जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना काही काळ बेरोजगार राहावे लागले होते. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी उर्दु वृत्तपत्र ‘अंजाम’मध्ये बातमीदारी सुरू केली. यथावकाश इंग्रजी वृत्तपत्रांची कास त्यांनी धरली. स्टेट्मन या इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकारिता केल्यानंतर ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले आणि संपादकपदही भूषवले. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक या नात्यानेच नय्यर यांनी आणीबाणीविरोधात आवाज उठवला. नय्यर यांनीआणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला होता. मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे नय्यर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांची १९९० मध्ये ग्रेट ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदीही नियुक्ती करण्यात आली होती. नय्यर यांनी १४ विविध भाषांमधील सुमारे ८० हून अधिक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं. डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये नय्यर यांनी लेखन केलं आहे. विविध राजकीय, सामाजिक विषयावरील १५ पुस्तकांचं लेखन नय्यर यांनी केलं आहे. कुलदीप नय्यर यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने २०१५ साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्याचा यथोचित गौरव रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.
कुलदीप नय्यर यांची काही पुस्तके –
बियाँड द लाइन्स, इंडिया – द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट – इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग
कुलदीप नय्यर यांचे २३ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply