विद्वत्तेचा वारसा तिला लहानपणापासूनच मिळाला होता. फ्रेडरिक विज्ञानाचे प्राध्यापक तर आई मारिया चूल ज्योपर्ट शिक्षिका होती. वडिलांना विज्ञानाची फार आवड होती. त्यामुळे निसर्गातील अनेक विज्ञानवादी चमत्कार तिला लहानपणीच पहायला मिळाले. त्यामुळे तिचीही विज्ञानदृष्टी तयार झाली व पुढे ‘ वैज्ञानिक संशोधन’ हेच तिने आपले ध्येय मानले व परमाणू संरचनेबाबत नवा शोध लावून तिने विज्ञानाला नवी दिशा दिली. याच संशोधनाबद्दल तिला १९६३ मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला.
तिचे नाव मारिया ज्योपर्ट मायर (Maria Goeppert Mayer)
मारिया मूळची जर्मनीतील कॅटोविसची. ( आता हा भाग पोलंडमध्ये आहे.) २८ जून १९०६ रोजी तिचा जन्म झाला. एकुलती एक असली तर तिचे लाड करण्याबरोबरच आई-वडिलांनी तिला विज्ञानवादी दृष्टी दिली. त्यामुळे अभ्यासाबरोबरच तिची संशोधनाची आवड वाढत गेली. उच्च शिक्षणासाठी तिने गोटिंजन विद्यापीठाची निवड केली व तेथे भौतिकशास्त्रात तिने संशोधन सुरू केले. संशोधनानिमित्त ती इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातही गेली. तेथेच तिची भेट प्रख्यात संशोधक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याशी झाली. १९३० साली तिला गोटिंजन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर जोसेफ ई. मायर यांच्याशी विवाह केल्यानंतर दोघे अमेरिकेत आले व जान हाफकिन्स विद्यापीठात नोकरी करत तिने अणू व परमाणूबाबत संशोधन सुरू केले. शिकागोमधील एका राष्ट्रीय प्रयोगशाळेत तिला फर्मी, युरे, क, टेलर आदी प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परमाणू संरचनेबाबत आपले मौलिक संशोधन पूर्ण झाल्यानंतर मारियाने ते ‘फिजिकल रिव्हर या पत्रिकेत प्रसिद्ध केले. नेमका असाच काहीसा सिद्धांत जे.एच.डी. जेन्सन यानेही त्याच काळात प्रसिद्ध केला. त्यामुळे उभयतांना १९६३ चे नोबेल विभागून देण्यात आले. पुरस्काराचा अर्धा भाग युजीन पी. विगनर यांना देण्यात आला. मारिया नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात रसायनशास्त्राची प्राध्यापक झाली. मात्र तेथे काम करताना तिला पक्षाघात झाला व तिची वाचा गेली, तरीही तिने आपले काम चालूच ठेवले होते. २० फेबुवारी १९७२ रोजी मारियाचे हृदयविकाराने निधन झाले.
Leave a Reply