कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले. त्यांचा जन्म २७ मे १९१३ रोजी झाला. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून चित्रकला, नाटक, नृत्य, संगीत यांची आवड मात्र होती. मा.कृष्णदेव मुळगुंदांनी अनेक नृत्य नाटिका बसविल्या. घाशीराम कोतवाल ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती. त्या नाटकात मुळगुंदांच्या दिग्दर्शनाखाली नाना फडणविसांची भूमिका करणाऱ्या नटाने केलेला नाच लाजवाब होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ’जाणता राजा’ची सर्व कलात्मक बाजू कृष्णराव मुळगुंदांनी सांभाळली होती.
कृष्णदेव मुळगुंद हे स्वतः शिक्षक असल्यानं मुलांची मनं वाचणं हे काम त्यांना यशस्वीपणे करता आलं. भूतकथा, परीकथा, चेटकिणी, राक्षस यांबरोबच माणसांमधला चेटकिणी आणि माणसांमधले राक्षस याबाबतही मुलं संवेदनशील असतात, हे कृष्णदेवांनी जाणलं होतं. कृष्णदेवांचे नाट्यलेखन हे त्यांच्या विद्यार्थी मनवाचनाच्या व्यासंगातून निर्माण झालं होतं. त्यामुळेच त्यांच्या बालनाट्यात मंतरलेलं पाणी असलं, तरी मुलांच्या भावविश्वाचे मंत्रही त्यात आपोआपच येत होते. शिवाय गीत-संगीत-नृत्य यांच्या संयोगातून हे नाट्य अवतरले असल्यामुळे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही सहज होत असे. कृष्णदेवांनी ज्या ज्या नाट्यकृतीचं नृत्यदिग्दर्शन केलं ती अशी – पुजारिणी, महाश्वेता, कालिदास, उत्तररामचरितम्, महावीरचरितम्, रामायण, शांकुतल, कुमारसंभव, स्वप्न कासवदत्तम, घाशीराम कोतवाल, जाणता राजा, नंदनवन, आनंदवन भुवनी यातील काही संगीतिका काही ऑपेरा, काही नाटके आहेत. कृष्णदेवांनी सुमारे तीस लोकनृत्यांचे गीतलेखन, दिग्दर्शन केलं. एवढंच नव्हे; तर वेषभूषाही कृष्णदेवप्रणित होती. एकूण २० नाटकांचं लेखन, त्यापैकी १० भावनाट्ये, गाढवानं घातला गोंधळ, हयो हयो पावनं या लोकनाट्यांचं लेखनही कृष्णदेवांनी केलंय. याशिवाय ग्रामीण जीवनातील नृत्य-नाट्य-आविष्कार त्यांच्या ग्रामीण नृत्यगीते या गीतसंग्रहात उद्धृत झाला आहे. ‘नाचतो मी नाचतो’ हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे कृष्णदेव मुळगुंद या व्यक्तीचं जीवनचरित्रच केवळ नाही, तर अर्धशतकाचा नाट्य, शिक्षण, कला, चित्रकला यांचा संयोग असलेली ती एक समर्थ शब्दचित्रकृती आहे. मा.मुळगुंद यांचा उत्साह एवढा अमाप होता, की वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात भरविले होते. मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. भरत नाट्य मंदिराने मुळगुंद यांची अनेक बालनाट्यं प्रायोजित केली. आजचे आघाडीचे कलाकार त्यांच्या बालनाट्यात काम करीत असत. कृष्णदेव मुळगुंद यांचे ११ मे २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
YOU HAVE NOT GIVEN ANY ARTICLE ON KISHORITAI AS U HAVE GIVEN ON WHATS UP which was exceptionally good
YOU HAVE NOT GIVEN ANY ARTICLE ON KISHORITAI AS U HAVE GIVEN ON WHATS UP