१९९५ साली गोष्ट आहे. महेश मांजरेकरचा पहिला मराठी चित्रपट ‘आई’ हा पूर्ण झाला होता व त्याचं पोस्ट प्राॅडक्शनचं काम चालू होतं. आम्ही पब्लिसिटी डिझाईनचं काम पूर्ण करत आणलं होतं.
एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’ शिवाजी साटमांनी शेकहॅण्डसाठी हात पुढे केला. त्या मोठ्या हाताच्या पंजात मी माझा हात मिळवला. त्यांनी स्मितहास्य केले. मी शिवाजी साटम यांना दूरदर्शनवरील ‘एक शून्य शून्य’ मधील एपिसोडमध्ये पाहिले होते.
इन्स्पेक्टरच्या भूमिकेत परफेक्ट दिसणाऱ्या शिवाजी साटमांना पाहून मला अतिशय आनंद झाला होता.
त्याच वर्षापासून सोनी चॅनेलवरुन ‘सी.आय.डी.’ ही मालिका सुरू झाली. त्या मालिकेतील एसीपी प्रद्युम्नची प्रमुख भूमिका करणारे कलाकार होते शिवाजी साटम! सलग तेवीस वर्षे १५०० भागात सादर झालेल्या या मालिकेत शिवाजी साटम, सलग कार्यरत होते. ‘सीआयडी’ म्हणजेच शिवाजी साटम हे समीकरणच झाले होते. ‘कुछ तो गडबड है’ हा संवाद या मालिकेचा परवलीचा शब्द झाला होता. कोण होतं या मालिकेच्या निर्मितीमागे?
बी. पी. सिंग, होय या व्यक्तीची दूरदर्शनवरील सर्वात जास्त काळ चालू राहिलेली मालिका म्हणून ‘सी.आय.डी.’ची गिनीज व लिम्काच्या रेकाॅर्डमध्ये नोंद झालेली आहे.
१९४९ साली डेहराडून येथे बी.पीं. चा जन्म झाला. त्यांनी पुण्यातील एफटीआय मध्ये शिक्षण पूर्ण केले व १९७३ मध्ये दूरदर्शनमध्ये न्यूज कॅमेरामन म्हणून नोकरीस लागले. दहा वर्षांच्या नोकरीत भरपूर अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला.
१९८० मध्ये ‘एक शून्य शून्य’ ही मालिका केली. त्यात पहिल्यांदाच महेश मांजरेकरला त्यांनी ब्रेक दिला. याच दरम्यान ‘सिर्फ चार दिन’ या टेलिफिल्मसाठी बी.पीं. नी क्राईम ब्रॅन्चच्या अधिकाऱ्यांना भेटी दिल्या. त्यांच्यातील जयंत वागळे या अधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यातूनच त्यांना ‘सी.आय.डी.’ मालिकेची निर्मिती सुचली.
‘सी.आय.डी.’ मालिका लोकप्रिय झाली. त्यातील भूमिका करणारे कलाकार हे त्यांच्या भूमिकेनेच ओळखले जाऊ लागले. इन्स्पेक्टर दया, डाॅ. तारिका, फोरेन्सिक एक्स्पर्ट नरेंद्र गुप्ता, इन्स्पेक्टर आशा हे सर्व परिचयाचे झाले.
एखादा खून झाल्यानंतर त्याचा पोलीसांच्या चौकस पद्धतीने घेतलेला शोध व शेवटी मुख्य आरोपीला बेड्या घालणे. हा घटनाक्रम एका एपिसोडमध्ये असायचा. यात आवर्जून शिवाजी साटम यांच्या तोंडी ‘दया, दरवाजा तोड दो..’ हा संवाद असायचाच.
या मालिकेत अनेक मराठी कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये दिलीप कुलकर्णी, तुषार दळवी, मोना आंबेगावकर, महेश मांजरेकर, दिपक शिर्के, मोहन गोखले, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर असे कित्येक जण आहेत.
पाहुणे कलाकार म्हणून हिंदीतील नामवंतांनी हजेरी लावली आहे. प्रेम चोप्रा, ओम पुरी, कपिल देव, मिलिंद गुणाजी, भाग्यश्री, करिना कपूर, सुशांत सिंह राजपूत, इमरान हाश्मी, सलमान खान, आमीर खान, सनी देओल, इ. नी छोट्या भूमिका केल्या आहेत.
२००८ साली या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले. २०१३ साली १००० भाग पूर्ण झाले. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मालिकेने १५०० भाग पूर्ण केले!! सर्व भागात शिवाजी साटम व दयानंद शेट्टी कायमस्वरूपी राहिले, हा देखील एक विक्रमच आहे.
निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंग हे अतिशय उत्तम संघटन कौशल्य असणारे व्यक्ती आहेत. ते एफटीआय मध्ये शिकले तिथेच त्यांनी अध्यक्षपदही भूषविले आहे. दूरदर्शनच्या इतिहासात बी.पी. सिंग यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल यात काही शंका नाही..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-२-२१.
Leave a Reply