नवीन लेखन...

कृष्णविवर

१९७४ च्या नवव्या मराठी विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ‘कृष्णविवर’ ही विज्ञानकथा बक्षीसपात्र ठरली. आपल्या नावाचा दबाव निर्णयावर येऊ नये म्हणून ना. वि. जगताप या नावाने आणि मंगलाताईंच्या हस्ताक्षरात डॉ. जयंत नारळीकर यांनी पाठवलेली तीच कथा आज इथे पुनर्प्रकाशित करून सादर केली आहे.


“हा कॉम्प्युटर लेकाचा फार सतावतोय” तावातावाने कॉफी ढवळत प्रकाश बोलत होता. “गेल्या आठवड्यात मी त्याच्याकडे कमीतकमी पन्नास खेपा तरी घातल्या असतील, पण त्याचे उत्तर सारखे तेच!”

“काय म्हणतो कॉम्प्युटर?” संजयने साळसूदपणे विचारले. तो शुद्ध गणिताचा विद्यार्थी असल्याने कॉम्प्युटरकडे तुच्छतेने पाही. एखाद्या चित्रकाराने घर रंगवणार्‍या रंगार्‍याकडे पाहावे त्याप्रमाणे.

“कॉम्प्युटर म्हणतो की माझे मूळ सिद्धान्त चुकले आहेत. खरं म्हणजे ‘प्रॉफ’ना दिलेला डेटा कॉम्प्युटरला सुपूर्द करून मी दिवसभरात मोकळा होईन आणि ठरल्याप्रमाणे हायकिंग टूरवर जाईन, असे मला वाटले होते; पण man proposes and computer disposes हेच खरे.”

यर्कीस वेधशाळेतून आलेला गुरू ग्रहाबद्दलचा काही नवीन डेटा कॉम्प्युटरवर पडताळून पाहायला प्रकाशकडे आला होता.

“तुझी बेरीज-वजाबाकी चुकली असेल.” फिजिक्सवाल्यांचे गणित कच्चे असते, असा सर्वसाधारण गणित्याला वाटणारा विश्वास संजयने व्यक्त केला.

“हे बघ, चूक असलीच तर ती माझी नव्हे; न्यूटन आणि आइन्स्टाइनची असली पाहिजे. ग्रहांची गती त्यांच्या सिद्धान्तावरून ठरवली जाते, हे तुझ्यासारख्या अल्पश्रुतालादेखील माहीत आहे. पण कॉम्प्युटर म्हणतो, हा नवीन डेटा त्यांच्या सिद्धान्तात बसत नाही. डेटा चुकीचा नाही याची प्रॉफना खात्री आहे. मग घोडे कुठे पेंड खाते?” प्रकाशने आपली तक्रार मांडली.

“मला वाटते, तू खगोलशास्त्रातल्या दशावतारांची नावे घेत बस, म्हणजे तुला प्रेरणा मिळेल”, संजय थट्टेने सूचना करत होता. “म्हण, न्यूटनाय नम:, हॅलये नम:, हर्शलाय नम:, ॲडम्साय नम:, एडिंग्टनाय नम:…”

“ॲडम्स… ॲडम्स… काय लाखाची गोष्ट बोललास! Thank You बालादपि सुभाषितं ग्राह्यम्” संजयच्या पाठीवर एक जोरदार थाप मारून कॉफी अर्धी टाकून, प्रकाश तेथून पसार झाला.

संजय पाहतच राहिला. इन्स्टिट्यूटमध्ये चक्रमपणाचा मक्ता फक्त गणिती लोकांनीच घेतला होता. प्रकाशचा विक्षिप्तपणा त्याला आवडला नसावा.

‘प्रॉफ’ म्हणजे इन्स्टिट्यूटमधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक रमेश अग्रवाल. ग्रह आणि उपग्रह यांच्या भ्रमणाचे गणित (Celestial Mechanics) या विषयात त्यांनी जागतिक कीर्ती कमावली होती. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला या विषयात संशोधन करणारे फारच थोडे शास्त्रज्ञ होते. त्यामुळे एखादा कूट प्रश्न उद्‌भवल्यास त्या विषयाशी संबंधित असलेले खगोलशास्त्रज्ञ अग्रवालांकडे धाव घेत. म्हणून ‘गुरू’ संबंधी उपलब्ध झालेला नवा डेटा त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

प्रकाश पावटे हा त्यांचा आवडता विद्यार्थी. नुकताच आलेला डेटा वरकरणी निरीक्षण करून त्यांनी प्रकाशकडे छाननीसाठी पाठवला. “नक्की निष्कर्ष काढल्याशिवाय मला भेटू नको”, हे त्याला वेगळे सांगायची आवश्यकता नव्हती.

तरी एक आठवडा झाला आणि अजून तो आला नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले होते. आपणच त्याला गाठावे का, असा विचार ते करत असताना, तोच धावत त्यांच्या खोलीत आला. कॉम्प्युटरच्या उत्तरांचा सगळा गठ्ठा त्यांच्या टेबलावर आदळून तो भराभरा बोलायला लागला. पण त्यातले एक अक्षरसुद्धा प्रोफेसर साहेबांना समजेना. त्याला इतका उत्तेजित झालेला त्यांनी पाहिला नव्हता.

“शांत हो! शांत हो! मिनिटाला फक्त एकच वाक्‍य बोल म्हणजे मला कळेल तरी” ते सौम्य स्वरात म्हणाले.

“सर! १८४६च्या सुमारास युरेनस ग्रहाच्या गतीमध्ये अनियमितता पाहून ॲडम्सने केवळ तर्क आणि गणित यांच्या आधाराने युरेनसजवळ असलेला नवा ग्रह नेपच्यून शोधून काढला. मला खात्री आहे, गुरूच्या जवळ ग्रहासारखीच एखादी नवीन वस्तू आलेली आहे. कॉम्प्युटरमधली उत्तरे निश्चितपणे तसे सांगत आहेत.”

पुराव्याखेरीज विधान करायचे नाही, हा नियम प्रोफेसरसाहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांत बिंबवला होता. तरी प्रकाशचे विधान इतके अनपेक्षित होते की, स्वत: या प्रश्नाचा छडा लावायचा निर्णय त्यांनी घेतला आणि पुढचे दहा दिवस अनेक खगोलशास्त्रीय पद्धती वापरून, त्या दोघांनी हे विधान बरोबर आहे असे ठरवले.

लंडनहून निघणार्‍या शास्त्रीय साप्ताहिक (Nature) मध्ये अग्रवाल-पावटे या दोघांचा लेख प्रसिद्ध झाला आणि खगोलशास्त्रज्ञांमध्ये मोठी खळबळ उडाली. गुरूच्या गतीमध्ये निर्माण झालेली अनियमितता, त्याच्याजवळ आलेल्या एका नवीन वस्तूमुळे आहे, असा त्या लेखाचा सारांश होता.

त्या नवीन वस्तूला त्यांनी तात्पुरते ‘क्ष’ (X) असे नाव दिले आणि ‘क्ष’चे वस्तुमान, वेग, गुरूपासून अंतर, इत्यादी माहिती प्रकाशित केली. ‘क्ष’ म्हणजे काय असेल याबद्दल नाना तेर्‍हेचे तर्क चालू झाले. मंगळ आणि गुरूच्या दरम्यान फिरणार्‍या अनेक ॲस्टरॉइडस (asteroids) पैकी काही एकत्र येऊन त्यांचा नवीन ग्रह झाला असेल किंवा सूर्यमालेच्या बाहेरून आलेले ते एक कॉमेट असावे, असा काहींचा तर्क होता. अर्थात ‘क्ष’ला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगातील वेधशाळांत चढाओढ उत्पन्न झाली.

परंतु त्यांना काहीच दिसले नाही!

या प्रकाराला तीन वर्षे लोटली. ‘क्ष’ दिसत नाही, पण त्याची उपस्थिती अवश्य आहे; याची शास्त्रज्ञांना खात्री असल्यामुळे त्यांनी ‘क्ष’च्या दिशेने आकाशयान सोडयचे ठरवले; कारण प्रश्न महत्त्वाचा होता. त्यावर शतकानुशतके चालत आलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताचे भवितव्य अवलंबून होते. ‘क्ष’चा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला म्हणून आकाशयानाचे उड्डाण भारतातील श्रीहरिकोटा बेसवरून करायचे ठरले आणि त्यात प्रवासी शास्त्रज्ञ म्हणून जाण्याचा मान प्रकाश पावटेला मिळाला. त्याचा एकमेव सहप्रवासी म्हणजे यानाचा अमेरिकन कॅप्टन जॉन फॉकनर, एक कुशल तंत्रज्ञ होता. जागतिक अंतराळ संस्थेचे (World Space Organization) भारतातून गुरूकडे जाणारे ते दहावे यान असल्यामुळे त्याचा नंबर होता W-I-J-10. गुरूकडे जायला योग्य दिवस ठरवून W-I-J-10च्या उड्डाणाची तयारी होऊ लागली.

या तीन वर्षांच्या काळात प्रकाश पावटे आणि संजय जोशी Ph.D. मिळवून आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये फेलो झाले होते. संजयचे लग्न होऊन वर्ष झाले होते; पण प्रकाश अजून सडाफटिंगच होता. मात्र दोघांची मैत्री पूर्ववत होती. गप्पा-टप्पा, परस्परांची छेडछाड कायम होती. उड्डाणाच्या एक आठवडापूर्वी संजयच्या नवजात कन्येचे बारसे होते. तिच्यासाठी एक मोठे थोरले Teddy Bear (खेळातले अस्वल) घेऊन प्रकाश संजयच्या घरी दाखल झाला.

“वहिनी, काय नाव ठेवलं छोकरीचं?” Teddy Bear पुढे करीत त्याने विचारले.

“अनुपमा!”,  तुम्ही तिला हातात घेऊन पाहणार का?”

“छे बुवा! दुरूनच सांगा.

आमची कन्या कुणासारखी दिसते?”

“तुम्हा दोघांसारखी आहे.” प्रकाशचे डिप्लोमॅटिक उत्तर.

“छोकरी मोठी गोड आहे यात शंका नाही. आणखी अठरा-वीस वर्षांनी पाहा, तिच्यामागे किती रोमिओ लागतात ते.”

“पण तुम्हीच थांबा ना अठरा-वीस वर्षं, आम्ही करून घेऊ तुम्हाला जावई!” अनुपमाच्या आईने वरसंशोधनाला सुरुवात केली. पण, लग्नाची गोष्ट निघाली, मग ते १८ दिवसांनी असो किंवा १८ वर्षांनी, की प्रकाश लाजून जाई. त्याने गडबडीने त्यांचा निरोप घेऊन तेथून पोबारा केला.

“उगीचच त्या ब्रह्मचार्‍याला घाबरवलेस” संजयने बायकोला चापले.

ठरल्याप्रमाणे W-I-J-10च्या यात्रेला सुरुवात झाली. यानाचा पृथ्वीवरील अनेक स्टेशनांशी संपर्क चालू होता. संदेशाचे आदानप्रदान नियमित होत होते, पण गुरूच्या आसमंतात आल्यावर परिस्थितीत फरक झाला. प्रकाशने खालील संदेश मिशन कंट्रोलकडे पाठवला.

‘क्ष’ जवळ आली असे वाटते, पण अद्याप काहीच दिसत नाही. परंतु ‘क्ष’च्या दिशेने अनेक वस्तू, मीटिओराईट, ॲस्टारॉइड वगैरे वेगाने जाताना दिसत आहेत. ‘क्ष’ चमकत असता तर म्हटले असते की, भगवद्‌गीतेत दिव्यावर तुटून पडणार्‍या पतंगाचं वर्णन…”

“बरं बरं! कविकल्पना पुरे! तू पुढे काय करणार?” कंट्रोलने हटकले.

“अहो, अणुस्फोट पाहून ओपेनहायमरला गीता आठवली. मला इथे दिसते ते किंवा दिसत नाही ते, अणुस्फोटाहून विचित्र आहे. परवानगी मिळाल्यास अधिक जवळून पाहावे म्हणतो.” प्रकाशने निरोप धाडला.

“परवानगी आहे; पण धोका वाटल्यास ताबडतोब परत ये.”

“अवश्य, मी W-I-J-10ची पूर्ण काळजी घेईन.” कंट्रोलकडे आलेले प्रकाशचे ते शेवटचे स्पष्ट शब्द होते.

प्रकाशच्या सूचनेवरून जॉनने ‘क्ष’च्या दिशेने यान वळवले. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला. “अरे, जरा सावकाश चालव. आपल्याला फार जवळ जायचे नाही.” प्रकाशने जॉनला सावध केले.

“मी इंजिन केव्हाच बंद केले आहे. वेग का वाढतोय समजत नाही.” यानातल्या वेगमापकाकडे चिंतातुर नजरेने पाहत जॉन उद्‌गारला. त्यातला काटा पुढे-पुढे सरकत होता.

प्रकाशच्या डोक्‍यात लख्खकन प्रकाश पडला. यानातल्या कॉम्प्युटरकडे त्याने धाव घेतली आणि अद्याप न वापरलेला प्रोग्रॅम एका खणातून काढून त्यात भरला. त्याचे लेबल होते ‘कृष्णविवर’. यानाच्या वेगवृद्धीची माहिती पंच करून कॉम्प्युटरमध्ये घातली आणि क्षणात त्यातून छापील उत्तर आले; ते वाचून गडबडीने प्रकाश जॉनकडे आला.

“जॉन, जॉन, ‘क्ष’ काय आहे हा प्रश्न सुटला. पण मला वाटतं, आपल्या दृष्टीने फार उशीर झाला. ‘क्ष’ हे कृष्णविवर आहे आणि आपण त्याच्याकडे वेगाने धाव घेत आहोत.”

कृष्णविवर म्हणजे अतिशय आकुंचन पावलेली वस्तू, त्याचे गुरुत्वाकर्षण इतके प्रखर असते की, त्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच हा ‘क्ष’ पृथ्वीवरील वेधशाळांना किंवा जवळूनदेखील जॉन आणि प्रकाशला दिसत नव्हता. आइन्स्टाइनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताप्रमाणे कृष्णविवरे विश्वात असू शकतात, पण अद्याप असे कृष्णविवर खगोलशास्त्रज्ञांना सापडले नव्हते. म्हणून ‘क्ष’ एक कृष्णविवर असेल, हा तर्क थोड्याच शास्त्रज्ञांनी मांडला होता आणि त्याचे बहुतेकांनी स्वागत केले नव्हते.

“मग पुढे काय?” उत्तराची जवळजवळ कल्पना असून जॉनने प्रश्न विचारला.

“आपण बहुतेक ‘क्ष’ च्या तोंडात पडणार. आशेचा एक अंधुक किरण आहे. आपल्या यात्रेचा मार्ग (Orbit) ‘क्ष’च्या केंद्रबिंदूकडे नसून त्याला वळसा घालणारा आहे. अजून कॉम्प्युटर नक्की सांगू शकत नाही. त्याला Orbit चा आणखी डेटा पाहिजे. मी परत त्याला चालू करून येतो, तोपर्यंत तू कंट्रोलशी संपर्क साध.”

जॉनने कंट्रोलला संदेश पाठवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कंट्रोलकडून अतिशय वेगाने उच्चारल्याप्रमाणे शब्द येत होते, त्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. इतक्‍यात प्रकाश तेथे आला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. “जॉन, कॉम्प्युटरने आपल्या मृत्यूचेच भविष्य केले आहे. आपण ‘क्ष’च्या जवळ जाऊन त्याला सुमारे दहा लक्ष चकरा मारून, नंतर आत पडणार, असे कॉम्प्युटर म्हणतो.”

“कंट्रोलची काय सूचना आहे?”

जॉनने परिस्थितीची कल्पना दिली. कंट्रोलशी संबंध तुटला, आता सर्व निर्णय आपणच घेतले पाहिजेत, हे प्रकाशने ओळखले.

“अजून आशेला थोडीशी जागा आहे. कृष्णविवराभोवती जो अस्थिर गोलाकार मार्ग (Unstable Circular Orbit) असतो, त्याच्याजवळून आपण जाणार आहोत, त्या मार्गाच्या अस्थिरतेचा मी फायदा घेणार. योग्य वेळी एक रॉकेट फायर केले की, आसपास निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपले यान कदाचित बाहेर फेकले जाण्याचा संभव आहे. तसे झाले तर ठीक. नाहीतर जगाला आपला राम राम! आपण आता गोठवलेल्या सुटात प्रवेश केला पाहिजे.”

“गोठवलेल्या सुटाची काय जरुरी आहे?” जॉनने पृच्छा केली.

“अरे, जसजसे आपण ‘क्ष’कडे जाऊ, तसतशी त्याच्या गुरुत्वाकर्षण भरतीची शक्ती (tidal power) आपल्याला जास्त-जास्त जाणवेल. या tidal power मुळेच चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर समुद्राच्या भरतीच्या वेळी जाणवते. आता कल्पना कर, ‘क्ष’कडे जाताना तुझे डोके ‘क्ष’च्या सगळ्यात जवळ आणि पाय सगळ्यात दूर आहेत. ‘क्ष’च्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुझ्या डोक्‍यावर जितका असेल, तितका पायांवर असणार नाही, त्याचा परिणाम काय होईल?”

“माझे शरीर डोक्‍यापासून पायापर्यंत ताणले जाईल.” जॉनचे डोके आता चालू लागले.

“बरोबर! आणि हा ताण इतका विलक्षण असेल की तो आपल्याला पेलणार नाही. आपण गोठवलेल्या अवस्थेत असलो तर कदाचित तो परिणाम आपल्या इंद्रियांना तेवढा जाणवणार नाही.” प्रकाशने खुलासा केला. “तू आकाशयान स्वयंचलित अवस्थेत ठेव, म्हणजे कॉम्प्युटर त्याला पृथ्वीची दिशा दाखवेल. नशीब शिकंदर असेल तर बेसवरचे लोक आपल्याला जागे करतील.”

सर्व तयारी करून गोठवलेल्या सुटात प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी आकाशदर्शन घेतले. तारकासमूह विशेष तेजाने चमकत आहेत, असे त्यांना वाटले. हेच त्यांचे जगाचे शेवटचे दर्शन ठरणार होते काय?

श्रीहरिकोटा बेसवर W-I-J-10 ही अक्षरे असलेले आकाशयान उतरले, तेव्हा तिथल्या तंत्रज्ञांना आश्चर्याचा धक्‍का बसला. त्या नावाचे यान तिथल्या कोणाच्याही स्मरणात नव्हते. फार काय त्याच्या आगमनाची पूर्वसूचनादेखील मिळाली नव्हती. या अनाहूत यानाची कसून तपासणी घेऊन, त्यांनी आतल्या दोघा कुंभकर्णांना बाहेर काढले आणि त्यांची Maximum Security Medical Section (MSMS) कडे रवानगी केली. त्या दोघांची नावे किंवा चेहरे बेसवरच्या सर्वच लोकांना अपरिचित होते.

“अहो, जरा दमाने घ्या. डॉक्टरांनी तुम्हांला हालचाल करायची आणि विचार करायची बंदी केली आहे,” एम.एस.एम.एस.मधली परिचारिका अनुपमा प्रकाशला सांगत होती. “लवकरच येथील प्रमुख शास्त्रज्ञ तुमची भेट घ्यायला येतील. त्यांनाच सर्व सांगा.”

“मला निदान एकदोन मित्रांना तरी फोन करू दे. फक्त मी सुखरूप आलो हे सांगायला. हे बघ माझे ॲटॉमिक घड्याळ सांगत आहे की, मी इथून निघून तीन वर्षे झाली. ते लोक काळजी करत असतील की, हा कुठे गडप झाला म्हणून…”

“तीन वर्षे?” प्रकाशचे शब्द आत येता-येता ऐकून, बेसवरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रामस्वामी उद्‌गारले, “तीन वर्षांपूर्वी येथून कुठलेच यान मानव-प्रवासी घेऊन गेले नव्हते. गेली पाच वर्षे आम्ही फक्त स्वयंचलित यंत्रे असलेली मानवविरहित याने पाठवतो.”

“शक्‍यच नाही! तुमची रेकॉर्ड्‌स तपासून बघा.” प्रकाश आश्चर्याने ओरडला. “माझ्या घड्याळाप्रमाणे तीन वर्षे पंधरा दिवसांपूर्वी मी आणि जॉन फॉकनर गुरूच्या दिशेने निघालो होतो. जॉनला विचारा. नाहीतर, प्राध्यापक रमेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुमची खात्री होईल.”

“जॉन अजून बेशुद्ध आहे. पण तू म्हणतोस ते प्रोफेसर अग्रवाल नुकतेच रिटायर झाले. पाहतो त्यांचा घरचा पत्ता मिळतो का.” रामस्वामींनी माहिती दिली.

प्रकाशचे डोके गरगरायला लागले. तो W-I-J-10वर प्रवासाला निघाला तेव्हा प्रोफेसर साहेबांनी नुकतीच चाळिशी ओलांडली होती. त्याने घाबरत-घाबरत विचारले. “सध्या कोणते साल चालू आहे?”

उत्तरादाखल रामस्वामींनी त्याच्या हातात त्या दिवसाचे बातमीपत्र दिले. त्यावरची तारीख पाहून प्रकाशला घेरी आली.

तो २० वर्षांनी पृथ्वीवर परत आला होता.

प्रकाशला ताळ्यावर यायला दोन आठवडे लागले. त्याचे डोके ठिकाणावर आणण्यात नर्स अनुपमाचा फार मोठा हात होता. आणि त्या ब्रह्मचार्‍याची विकेट पडणार अशी चिन्हे दिसू लागली. त्याच्या प्रेमप्रकरणात अवकाशयात्रेचा विषय काढायचा नाही, ही डॉक्टरी ताकीद अनुपमा कटाक्षाने पाळत होती.

प्रकाश बरा झाल्यावर रामस्वामींनी त्याची अग्रवालसाहेबांशी गाठ घालून दिली. प्रथम त्यांनी प्रकाशचे सुखरूप परत आल्याबद्दल आणि अनुरूप वधू मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. आणि मग कालहरणाचा खुलासा केला. ही सर्व कृष्णविवराच्या प्रखर गुरुत्वाकर्षणाची किमया होती. निद्रावस्थेत कृष्णाविवराभोवती चकरा मारताना त्यांच्या कालमापनाप्रमाणे सेकंदाचाच अवधी पुरला होता, कारण गुरुत्वाकर्षणाने त्यांची कालगती जवळजवळ गोठवून टाकली होती. त्या अवधीत बाकीचे जग १७ वर्षांनी पुढे गेले होते. जॉन आणि प्रकाश यांचे विशीतले तारुण्य अजून टिकून होते.

“बरं, संजय कुठे आहे?” मला पाहून त्याला चांगलाच शॉक बसेल.” हसत बसत प्रकाशने विचारले.

“संजय कोण?” अनुपमाने पृच्छा केली.

“संजय जोशी माझा मोठा मित्र आहे. आम्ही दोघे एकाच इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होतो. त्याचा माझा अनेक वेळा वाद… अगं, रडायला काय झाले?”

“ते माझे बाबा. त्यांना आणि आईला विमान अपघातात मृत्यू आला आणि मी पोरकी झाले.” स्फुंदत स्फुंदत अनुपमाने खुलासा केला.

अनुपमाच्या आईचे वरसंशोधन सफल झाले होते. कृष्णविवराच्या कृपेने!

– ना. वि. जगताप

टीप : कथेतील रेखाटने पुनर्मुद्रणाचा भाग आहेत. मूळ कथा चित्रविरहित आहे.

— मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने 
`पत्रिका’ या मासिकातून

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..