॅक्टरी मध्ये असे अंतर्मुख करणारे प्रश्न कोणी विचारत नाही, पण ते तरीही माझ्यासारख्याला पडतात. आणि हो तेथील विद्यार्थ्यांनाही ! आणि वर्गात असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारून ते शिक्षकांची भंबेरी उडवतात. अकार्यक्षम शिक्षकांबाबत ठरवून नकारार्थी फीडबॅक देतात. असे शिक्षक मग पगार कमी करा, खालच्या वर्गाला शिकवायला द्या, पण काढून टाकू नका अशी विनवणी संस्थाचालकांकडे करताना दिसतात.
शिक्षक जमातीला तरी पाठीचे कणे असायला हवेत,नाहीतर कोणाकडे नवीन पिढ्यांनी आशेने बघायचे?
फक्त जुन्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वर्गात आय एम पी म्हणून सांगणे, पुस्तकातील सोडवलेले प्रश्न /गणितं वर्गात सोडवून घेणे असेच हातकंडे शिक्षकांनी सुरु ठेवले तर त्यांना “आदर ” कोठून मिळणार? सिलॅबस येनकेनप्रकारेण संपविणे, यांवरच चरितार्थ टेकवून ठेवणारी मंडळी मग खऱ्या अर्थाने विद्यादान करणारे गुरु आणि आत्मज्ञान देणारे सद्गुरु कधी बनतील? कां बनणारच नाहीत. म्हणून नालंदा/तक्षशिला विसरून चॅप्लिनच्या “मॉडर्न टाइम्स ” मध्ये दाखविली तशी संवेदनाशून्य फॅक्टरी बनते कोटा शहर !
आजच्या शिक्षणव्यवस्थेचे बकाल आणि विदारक चित्र !
प्रश्न उशिरा विचारले म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply