पन्नास वर्षांपूर्वीचा पहिलीचा वर्ग. मुलांचा वर्गात चिवचिवाट चाललेला. बाई वर्गात येतात आणि मोठ्या आवाजात मुलांना सांगतात, ‘हाताची घडी, तोंडाला कुलूप!’ एका क्षणात मुलं हाताची घडी घालतात व गप्प बसतात. तेव्हा त्या लहान मुलांच्या मनात पहिला धडा गिरवला जातो की, ‘कुलूप’ याचा अर्थ ‘बंद’!
एखादी किंमती वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ती ‘कुलूप बंद’ केली जाते आणि ती पुन्हा मिळविण्यासाठी त्याच कुलूपाच्या विशिष्ट किल्लीचा वापर करावा लागतो.
पूर्वी राजे महाराजांकडे खजिन्याने भरलेले पेटारे असायचे. त्यांना कुलूप लावून सुरक्षित ठेवले जात असे. जेव्हा माणूस स्वतःला रहाण्यासाठी घर बांधून राहू लागला, तेव्हा घरातून कामासाठी बाहेर जाताना तो आतील चीजवस्तू सुरक्षित राहावी म्हणून कुलूपाचा वापर करु लागला.
इथं ‘कुलूप’ लावल्यामुळे आपलं घर, आपण नसताना ‘सुरक्षित’ आहे असं एक गृहीत धरलेलं असतं. प्रत्यक्षात चोरांच्या हत्यारांनी ते कुलूप क्षणार्धात निकामी होऊन चोरी होऊ शकते.
कालांतराने माणूस प्रत्येक गोष्टींसाठी कुलूप वापरु लागला. म्हणजे घरातील कपाटाला गावी जाताना कुलूप. शोकेसच्या ड्रॉवरला कुलूप. संडास-बाथरुम घराबाहेर असेल तर त्याला कुलूप. घरातील लॉकर्सला कुलूप. सुटकेसला प्रवासात कुलूप. बॅंकेच्या लॉकर्सला कुलूप. वस्तू ज्या पटीत वाढल्या, तशी कुलूपं वाढली. त्यामुळे चाव्यांचा जुडगा जड होत गेला.
सदाशिव पेठेत असताना आमच्या घरासमोर पारसवारांचं मोठं दुकान होतं. रात्री आठ वाजता ते दुकान बंद करायचे. दुकानाला लाकडी फळ्यांचे दरवाजे होते. त्यामुळे चार ठिकाणी मोठी कुलूपं लावली जायची. कुलूपं लावण्याचे काम त्यांची गडीमाणसं करायची. ती बरोबर लागलीत का? हे स्वतः मालक पहायचे. ते प्रत्येक कुलूप हातात धरुन जोराने ओढून बघायचे. त्यांचा ‘खाडखाड’ असा आवाज आम्हाला घरात ऐकू यायचा, व कळायचं की, आठ वाजले. कधी मी बाहेर ओट्यावर बसलेलो असताना त्यांची कुलूपांशी चाललेली झटापट पाहून माझी करमणूक होत असे. चारही कुलूपांची दोन-दोन वेळा खात्री केल्यावर ते सायकलवरुन घरी जायचे. एकदा मात्र मी त्यांना गेल्यानंतर काही वेळातच परत येऊन सर्व कुलूपं हलवून पहाताना पाहिलेलं आठवतंय. माणसाच्या मनात नाही नाही ते विचार येऊ शकतात, खात्री करुनही चुकून एखादं कुलूप लागलं नसेल तर चोरी होऊ शकते..या विचाराने त्यांना घरी झोपही लागली नसती.
मी आठवीला असताना शेजारीच रहाणाऱ्या आचरेकर नावाच्या मित्राबरोबर आम्ही दोघेही संध्याकाळी सारसबागेत फिरायला गेलो. जाताना त्याच्या खोलीला आमच्या घरातलं मोठं कुलूप लावलं. त्याची पितळी चावी त्याने पॅन्टच्या खिशात ठेवली होती. आम्ही तिघेही गवतावर बसून गप्पा मारल्या व उशीरा घरी आलो. जेव्हा आचरेकर खिशात चावी शोधू लागला, तेव्हा त्याला ती सापडेना. चावी तर हरवली, झोपायचं कुठे? असा तो विचार करु लागला. मग त्या रात्री आम्ही तिघेही जय भारत दुकानाच्या कट्यावर झोपलो. सकाळी उठल्यावर आचरेकर आणि मी सारस बागेतील त्या बसलेल्या ठिकाणी गेलो, सुदैवाने चावी गवतातच पडलेली दिसली. गणपतीचे आभार मानले व घरी परतलो. आजही ते कुलूप पाहिले की, हा प्रसंग आठवतो.
पूर्वी सायकलला सीटच्या खाली चाकाला गोलाकार कुलूप असायचे. कधी ते कुलूप लावल्यावर किल्ली हरवली तर ती सायकल मागील बाजूने उचलून कसरत करत सायकल दुरुस्ती करणाऱ्याकडे घेऊन जायला लागायची. तो त्याच्या पद्धतीने ते कुलूप काढून देत असे. नंतर सायकलला लोखंडी साखळी अडकवून कुलूप लावण्याची पद्धत सुरु झाली. गोदरेज कंपनीचं छोटं कुलूप लावलं की, सायकल सुरक्षित! ती चपटी चावी हरवली तर स्त्रियांच्या केसातील लांबड्या काळ्या पिनने ते कुलूप उघडता यायचं.
कुलूप खरेदी करायला गेल्यावर गोदरेज कंपनी ही दर्जेदार मानली जाते. मग ते किती लिव्हरचं आहे, त्यावर त्याचा दणकटपणा ठरतो. साधारणपणे कुलूप ७ लिव्हरचं असते. काही कंपन्या तीन ऐवजी चार चाव्या देतात. आता कुलूपांचे आकार व प्रकार वेगवेगळे असतात. नवीन मॅग्नेटिक कुलूपं बाजारात मिळतात, त्याला चावी नसते. एक चपटी पट्टी कुलूपाच्या कडेला लावली की, कुलूप उघडतं. लोखंडी दणकट कुलूपं तर इतिहासजमा झालेली आहेत.
कुलूपावरुन एक विनोदी गोष्ट आठवली. राम गणेश गडकरी यांचे गुरू, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे. एका गावात चोरांची टोळी येते. ते गावातील प्रत्येक घरी जाऊन जुने कुलूप द्या व आमच्याकडचे नवे कुलूप फुकट घ्या, असे करुन संपूर्ण गावाला कुलूपं वाटतात. रात्री गावाबाहेरील मोठ्या मंदिरात कीर्तन असते, सर्व गावकरी घराला नवीन कुलूप लावून कीर्तनाला जातात. कीर्तन पहाटेपर्यंत रंगते. तेवढ्या अवधीत ती चोरांची टोळी आपल्याकडील चावी वापरुन गावातील प्रत्येक घर साफ करुन पळून जातात. गावकऱ्यांना फुकटचे कुलूप महागात पडते..
महाराष्ट्रात एक गाव असे आहे की, ज्या गावातील घरांना कोणीही कुलूप लावत नाही. शनी शिंगणापूर या गावात कधीही चोरी होत नाही, त्यामुळे कुलूप लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आपण कधी एखादी गोष्ट पुन्हा करायची नाही असं ठरवतो, तेव्हा त्या गोष्टीला ‘कुलूप’ लावतो. कुणावर रागावून त्याच्याशी संपर्क तोडतो, तेव्हा त्या मैत्रीच्या नात्याला ‘कुलूप’ लागते. मात्र असं करणं चुकीचं आहे, हे जीवन पुन्हा दुसऱ्यांदा नाहीये, हे लक्षात ठेवून कोणत्याही नात्याला ‘कुलूप’ लावू नका…कारण अशी कुलूपं उघडणाऱ्या ‘चाव्या’ कुठेही मिळत नसतात, ना दुसरा कोणी निष्णात चावीवाला ती ‘चावी’ तयार करु शकत….
आनंदाने जगा आणि इतरांना आनंद देत रहा…
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
६-५-२१.
Leave a Reply