‘गोल्डन व्हॉइस’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला.
‘बिब घ्या बिब शिककाई, परिकथेतील राजकुमारा, गोड गोजिरी लाज लाजिरी, अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहेजा चढला.
शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धामध्ये आपले गुण प्रदíशत करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षाच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या.
कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा-या यात्रा-जत्रांतील संगीत कार्यक्रमातही यांचा आवाज लोकप्रिय ठरू लागला. एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांच्या आवाजातील निकोपता आणि निरागसता सर्वप्रथम ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या लक्षात आली. मुंबई आकाशवाणीवर १९६० मध्ये संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले “मन पिसाट माझे अडले रे‘ हे गीत त्यांनी गायले. त्यानंतर आणखी दोन गीते त्यांनी गायली. या तीन गाण्यांनी इतिहास घडवला आणि कृष्णा कल्ले हे नाव सर्वांच्या नजरेत आले.
नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.
जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांनी १९६० तसेच १९७० च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत.
‘केला इशारा जाता जाता’ आणि ‘एक गाव बारा भानगडी’ या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायली होती.
कृष्णा कल्ले यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. वसुधा कुलकर्णी यांनी त्यांच्या जीवनपटावर बेतलेल्या ‘गायिका कृष्णा कल्लेः एक कृतार्थ गानप्रवास’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
त्यांचे पती मनोहर राय हे पण संगीतकार होते. कृष्णा कल्ले यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कृष्णा कल्ले यांची गाजलेली गाणी.
अंतरंगी रंगलेले गीत, अशा या चांदराती, गोड गोजिरी लाज लाजिरी, आईपण दे रे, अशी नजर घातकी बाई, कशी रे आता जाऊ घरी, गुपित मनिंचे राया, चंद्र अर्धा राहिला, चंद्रकळा रुक्मिणी नेसली, तू माझ्या स्वप्नांची कल्पना, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, पुनवेचा चंद्रमा आला घरी, मन पिसाट माझे अडले रे.
अनमोल गाणी मा.कृष्णा कल्ले.
https://www.youtube.com/shared?ci=fxXCy8NOTRM
https://www.youtube.com/shared?ci=pfUCHy-z6D4
Leave a Reply