एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे.
सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यांची ही युरोप ट्रीप जरा हटके होती . या ट्रीपमध्ये नेहमीची स्थळे न पाहता काही वेगळी स्थळे पाहायला मिळाली . या मध्ये त्यांच्या लक्षात राहिले ते ‘क्राकौव ‘ हे शहर !
दुसरया महायुध्धामध्ये जर्मनीच्या हिटलरने ज्यू लोकांसाठी ज्या छळ छावण्या किंवा कॉन्संत्रेषण कॅम्पस उभे केले होते त्यातील सर्वात मोठा कॅम्प या शहरात होता . येथे हजोरो ज्यू वंशीय लोकांना धाक दाखवून, कपट मार्गाने, प्रलोभने दाखवून आणले गेले. तिथे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला . मानवतेला काळिमा फासणारे निर्घृण अत्याचार करण्यात आले . अनेक महिलांच्या , मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. आणि हे कमी पडले कि काय म्हणून हजारो ज्यूंची ग्यास चेम्बरमध्ये घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या मृत व्यक्तींच्या अनेक वस्तू -जसे ब्यागा, बूट , चप्पल ,कपडे, कागदपत्रे , फोटो, स्त्रियांचे कापलेले केस, अवयव – या वस्तू पुरावे म्हणून जपून ठेवलेले आहेत. हे सगळे बघून, माणूस क्रूरपणा मध्ये , दुष्टपणा मध्ये, निर्दय पणामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे बघून वर्षाताई पार हादरून गेल्या. त्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला. माणूस हा एक क्रूर आणि दुष्ट प्राणी आहे. आणि अशा या दुष्ट प्राणाच्या कुळात आपला जन्म झाला याची त्यांना लाज वाटली आणि त्यांची मान शरमेने खाली गेली.
त्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांना आनंदवनला भेट देण्याची संधी मिळाली.तेथे त्यांना दिसला तो माणुसकीचा, प्रेमाचा, मानवतेचा अथांग सागर. समाजाने हाकून दिलेल्या, वाळीत टाकलेल्या कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने जे कष्ट घेतले आहेत व तेथे नंदनवन निर्माण केले आहे ते बघून त्या स्मिमित झाल्या. तिथे त्यांना दिसला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, दया, त्याग आणि आत्मसम्मान ! एक साधी माणुसकी काय चमत्कार करू शकते हे त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले. हे बघून मनुष्य हा नुसताच दुष्ट प्राणी नसून तो प्रेमळ व सहृदयी प्राणी पण आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांचा माणसावरील उडालेला विश्वास परत बसला. आणि अशा या प्रेमळ प्राण्याच्या वंशात आपला जन्म झाला या बद्दल त्यांना अभिमान वाटला. हा एका परीने माणुसकीने कृरपनावर मिळवलेला विजयच आहे असे त्यांचे मत आहे.
क्रूरपणा आणि माणुसकी यांच्या लढाईत नेहमी मानुसकीचाच विजय होत आला आहे. जर्मनीचा हिटलर सर्व सत्ताधीश होता. त्याच्याकडे सत्ता होती,संपत्ती होती, सैन्य होते. पण आज तो विस्मृतीच्या मागे गेला आहे. आज त्याची आठवण पण होत नाही. आणि झालीच तर त्याच्या दुष्टपणामुळे होते. त्या उलट बाबा आमटे एका सामान्य घरातून आलेले. ना त्याच्याकडे कोठल्या सत्तेचे बळ किंवा संपत्तीचे पाठबळ! ते कुठ्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते कि मंत्री, खासदार, आमदार नव्हते. कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा सहकारी ब्यांकेचे अध्यक्ष नव्हते. उच्च सरकारी अधिकारी नव्हते कि कुठल्या खाजगी उद्योग समूहाचे MD किंवा CEO नव्हते. पण ते दीर्घकाळ लक्षात राहतील ते त्यांच्या कार्यामुळे. वर्षा ताई यांच्या लक्षात नेमकी हीच गोष्ट आली आहे. आपले सर्व साधू संत, सर्व धर्म ग्रंथ, रामायण महाभारतासारख्या कथा, भगवत गीता, बायबल, कुराण पण हेच सांगत आले आहेत.
माणसांवर दोन मार्गांनी विजय मिळविता येतो! क्रूरपणा करून, दुष्टपणा करून, निर्दयपणे, लांड्या -लबाड्या करून, सत्तेचा दुरुपयोग करून माणसांवर विजय मिळविता येतो. पण हा विजय फार काळ टिकत नसतो. तो अल्पजीवी असतो. या पद्धतीने विजय मिळविणारी माणसे फार काळ लोकांच्या लक्षात राहत नाहीत. अशी माणसे लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड जातात.लोकांना त्यांची आठवण सुध्धा येत नाही!
माणुसकीने, मानवतेने, प्रेमाने, आपुलकीने, त्यागाने, इतरांचा सन्मान करून पण माणसे जोडता येतात. या पद्धतीने मिळविलेला विजय हा दीर्घकाळ टिकणारा असतो. लोकांना अशा माणसांची नेहमी आठवण येत असते.
आपण कसे वागायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवायचे असते. निर्दयपणा करून व दुष्टपणा करून अल्प कालीन टिकणारा विजय मिळवायचा? कि माणुसकीने व प्रेमाने वागून दीर्घकाळ टिकणारा विजय मिळवायचा? आपल्या मृत्युनंतर लोकांनी आपल्याला काही तासातच विसरून जावे? का निदान काही दिवस तरी आपले नाव लोकांनी लक्ष्यात ठेवावे ? तुम्हाला काय हवे हे तुम्हीच ठरवायचे! बिकौस द चोइस इस युअर्स!
उल्हास हरी जोशी
May 17, 2011
Leave a Reply