सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत.
अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली. अत्यंत सामान्य स्थितीतल्या या शेतकर्याने आपल्या कष्ट व ज्ञानाच्या बळावर पुणे हैदराबाद रस्त्याला लागून वडवळच्या शिवारात दहा हेक्टर शेती घेऊन ती बारमाही बनवली. त्यांच्या या अद्ययावत शेतात दररोज १५० मजुरांना रोजगार मिळतो. दररोज २०० ते ५०० शेतकरी शेती पाहाण्यासाठी व रोपे घेण्यासाठी भेटी देतात.
रोपवाटिका व रोप विक्रिवर जरी त्यांचा भर असला तरी शेती क्षेत्रात ते अनेक नवे प्रयोग करत असतात. भारतभर प्रवास करुन विद्यापीठांतील नामांकित, दर्जेदार व प्रसिध्द वाण ते आणतात. आणि सोलापूरच्या हवामानात ते कसे येतात, हे अभ्यासतात. त्यांचे क्रांतिकारक व यशस्वी प्रयोग म्हणजे स्वतंत्र शेवगा शेती, जी राज्यभर गेली २५ वर्षे होत आहे. त्याचे मूळ काम दादांनी केले. बोर कलमी करण्याबरोबर दादांनी चेस्टनट बोर नावाची नवी जात आणली व त्याची बाग करुन या वाणाची बोरे निर्यात केली. वडवळ फार्मवरील त्यांची द्राक्षांची बाग ही आदर्श द्राक्षबागच आहे.
— शुभदा वक्टे
(मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने)
Leave a Reply