अनेकदा असा अनुभव येतो की एखादा मित्र, एखादं नातं आपल्या इतक्या जवळ येते की अवघ्या काही दिवसांतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. आपले कोणतेही निर्णय, सुख-दु:ख त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही..आपण म्हणजे ते आणि ते म्हणजे आपण अशी सर्व स्थिती होऊन जाते..
हे कधी संपणारच नाही असं वाटत असतानाच एक दिवस असा येतो, की अगदी शुल्लकश्या कारणावरनं तो मित्र, ते नातं एकमेकांचं तोंड बघू नये या टोकाला पोहोचतं..जेवढ्या कमी वेळात ते मैत्र, ते नातं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेलं असतं तेवढ्याच त्वरेने त्याला गॅंगरीन होऊन कापूनही टाकावं लागतं..हे सर्व अत्यंत कमी कालावधीत आणि वेगानं घडतं..! अतिवेगात असलेल्या गाडीला अगदी किंचितपणे लावलेला ब्रेक देखील जसा गाडीला अपघात करू शकतो, तसंच काहीसं असतं हे..
जवळ येताना कमालीची ‘ओढ’ असते तर दूर जाताना तेवढ्याच तीव्रतेची ‘वेदना’ असते..!!’
जेवढी ‘ओढ’ जास्तं, तेवढी ‘वेदना’ तीव्र..!!
जेवढा वेग जास्तं, तेवढाच अपघात मोठा..
‘कोणत्याही दोन वस्तू एकमेकांच्या दिशेने जेवढ्या वेगाने येतात, तेवढ्याच वेगाने त्या एकमेकावर आदळतात आणि आदळल्यावर एकमेकांपासून विरूद्ध दिशेने दूर जातात’,
Every action has equal and opposite reaction हा न्युटनचा गतीचा तिसरा नियम केवळ वस्तूंनाच लागू होत नसतो तर मानवी संबंधानाही लागू होतो असा निष्कर्ष यावरून काढता येइल का?
— गणेश साळुंखे
Leave a Reply