दादांचं खरं नाव, कृष्णा. त्यांचा जन्म झाला, ८ ऑगस्ट १९३२ साली. ते इहलोक सोडून गेले १४ मार्च १९९८ रोजी. या ६६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर ज्याला मराठी भाषा कळत नाही, अशा अमराठींनाही मनसोक्त हसवलं.
आधी बॅण्ड, राष्ट्र सेवा दल, ‘विच्छा माझी पुरी करा’ व नंतर ‘सोंगाड्या’ चित्रपटापासून सलग आठ चित्रपट रौप्यमहोत्सवी करणाऱ्या दादा कोंडके यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली.
मराठी, हिंदी व एक गुजराथी मिळून एकूण २४ चित्रपटांतून त्यांनी रसिकांना मनमुराद हसवलं. मात्र खाजगी जीवनात ते चार्ली चॅप्लीन प्रमाणे, आपलं दुःख लपवूनच राहिले.
सिने-कारकिर्दीत दादांचा शेकडो आप्तस्वकियांशी संपर्क आला. प्रत्येकानं त्यांच्याकडून कशाची ना कशाची अपेक्षा केलीच होती. फक्त एका माणसानं दादांकडून काडीचीही अपेक्षा केली नाही. ते म्हणजे, मनोहर कोलते!
दादा गेल्यापासून त्यांचं नाव अस्तित्वात रहावं म्हणून कोलतेंनी दादा कोंडके मेमोरियल फौंडेशनची स्थापना केली व दरवर्षी दादांच्या जन्मदिनी व स्मृतिदिनी ते सामाजिक कार्यक्रम करीत राहिले.
आज दादांचा २४वा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने आज तीन स्त्रियांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातील पहिली आहे, सौ. सुप्रिया शेखर शिंदे! हिने शिल्पकलेत प्रावीण्य मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्प घडवण्यात भारतातील पहिल्या स्त्री शिल्पकाराचा मान मिळवला.
दुसरी आहे, सौ. सारिका इंगळे! हिने आपल्या पती समवेत बावीस अनाथ मुलांना सांभाळून त्यांना शिक्षण दिलं आहे. ही मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची व उस तोडणी कामगारांची आहेत. श्री व सौ. बाबा आमटे यांचं स्वप्नं ते दोघं आपल्या कुवतीनुसार साकार करीत आहेत.
तिसरी आहे, निराधार वृद्धांना आधार देणारी सेवाव्रती, सौ. अनिता याकडे! आज बावीस आजी-आजोबा त्यांच्या ‘नवरत्न ओल्ड एज होम’ मध्ये वास्तव्य करताहेत. त्या वृद्धांसाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब अहोरात्र काळजी घेत असतं.
समाजामध्ये, भरलेल्या ओंजळीतून सांडणारे धन समाजासाठी देणारे अनेकजण असतात. जसं पाण्याअभावी सुकलेल्या वाफ्यांना पाणी पोहोचविण्यासाठी पाट तयार करावा लागतो, तसंच ही मदत या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनोहर कोलतेंसारखे समाजसेवी पाट तयार करतात. व पाणी मिळाल्याने वाफ्यातील पिक भरघोस फुलून येतं..
आज दादांच्या स्मृतिदिनानिमित्त मा. श्रीपालजी सबनीस, मा. राजेंद्र पवार व मा. प्रकाश राऊत यांच्या शुभहस्ते वरील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.
या कृष्ण-सुदामाच्या सोहळ्यास, आपल्याही शुभेच्छा नक्कीच असू द्यात.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-३-२२.
Leave a Reply