पाय जडशीळ झाले होते. हातापायातल्या बेड्या काचत होत्या . त्या अशा अडकवल्या होत्या की चालताना नुसते कष्ट होत नव्हते, तर मरणप्राय वेदना होत होत्या. त्यात भरीस भर म्हणून आपलं सामान आपणच नेण्याची सक्ती.
अंगावरची जाडीभरडी वस्त्रं , अंग झाकण्यासाठी होती , की बोटीतून उडी मारताना, सर्वांगाला झालेल्या जखमा ,पुन्हा रक्तांकित करून नव्यानं वेदना देण्यासाठी होती , तेच उमगत नव्हतं .
कदाचित इंग्रज शासकांनी दयाळूपणे , पूर्वीच्या वेदना अधिक होत्या, की आताच्या, यासाठी घेतलेली परीक्षा असावी .
‘ चल विनायका , आता पुढच्या असंख्य वेदनांना सामोरं जाण्याच्या दृष्टीनं मनोमन सिद्ध हो .’
विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .
‘ माते , मला बळ दे , आशीर्वाद दे. पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा या भूमीची सेवा करण्यासाठी …’
तो स्वतःशीच हसला ,
‘ माते , इंग्रज सरकार राहील का तोपर्यंत ? ‘
त्यानं सर्वांकडे पाहिलं . त्याच्याभोवती कडेकोट बंदोबस्त होता , त्यानं सर्वांकडे पाहताक्षणी सगळे सावध झाले .
याची पुन्हा पळून जाण्याचा योजना नाही ना ? सर्वांनी त्याला व्यवस्थित घेरलं आणि ओढतच नेऊ लागले.
‘ माते ,मी नक्की परत येईन , तुला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा वसा घेतलाय मी माते , पुन्हा नक्की येईन .तोपर्यंत तुझी असंख्य लेकरं प्रयत्नरत असतीलच .’
त्यानं पाय उचलला , आणि समोर बघत राहिला .
समोरचा अथांग सागर स्वतंत्र होता . आभाळ स्वतंत्र होतं . वाहणारा वारा स्वतंत्र होता आणि मायभू मात्र …
त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं.
‘ होणार ! मातृभूमी सुद्धा स्वतंत्र होणार !! ‘
त्यानं मनोमन प्रणाम केला आणि पुढच्या बोटीत जाण्यासाठी उचललेलं पाऊल पाठी घेतलं .
समोरचं अंदमान कल्पनेनंच नजरेसमोर आणलं .
आपली प्रिय मातृभूमी स्वतंत्र झाल्यावर तिच्या संरक्षणासाठी याच अंदमानवर नाविक तळ उभारून शस्त्रसज्ज केला तर कुठल्याही शत्रूची वाकडी नजर होणार नाही स्वतंत्र हिंदुस्थानकडे पाहण्याची . आणि हो , ही चांगली संधी आहे अंदमानचं निरीक्षण करण्याची .स्वतंत्र हिंदुस्थान सरकारला सांगता येईल , मी अभ्यास केलाय अंदमानचा , चला शस्त्रसज्ज होऊ या …
– विनायक आपल्याच विचारात होता आणि त्याच नादात बोटीवर केव्हा चढलो हे त्याला कळलंच नाही .
एव्हाना त्याचं मन , स्वतंत्र हिंदुस्थानच्या सर्व सीमांचं संरक्षण कसं करता येईल , याच विचारात गुंतलं होत .
बोट मार्गक्रमणा करू लागली होती .
– विनायकाला हे माहित नव्हतं , की त्याला नेणारी बोट नरक यातनांच्या मार्गावर होती .
– हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा कैक योजने पाठी पडू लागला होता .
सावरकर घराणं दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकायला लागलं होतं.
नियतीसुद्धा हतबल होऊ लागली होती .
भविष्याचं गहनगूढ विवर , अथांग , अमर्याद होऊ लागलं होतं …
( क्रमशः)
श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
Leave a Reply