वृक्ष हे भूतकाळातील हवामानाचे साक्षीदार असतात. किंबहुना ते फक्त साक्षीदारच नसतात, तर ते अशा घटनांची स्वतःकडे नोंदसुद्धा करून ठेवतात. आपल्या खोडातील वाढचक्रं ही त्यांची नोंदवही असते. वाढचक्रं म्हणजे वृक्षाच्या खोडात दिसणारी वर्तुळं. हवामानातील बदलांची नोंद ही याच वाढचक्रांत होत असते. झाडाच्या खोडात प्रत्येक वर्षी नवं वाढचक्र उमटतं. या वाढचक्राचं स्वरूप – उदाहरणार्थ, त्याचा रंग, त्याची जाडी – हे त्या-त्या काळातल्या हवामानावर अवलंबून असतं. त्यामुळे जुन्या वृक्षांच्या खोडातील वाढचक्रांचा अभ्यास करून भूतकाळातील हवामानविषयक घटनांचा अंदाज बांधता येतो. आता या वाढचक्रांच्या अभ्यासाला आधुनिक रसायनशास्त्राचीही जोड लाभली आहे. त्यामुळे एखाद्या ठरावीक वर्षीच्या हवेचा दर्जा ओळखणं, हेसुद्धा आता या वाढचक्रांद्वारे शक्य झालं आहे. आश्चर्य म्हणजे या अभ्यासातून काही वेळा मानवी इतिहासातील एखाद्या घटनेबद्दलचा तपशीलही मिळू शकतो. इतिहासाला जोडणारं असंच एक संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. ‘पाँटिफिकल कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ चिली’ या चिलीतल्या विद्यापीठातील संशोधक फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं हे संशोधन अमेरिकन जिओफिजिकल युनिअनच्या परिषदेत सादर केलं.
हवा ही ज्याप्रमाणे विविध वायूंमुळे प्रदूषित आणि घातक बनते, तशीच ती हवेतील लहान-मोठ्या आकाराच्या सूक्ष्मकणांमुळेही घातक बनते. यातले अतिसूक्ष्म कण श्वसनाद्वारे माणसाच्या शरीरात शिरतातच, परंतु मुळांद्वारे वा पानांद्वारे ते वृक्षाच्या अंतर्भागातही प्रवेशतात. उद्योगधंद्यांत व इतरत्र होणारा इंधनाचा प्रचंड वापर, उद्योगधंद्यांतील विविध निर्मितीक्रिया, अशा अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या या कणांत तांबं, कॅडमिअम, शिसं, अर्सेनिक, पारा, असे अनेक घातक धातू अस्तित्वात असतात. हे धातू वृक्षात शिरल्यानंतर, वृक्षातील वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या प्रमाणात स्थलांतरीत होतात. वाढचक्रांतही ते जमा होतात. वाढचक्रांना कायमचं अस्तित्व असल्यानं, त्यात या धातूंचा दीर्घ काळानंतरही शोध घेता येतो व त्यावरून भूतकाळातील प्रदूषणाची पातळी समजू शकते. असं संशोधन गेली काही वर्षं, अनेक ठिकाणी केलं जात आहे.
अलीकडेच चिनी शास्त्रज्ञांनी आग्नेय चीनमधील फूजहू या शहरातील जुन्या वृक्षांमधल्या वाढचक्रांत, गेल्या सुमारे पावणेदोनशे वर्षांत, वर्षागणिक कोणते धातू किती प्रमाणात जमा होत गेले, याचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी, या सर्व काळातल्या तिथल्या हवामानाच्या स्थितीचा अंदाज बांधला. फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानं तर आता यापुढची पायरी गाठली आहे. त्यांनी प्रत्येक वर्षीच्या वाढचक्रातील धातूंचं प्रमाण व त्या वर्षीच्या हवेतील अतिसूक्ष्म कणांचं प्रत्यक्ष प्रमाण, यांना गणिती सूत्रांद्वारे जोडलं आहे. त्यामुळे या संशोधकांना भूतकाळातल्या, नोंदी उपलब्ध नसलेल्या वर्षांतील हवेचा दर्जाही समजू शकला. आश्चर्य म्हणजे या गणिती संबंधाद्वारे त्यांना या वाढचक्रांत, चिलीच्या इतिहासातल्या पाच दशकांपूर्वीच्या एका अतिशय महत्त्वाच्या राजकीय घटनेच्या खुणा आढळल्या!
फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे, चिलीची राजधानी असणाऱ्या सांतिआगो या शहरातील हवामानावर केलं गेलं आहे. सांतिआगो शहरात ‘क्विन्टा नॉर्मल’ नावाचं एक विस्तिर्ण उद्यान आहे – जवळजवळ पस्तीस हेक्टर म्हणजे सुमारे पंचाऐंशी एकर जमिनीवर पसरलेलं. या उद्यानात देवदाराचे अनेक जुने वृक्ष आहेत. आपल्या संशोधनासाठी या संशोधकांनी आपलं लक्ष या देवदार वृक्षांवर केंद्रित केलं. या संशोधकांनी वेगवेगळ्या देवदार वृक्षांच्या खोडाच्या अंतर्भागाचे, विशिष्ट प्रकारच्या ड्रील मशीनद्वारे, अगदी कमी जाडीच्या अशा काड्यांच्या स्वरूपातले पन्नासांहून अधिक नमुने गोळा केले आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत नेले.
त्यानंतर या संशोधकांनी या प्रत्येक नमुन्यातील, प्रत्येक वर्षीच्या वाढचक्राचा छोटासा भाग वेगळा केला. या प्रत्येक भागाचं त्यांनी रासायनिक विश्लेषण करून प्रत्येक वर्षीच्या वाढचक्रात जमा झालेल्या, तांबं, कॅडमिअम आणि शिसं या मूलद्रव्यांचं प्रमाण शोधलं. या संशोधकांना, या पद्धतीनं १९३० सालांपर्यंतच्या वाढचक्रांतील धातूंची माहिती मिळू शकली. या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला सांतिआगोतील हवा खूप खराब होती. त्यानंतर मात्र तिथल्या हवेच्या दर्जात सुधारणा होत गेली. हे काहीसं अपेक्षितच होतं. कारण १९९०च्या दशकात चिलीच्या शासनानं प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सूरू केले होते.
यानंतर फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या परिसरातील हवेच्या दर्जाची नोंद ठेवणाऱ्या संस्थांकडून, प्रत्येक वर्षीच्या हवेतील अतिसूक्ष्म कणांच्या प्रमाणाच्या नोंदी मागवल्या. त्यातील १९८९ ते २००८ या सुमारे दोन दशकांच्या काळातील अतिसूक्ष्मकणांच्या नोंदींची त्यांनी, त्या-त्या वर्षाच्या वाढचक्रात आढळलेल्या धातूंच्या प्रमाणाशी संख्याशास्त्रीय सांगड घातली. यावरून या संशोधकांनी, दोहोंतला संबंध दर्शवणारं गणिती सूत्र निर्माण केलं. या सूत्राद्वारे या संशोधकांना, १९८९ पूर्वीच्या म्हणजे नोंदींपूर्वीच्या काळातील प्रत्येक वर्षीचा, हवेचा दर्जाही कळू शकला. फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे गणित, सन १९७३मध्ये सांतिआगोच्या हवेतील प्रदूषण खूपच कमी झाल्याचं दर्शवत होतं. सन १९७३ सालच्या प्रदूषणातल्या या घटीचा संबंध थेट चिलीच्या इतिहासाशी होता. हे प्रदूषण कमी होण्याला कारणीभूत ठरली होती ती, त्यावर्षी झालेली क्रांती!
सन १९७३ साली, जनरल ऑगस्टो पिनोशे याच्या नेतृत्वाखाली चिलीमध्ये लष्करी क्रांती झाली. मोठ्या प्रमाणात जिवितहानी घडवून आणणाऱ्या या क्रांतीच्या काळात, चिलीतले औद्योगिक व्यवहार थंडावले होते. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाला मोठी खीळ बसली होती. औद्योगिक उत्पादनात पडलेला हा खंड सांतिआगोचं प्रदूषण कमी करण्यासाठी कारणीभूत ठरला. अर्थात नंतर काही काळातच सर्व पुनः स्थिरस्थावर झालं, औद्योगिक उत्पादनास सुरुवात झाली आणि प्रदूषणात वाढ होऊ लागली. हे प्रदूषण पुनः तीव्रही झालं. सन १९९०मध्ये चिलीत लोकशाही प्रस्थापित झाली. त्यानंतर नवनियुक्त सरकारनं प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो यशस्वीही झाला. सांतिआगोतलं प्रदूषण हळूहळू कमी होऊ लागलं. चिलीत घडलेल्या याच सर्व घटना क्विन्टा नॉर्मल उद्यानातील देवदार वृक्षांत नोंदवल्या गेल्या आहेत.
फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढचक्रांच्या विश्लेषणावरून काढलेल्या गणिती निष्कर्षाला, ऐतिहासिक आधार असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. यामुळे या संशोधकांनी वाढचक्रांतील धातूंच्या प्रमाणाची, हवामानाशी घातलेली गणिती सांगड योग्य ठरली आहे. वृक्षांच्या प्रत्येक वर्षीच्या वाढचक्राची, त्या वर्षीच्या हवेच्या दर्जाशी गणिती सांगड घालण्याचा असा प्रयत्न प्रथमच केला गेला आहे. फॅब्रिस लँबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलेल्या या मार्गामुळे, ज्या काळातल्या हवेतील प्रदूषणाच्या नोंदी उपलब्ध नाहीत, अशा काळातल्या हवेतील प्रदूषणाची माहिती मिळवणं, हे आता शक्य होणार आहे. फॅब्रिस लँबर्ट यांच्या मते, दशकांपूर्वीच्याच नव्हे तर, काही शतकांपूर्वीच्या हवामानाचा भूतकाळ, अशा गणिती पद्धतीद्वारे तपासता येणार आहे.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Arturo Rinaldi Villegas / Wikimedia, Arnoldius/Wikimedia
Leave a Reply