पुराणिक वर्णन करत आहे :
मध्यरात्र तेजानें उजळे, भास्कर झळमळला
देवकी-वसुदेवाच्या पोटीं कान्हा अवतरला ।।
मध्यरात्रिची घटिका भरली
देवकिची काया थरथरली
कारागृह-कोठडित अलौकिक-प्रकाश झगमगला ।।
हर्षित-अति वसुदेव होतसे
लगेच भीती ठाव घेतसे
कंसभयानें पिता सुतासाठी मनिं तळमळला ।।
क्षणीं उचललें श्यामल बाळा
टोपलीत घालून निघाला
गळुन शृंखलांच्या खळखळुनी पडल्या जड माळा ।।
आपोआप उघडली दारें
झोपी गेले प्रहरी सारे
वसुदेवा रोखाया, जागृत एकहि नच उरला ।।
मिट्ट पसरली रात काजळी
पिसाट वाहे वात वादळी
गडगडले घन, कृद्ध विजेचा आसुड कडकडला ।।
मुसळधार चहुंकडून वृष्टी
जलमय झाली सारी सृष्टी
खवळे सरिता कृद्ध भयानक, जग घुसळायाला ।।
रौद्र निसर्गा ऐशा पाहुन
वसुदेवाचे थरकापे मन
पुत्रासाठी पिता स्वीकरी परि आव्हानाला ।।
बघुन टोपलित तान्ह्या कृष्णा
वाट देइ वसुदेवा यमुना
गोकुळात नंदाच्या गेहीं पोचविलें बाळा ।।
घडे तें, न कंसाला ठावे
दुष्टांना हें कसें कळावें ?
नारायण भूवरी उतरला, खल नाशायाला ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply